पेशवे साम्राज्याची अखेरची रात्र : भिमा कोरेगांवची लढाई - १ जानेवारी १८१८
जुलमी, अन्यायकारक पेशवाई संपवून, जातीअंताची ही लढाई जिंकून, सन्मानाने गौरवान्वित होणाऱ्या त्या ५०० महार शूरवीर पूर्वजांना अभिवादनाचा दिवस आज १ जानेवारी. त्यानिमित्ताने धम्मविषयक अभ्यासक अशोक नगरेंनी मांडलेला भिमा कोरेगावचा शौर्याचा इतिहास......;
५ नोहेंबर १८१७ रोजी पेशवा दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात खडकी येथे लढाई झाली, आणि बाजीराव पेशव्याची महाराष्ट्रावर असलेली जुलमी सत्ता पुढे लवकरच अल्पावधीत संपुष्टात आली. हे युद्ध होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ३१डिसेंबर १८०२रोजी पेशवे व ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेला तह बाजीरावाने मोडला. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बडोद्याच्या गायकवाडांना पेशवे काही देणे लागत होते. त्यासंबंधाने इंग्रजांच्या संरक्षणाखाली पेशव्यांशी बोलणी करण्याकरीता गंगाधरशास्त्री हे वकील म्हणून पुण्याला आले.
परंतु, त्यांचा पंढरपूर येथे संशयास्पदरीत्या खून झाला. हा खून बाजीराव पेशव्याच्या सांगण्यानुसार त्रिंबकजी डेंगळे यांनी केला, असे गायकवाडांच्या वतीने इंग्रजांनी आपले म्हणणे मांडले व त्रिंबकजी डेंगळेला पकडून ठाण्याच्या तुरुंगात त्यांनी ठेवले. परंतु तो तेथून पळाला. त्याला पकडून आपल्या ताब्यात देण्यास बाजीराव पेशवा टाळाटाळ करीत आहे, असे वाटल्याने ८ मे १८१७ रोजी इंग्रजांनी पुण्याला आपल्या सैन्याचा वेढा दिला. त्यावेळी नाईलाजास्तव बाजीरावास इंग्रजांशी दि.१३जून१८१७रोजी तह करून इंग्रजांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागल्या.
या तहास ' पुण्याचा तह 'असे म्हटले जाते. या तहाने पेशव्यांचा फार मोठा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला.तहानुसार इंग्रजांनी पेशव्यांसाठी प्रशिक्षित केलेली आपली पलटण परत घेतली. अशा प्रकारे,या तहाने इंग्रजांची सत्ता वाढत गेली व पेशव्यांची सत्ता कमी होऊ लागली.ही बाब बाजीरावाच्या मनाला लागून राहिली व त्यासाठी तो मार्ग शोधू लागला. या कामी त्याने हैदराबादहून त्याला भेटण्यास आलेला निजामामाचा वकील सर जॉन माल्कम याचा सल्ला घेतला असता, पेशव्यांनी इंग्रजांशी इमानेइतबारे वागून नेहमी त्यांना मदत व सहकार्य करावे, असा सल्ला दिला. त्याप्रमाणे उत्तर भारतातील पेंढाऱ्यांचे बंड मोडून काढण्याच्या कामी इंग्रजांना मदत करण्यासाठी बाजीराव सैन्य ठेवू लागला. परंतु, पेशव्यांच्या पुणे दरबारात असलेला इंग्रजांचा रेसिडेंट एल्फिन्स्टन याचा मात्र बाजीरावावर विश्वास नसल्याने,बाजीराव हा नवीन सैन्य जमवून आपल्यावर हल्ला करीन, असा एल्फिन्स्टन याचा समज झाला.
याच सुमारास, उत्तर भारतातील पेंढाऱ्यांचे बंड मोडून काढण्यासाठी इंग्रजांचे एक मोठे सैन्य ठिकठिकाणी जमा होत होते. त्यापैकी ब्रिगेडियर जनरल स्मिथ याच्या ताब्यातील फोर्थ डिव्हिजन मधील लष्कर खानदेशातून कूच करीत हळू हळू अहमदनगरकडे येत होते व मुंबईची एक युरोपियन पलटन , व मद्रास नेटिव्ह पलटन , मद्रास नेटिव्ह घोडदळाची दुसरी पलटन,आणि मद्रास नेटिव्ह इन्फन्ट्रीच्या पंधराव्या रेजिमेंटमधील दुसरी पलटन , अशा प्रकारचे सैन्य मुंबईहून पुण्याकडे चाल करून येत होते.मुंबईकडून येणारे सैन्य , आणि अहमदनगरकडे येणारे जनरल स्मिथ याचे सैन्य हे एकत्र व्हायचे होते. या इंग्रजी सैन्याला 'आर्मी ऑफ दि डेक्कन ' असे नाव दिले होते. अशा प्रकारे दोन्हीही बाजूंकडून आपापल्या सैन्याची जमवाजमव सुरु होती. यावेळी पेशव्यांनी इंग्रजांशी लढाई करावी,की करू नये, या महत्वाच्या प्रश्नावर बाजीरावाने कारभारी व सरदारांशी सल्लामसलत केली असता,फारच कमी सरदारांनी लढाई करण्यास अनुकूलता दर्शविली. कारण, इंग्रज फौजा आपल्यापेक्षा सरस असल्याने , त्यांच्याशी आता लढाई करून यशप्राप्ती साध्य होणार नाही, असे त्या अनुभवी सरदारांचे मत होते. परंतु, बाजीरावास त्यांचा सल्ला न पटल्याने त्याने लढायचे ठरवून लढाईची जय्यत तयारी केली. पुण्यात त्याच्या आदेशावरून अनेक सरदार जमा झाले. त्यात निपाणकर, अक्कलकोटचे भोसले, निंबाळकर, घोरपडे, जाधव, विंचूरकर, पटवर्धन, बापू गोखले, भोईटे, पुरंदरे यांचे व नवीन फौज मिळून लाख-सव्वालाख घोडदळ उभे ठाकले. याव्यतिरिक्त अरब, रोहिले, पठाण, सिद्दी,गोसावी, रजपूत, रांगडे,मुसलमान असे मिळून ५०,००० पायदळ तयार झाले.या सर्व दीड लाख लष्कराचे नेतृत्व बापू गोखल्याकडे देण्यात आले.
बाजीरावाच्या लष्कराची छावणी पुण्यातच गारपिराच्या आसपास पडू लागली. परंतु, गारपिरावर कर्नल बर याच्या कमांडखाली इंग्रजांच्या पलटनी अनेक दिवसांपासून आपला तळ ठोकून होत्या. या इंग्रजी लष्करात नेटिव्ह इन्फन्ट्रीच्या सहाव्या , आणि सातव्या रेजिमेंटमधील मिळून १२००शिपाई होते व त्यांच्याकडे दोन तोफाही होत्या. हे सर्व लष्कर सध्या जिथे पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आहे, त्याच्या सभोवतालचा परिसर, म्हणजेच गारपिरावर होते. इंग्रजांच्या या छावणीच्या सभोवताली पेशव्यांच्या लष्करी छावण्या येऊन पडल्या.व गोसावी लोकांच्या छावण्या वानवडीच्या मैदानावर उतरल्या. त्याचप्रमाणे संगमावरील रेसिडेंट मि. एल्फिन्स्टन याचा बंगला व भांबुर्डे गावच्या ( सध्याचे शिवाजी नगर )दरम्यान विंचूरकरांचे घोडदळ, पायदळ आणि तोफखाना यांचा तळ येऊन पडला. अशा प्रकारे इंग्रजांची फौज ही पेशव्यांच्या लष्कराकडून हळूहळू चोहोबाजूंनी वेढली गेली.अशा रीतीने पेशव्यांच्या सैन्याची जय्यत तयारी झाल्यानंतर , इंग्रजांच्या छावणीवर ताबडतोब हल्ला चढवावा,असे सरदारांचे मत होते, परंतु बाजीरावाने हा बेत रहित केला.
बाजीराव पेशव्याचे सैन्य केव्हाही आपल्यावर हल्ला करेल, असे वाटल्याने इंग्रज रेसिडेंट मि. एल्फिन्स्टनने मुंबई व अहमदनगरच्या युरोपियन पलटणींनी ताबडतोब मदतीस यावे, असा हुकूम पाठविला. ततपूर्वी, मुंबईचे सैन्य हे लगेचच, म्हणजे ३०ऑक्टोबर १८१७ रोजी खडकीस येऊन पोहोचले. कर्नल बर याच्या कमांडखालील गारपिरावर असलेले इंग्रजांचे सैन्य हे असुरक्षितेमुळे ताबडतोब खडकी येथे हलविण्यात आले. हे सैन्य सध्याच्या होळकर पुलाच्या जवळपास व खडकी गावापर्यंत जाऊन पोहचले. पेशव्यांनी मेजर फोर्ड याच्याकडून जी प्रशिक्षित पलटन तयार करवून घेतली होती, तिचे वास्तव्य जवळच दापोडी येथे असल्याने वेळप्रसंगी ती इंग्रजांच्या खडकीतील सैन्याच्या मदतीस येऊ शकणार होती.
पेशवे व इंग्रज यांनी एकमेकांस आदेश पाठविले की, जमवाजमव केलेले सैन्य त्यांनी दूर पाठवून द्यावे, अन्यथा परिणामास तयार राहावे.इंग्रजांकडून मेझर फोर्ड व पेशव्यांकडून विठोजी नाईक यांनी हे निरोप परस्परांना दिले. तथापि, दोन्हीकडूनही हे म्हणणे मान्य न केले गेल्याने पेशव्यांचे सैन्य खडकीस इंग्रजांवर हल्ल करण्यासाठी ५नोव्हेंबर १८१७रोजी दुपारी ३वाजता पुण्यातून बाहेर पडले. रेसिडेंड मि. एल्फिन्स्टन हा संगमावरील आपल्या रेसिडेन्सिमधून आपल्या ५०० सैन्यासह खडकीला सुरक्षित पोहचला व त्याने ताबडतोब लढाईस सुरुवात करण्याचे आदेश दिले व दापोडी येथे मेजर फोर्डलाही आपल्या सैन्यासह खडकीच्या सैन्याला येऊन मिळण्याचा तातडीचा निरोप पाठविला.मराठ्यांचे पायदळ , घोडेस्वार तोफा वगैरे सर्व लष्कर चतु:श्रुंगीजवळ गणेशखिंडीच्या डोंगरापासून, संगमावरील रेसिडेन्सिच्या जागेपर्यंत मधल्या मैदानात चोहोकडे पसरले होते.त्यात बापू गोखले, मोरे , दीक्षित, मराठे, चिंतामणराव पटवर्धन , तासगांवकर, मिरजकर, आप्पाजी पाटणकर,घोरपडे, पुरंदरे, राजेबहाद्दर व अक्कलकोटवाले इ. राजे व सरदार होते.पेशव्यांची फौज फारच मोठी होती. त्यामानाने इंग्रजांचे लष्कर लहान असून, ते कर्नल बर याच्या नेतृत्वाखाली पेशव्यांच्या सैन्याला खडकीच्या मैदानावर तोंड देण्यासाठी सज्ज झाले होते. इंग्रज सैन्याच्या मध्यभागी युरोपियन पलटन,रेसिडेंटने आपल्याबरोबर आणलेले शिपाई आणि सहाव्या रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियनपैकी एक तुकडी , तसेच मुळा नदीच्या बाजूला सातव्या रेजिमेंटची पहिली बटालियन , तर खडकी गावाजवळ पहिल्या रेजिमेंटपैकी दुसरी बटालियन होती. आणि दोन्ही टोकाला एक एक तोफही होती.दापोडीहून खडकीकडे आगेकूच करीत असलेल्या मैजर फोर्डच्या सैन्याला खडकीपर्यंत जाऊ न देण्यासाठी पेशव्यांचे मुख्य प्रधान, मोरे, दीक्षित व रास्ते त्या दिशेला वळले.त्यांनी मेजर फोर्डवर हल्ला करण्याचे ठरवले. मोरे, दीक्षितांचे घोडेस्वार मेजर फोर्ड याच्या उजव्या बाजूच्या शिपायांजवळ येत चालले आहेत, असे पाहून व पेशव्यांचे स्वार आपल्या माऱ्याच्या टप्प्यात आले असल्याचे पाहून मेजर फोर्ड याने आपल्या बटालियनला तोफांमधून व बंदुकीतूनगोळीबार सुरू करण्याविषयी हुकूम दिला.त्यामुळे मोरे व दीक्षितांचे सैन्य खडकीच्या बाजूला वळले. तेथेही त्यांच्यावर तोफगोळ्यांचा भडीमार झाला. त्यात मोरे व दीक्षित तोफगोळा लागल्याने ठार झाले.त्यामुळे त्यांच्या सैन्यात धांदल उडाली व सैन्य मागे फिरले . मेजर फोर्ड च्या मार्गातील अडथळा दूर झाल्यामुळे तो कर्नल बर यांच्या सैन्याला येऊन मिळाला. पेशव्याकडील अरब व गोसावी यांनी सातव्या रेजिमेंटची पहिली बटालियन व सहाव्या रेजिमेंटची दुसरी बटालियन यांच्यावर हल्ला चढविला या हल्ल्याचे नेतृत्व पेशव्यांच्या सैन्यातील पोर्तुगिज सेनापती डी. पिंटो याच्याकडे होते. परंतु, तो या हल्ल्यामध्ये ठार झाल्याने इंग्रज सैन्य प्रतिहल्ल्यासाठीपुढे सरसावले .पम कर्नल बर याने त्यांना थांबविले व गोळीबार करण्याचा आदेश दिला. बापू गोखले हा यशस्वीरीत्या पुढे घुसला . परंतु त्याचा घोडा जखमी झाल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली.
त्यावेळी त्याच्या मागे असलेले दुसरे सरदार पुढे सरसावले,व त्यांनी आपल्या सैन्याची जोरदार मुसंडी मारली. पुढे त्यांना दलदल व चिखलाने भरलेला खोल ओढा लागला व ते या दलदलीच्या चिखलात एका पाठोपाठ एक असे येऊन पडले.अशा प्रकारे या लढाईत हल्ले-प्रतिहल्ले होत राहिले.यात दोन्हीकडचे अनेक सैनिक ठार झाले, तर कित्येक जखमी झाले. ही लढाई चालू असतांना हळू हळू अंधार पडू लागल्याने संध्याकाळी सातच्या सुमारास ही लढाई संपली व पेशव्यांचे सैन्य पुणे शहराकडे परत गेले.पेशव्यांचे सैन्य माघारी फिरल्यानंतर मेजर फोर्ड हा देखील आपल्या सैन्यासह दापोडील परतला. आणि कर्नल बर हा आपल्या ब्रिगेडसह कूच करून रात्री आठ वाजता खडकी येथील आपल्या छावणीत परतला. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला असला, तरी इंग्रजांचे संपूर्णपणे वर्चस्व राहिले नाही पुढील आठ दिवस दोन्हीकडूनही कसलीच कारावाई झाली नाही. परंतु या कालावधीत इंग्रजांनी मात्र आपल्या पलटणींची जय्यत तयारी करून घेतली.
खडकीची लढाई सुरू होण्यापूर्वीच ब्रिगेडियर जनरल स्मिथ याला फोर्थ डिव्हिजनचे लष्कर लवकरात लवकर व जलदगतीने कूच करून खडकीच्या सैन्याच्या मदतीसाठी घेऊन यावे, असा आदेश रेसिडेंट मि. एलफिन्स्टन याने पाठवला होता. परंतु हे लष्कर वेळेवर पोहचू शकले नाही, आणि खडकीच्या लढाईस सुरूवात झाली.
जनरल स्मिथ आपले फोर्थ डिव्हिजनचे लष्कर घेऊन अहमदनगरहून जलदगतीने कूच करीत होता . पेशव्यांचे काही सैन्य त्याच्या येण्याला प्रतिबंध करण्यासाठी त्याच्या वाटेत आडवे आले होते.त्यांच्यामध्ये कोंढापुरी येथे काही चकमकी देखील झाल्या. परंतु या अडथळ्यांचा फारसा परिणाम जनरल स्मिथवर झाला नाही आणि जनरल स्मिथ आपल्या सैन्यासह दि. १३नोव्हेंबर १८१७रोजी पुण्यास येरवड्याजवळ पोहचला. येरवड्याच्या नदीच्या काठावर उजवीकडे सादलबाबाची टेकडी म्हणून जी जागा आहे, तिथे तो तळ देऊन राहिला. तेथून जवळच खडकीला कर्नल बर याची छावणी होती. या दोन्ही सैन्यास एक होऊ द्यायचे नाही, असा पेशव्यांचा डाव होता. व त्यासाठी पेशवा तसा प्रयत्न करीत होता. परंतु त्याच्या या प्रयत्नास यश आले नाही. आणि इंग्रजांचे दोन्ही सैन्ये एकत्र येऊन त्यांनी सादलबाबाच्या टेकडीच्या मागे आपला तळ ठोकला. मुळा-मुठा नदीच्या मधून पलीकडे जाण्यासाठी जी नदीच्या उताराची वाट होती, त्या उतारवाटेने जाऊन पुण्यातील गारपिरावरील पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला करण्याचा इंग्रजांचा बेत होता. म्हणून त्यासाठी त्यांनी ' पिकेट हिल ' टेकडीवरून दोन तोफा डागल्या.
नदीच्या उतारवाटेने पलिकडे जाणाऱ्या इंग्रज सैन्याला प्रतिबंध करण्याकरता पेशव्यांच्या काही सैन्याने अडथळे नदीच्या पात्रात निर्माण केले होते.या सैन्यात अरबांचे घोडेस्वार होते. त्यामुळे पेशव्यांचे आणखी काही सैन्य त्यांच्या मदतीला धावून आले व इंग्रज आणि पेशवे सैन्यात नदीपात्रातच काही चकमकी झडल्या. तथापि, पेशव्यांच्या या हल्ल्याला न जुमानता इंग्रज सैन्य नदी ओलांडून पैलतीरावर पोहचले.इंग्रज सैन्याच्या या भागाचा प्रमुख लेफ्टनंट कर्नल मिलने हा होता.या सैन्यात मुंबईची युरोपियन पलटन, रेसिडेंटच्या तैनातीतील सैन्य आणि पहिल्या, सहाव्या व सातव्या नेटिव्ह पलटनीतील एक एक बटालियन होती. हे सैन्य १६नोव्हेंबर १८१७रोजी मध्यरात्री पैलतीरावर पोहचले.त्यानंतर १७नोव्हेंबर १८१७रोजी पहाटे जनरल स्मिथ याच्या छावणीतील सैन्य संगमाजवळच्या नदीतील उतारवाटेने पलिकडे पुण्याला पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी निघाले.अशा रितीने इंग्रजांची एकत्र आलेली दोन्ही सैन्ये वेगवेगळ्या बाजूने पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी निघाली.परंतु,हे सैन्य जेव्हा गारपिराकडे आले, पेशव्यांचे सैन्य आपला तळ उठवून रात्रीतून कूच करून तेथून निघून गेले होते. त्यामुळे १७नोव्हेंबर १८१७रोजी त्याच दिवशी तिसरे प्रहरी म्हणजेच दुपारी तीन वाजता शनिवारवाड्यावरील पेशव्यांचा भगवा जरीपटका खाली उतरवून, इंग्रजांचा युनियन जँक शनिवारवाड्यावर फडकावला.
पेशव्यांनी जेव्हा येरवडा येथे इंग्रजांवर हल्ले केले, तेव्हा त्यांच्यातील अरब, गोसावी हे लढत होते . ते टेकडी चढून वरही आले. परंतु त्यांना दारूगोळा अथवा रसद यांचा पुरवठा न झाल्याने, आणि वरून इंग्रजांच्या तोफांचा मारा मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने त्यांनी माघार घेतली. त्यामुळे मग पेशव्यांनीही माघार घेतली. हे पाहून पेशव्यांच्या सैन्याचे नेतृत्व करीत असलेले सेनापती बापू गोखले यानेही माघार घेतली. या लढाईत अनेक अरब,गोसावी मारले गेले व उरलेल्यांनी आपला जीव बचावण्यासाठी पळ काढला. अशा वेळी इंग्रज सैन्याने त्यांचा पाठलाग केला. परंतु , बाजीराव पेशवा हा दिवे घाटातून आपल्या सैन्यासह सासवडला पळून गेला. अशा रितीने येरवड्याच्याही लढाईत पेशव्यांचा पराभव झाला.
येरवड्याच्या लढाईत माघार घेतल्यानंतर दुसरा बाजीराव पेशवा आणि त्याचा सेनापती बापू गोखले हे मोठ्या सैन्यासह पुरंदरच्या बाजूला पळून गेले. त्यांचा ताबडतोब पाठलाग करने जनरल स्मिथ ला शक्य नव्हते.दि. १७नोव्हेंबर ते २१नोव्हेंबर हे पाच दिवस त्याने आपल्या सैन्याची तयारी करण्यात घालवले.या कालावधीत बाजीरावानेही आपल्या सैन्यासह बराच लांबचा पल्ला गाठला.त्याला साताऱ्याजवळ माहुली मुक्कामी निपाणीचे आप्पासाहेब निपाणकर हे आपल्या दोन हजार घोडेस्वार व एक हजार अरब सैन्यासह येऊन मिळाले.बाजीराव माहुलीहून पुसेसावळी येथे २७नोव्हेंबर रोजी आला.तेथे दोन दिवस मुक्काम करून, २९नोव्हेंबर १८१७रोजी तो निपाणकर व सांगलीचे पटवर्धन यांचेकडील पाच हजार घोडदळ घेऊन मिरजेकडे निघाला.बापू गोखले, विंचूरकर आणि घोरपडे यांचेकडे पेशव्यांचे मुख्य लष्कर सोपवण्यात आले होते.
इंग्रज सैन्य पाठलाग करीत असल्यामुळे बाजीरावाने आपली दिशा बदलली व तो उत्तरेकडे पंढरपूरच्या दिशेने सटकला आणि त्याने पंढरपूरला मुक्काम केला. परंतु, इंग्रज सैन्य पंढरपूरच्या जवळपास आल्यामुळे बाजीराव अहमदनगरकडे पळाला.तेथून त्याने आपला मोर्चा सोन्यासह नाशिकच्या दिशेने वळवला.बाजीरावाच्या या गनिमी काव्यामुळे हैराण झालेल्या जनरल स्मिथला त्याचे निश्चित ठिकाण कळणे अशक्य झाल्याने , त्याला बाजीरावाचा पाठलाग करने कठीण जाऊ लागले. त्यामुळे, जनरल स्मिथ याने आपला मोर्चा घोडनदीकडे ( शिरुर ) वळवून, शिरुर येथे आपल्या तोफा व इतर अवजड सामान ठेऊन त्याने नाशिकच्या दिशेने पेशव्यांचा पाठलाग करण्यासाठी संगमनेर गाठले.परंतु , तो पर्यंत बाजीराव पेशवा आपल्या सैन्यासह ओझरचा घाट उतरून ३० डिसेंबर १८१७रोजी त्रिंबकजी डेंगळे याच्या पायदळासह जुन्नर मार्गे चाकण येथे येऊन पोहचला.१८नोव्हेंबर ते ३०डिसेंबर १८१७ या दीड महिन्याच्या कालावधीत त्याने जनरल स्मिथला बऱ्याच हुलकावण्या देऊन, अक्षरश : जेरीस आणले होते. बाजीराव हा सैन्याची जमवाजमव करून, प्रचंड सैन्यासह पुणे शहर काबीज करण्यासाठी परत येत आहे, हे पाहून धास्तावलेले इंग्रज सैन्य बाजीरावाच्या पुण्याकडील रोखाला प्रतिबंध करू शकले नाही. पेशवे सैन्य पुण्याच्याअगदी जवळ, चाकण येथे आले, तेव्हा पुणे शहराच्या बंदोबस्ताचे काम कर्नल बर याच्याकडे होते, व त्यावेळी त्याच्याजवळ फारच थोडे सैन्य असल्याने कर्नल बर फारच घाबरलेला होता. पेशव्यांचा पाठलाग करणारा जनरल स्मिथ यावेळी नेमका कोठे आहे, हे ही त्याला निश्चित माहिती नव्हते.पेशवे अचानक चाकणहून पुण्याकडे आले, तर नेमके काय करावे लागेल, या चिंतेने ग्रासल्याने, वेळप्रसंगी आपल्याला सहकार्य व मदत मिळावी म्हणून त्याने त्वरीत एक घोडेस्वार इंग्रज सैनिक शिरूरच्या छावणीत लेफ्टनंट कर्नल फिल्समन याचेकडे पाठवून खास संदेश पाठवून,त्याचेद्वारा शिरुर येथून नेटिव्ह इन्फंट्रीची एक पलटण पुण्यास अतिजलद मदतीसाठी मागवली.
लेफ्टनंट कर्नल फिल्समन याने हा तातडीचा संदेश प्राप्त होताच, पुण्याला सैनिकी मदत पाठविण्याचा निर्णय त्वरीत घेतला व त्यासाठी ' सेकंड बटालियन ऑफ दि फर्स्ट रेजिमेंट ऑफ बाँम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री ' ची खास निवड केली. कारण, या बटालियनमधील बहुतांश सैनिक हे लढवय्ये महार सैनिक होते.
कॅप्टन फ्रान्सिस स्टाँटन हा या महार सैन्यासह ३१डिसेंबर १८१७रोजी रात्री आठ वाजता शिरुर येथून खास कर्नल बर च्या मदतीसाठी निघाला. त्याच्या नेतृत्वाखाली ' पहिल्या बाँम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनचे ' ५०० पायदळ सैनिक, ' पूना इर्रेग्युलर हॉर्स ' चे २५०घोडदळ सैनिक, २ सहा पौंडी तोफा घेतलेले ' मद्रास तोफखान्या ' चे २४युरोपियन्स गनर्स इतके सैन्य होते. या युरोपियन्स सैनिकांचे नेतृत्व लेफ्टनंट चिशोलम याचेकडे होते. २७मैलांचा , थंडीतील रात्रीचा पायी प्रवास करून कॅप्टन स्टाँटन आपल्या सैन्यासह १जानेवारी १८१८ रोजी,नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजता भीमा कोरेगांव येथील भीमा नदीच्या पूर्व तीरावर येऊन पोहचला. सतत दहा तासांच्या अविश्रां प्रवासामुळे त्याचे सैन्य अतिशय थकले होते.
कोरेगांवलगतच्या टेकडीवरून सभोवताली पाहिल्यानंतर त्याला पेशव्यांचे प्रचंड सैन्य दिसले. टेकडीच्या पलीकडे, भीमा नदीच्या पश्चिम तीरावर किनाऱ्याच्या काठाने , सभोवताली पेशव्यांचे अफाट सैन्य लढाईच्या जय्यत तयारीनीशी उभे ठाकले होते.पेशव्यांच्या सैन्यात २३ हजार घोडदळ व ५ हजार पायदळ, असे २८,००० सैन्य होते. त्यात गोसावी, अरब व मराठे होते आणि त्या सैन्याचे नेतृत्व पेशव्यांचा कसलेला व अनुभवी सेनापती बापू गोखले हा करीत होता.या प्रचंड सैन्यापासून आपला बचाव होणे शक्य नाही, असे स्टाँटनला वाटले.परंतु , पेशव्यांच्या अफाट सैन्याला पाडाव करण्याचा ठाम निश्चय करुन, त्यांना हुलकावण्या देत कोरेगांवात त्याने प्रवेश केला. या गावाला त्यावेळी मातीचे गांवकुस होते. गावातील घरे, आणि गावाला असलेले गांवकुस यामुळे पेशव्यांच्या घोडदळाला गावात शिरून लढाई करणे अशक्य होईल, याची कल्पना आल्यामुळे कॅप्टन स्टाँटन याने संपूर्ण कोरेगांव ताब्यात घेतले. गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गढीच्या बुरूजावर तोफा चढवून, तसेच गावातील गल्ली-बोळांच्या रस्त्यांतून आपल्या मूठभर सैन्याची व्यूह रचना करून त्याने पेशवा सैन्यावर तोफ डागून आपण या लढाईस तयार असल्याचे सूचित केले. काही वेळातच त्याच्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी पेशवा सैन्याने भीमा नदी उतरून कोरेगांव भोवती चोहोबाजूने गराडा घातला. बरेचसे सैन्य गर्दी करून गावात शिरण्यास यशस्वी झाले व लढाईस सुरुवात झाली. सुरुवातीस इंग्रजांनी आपल्या तोफा गढीच्या बुरुजावर चढविल्याने, त्यांचा वापर गावात शिरलेल्या पेशवे सैन्यावर त्यांना करता येईना. म्हणून त्या तोफा मोठ्या मुश्किलीने पुन्हा खाली आणून, नदीच्या बाजूस असलेल्या दरवाजाने त्यातून इंग्रजांनी पेशवे सैन्यावर त्यांचा मारा सुरू केला. त्या माऱ्याने पेशव्यांकडील बरेच सैन्य ठार झाले.
इंग्रजसैन्य रात्रभर उपाशीपोटी चालत २७मैलांचा पायी प्रवास केल्याने अतिशय थकले होते. तहानेने व्याकूळ असले, तरीही जवळ नदी असूनही ते आपली तहान भागवू शकत नव्हते. अशाही परिस्थितीत ते पेशव्यांच्या प्रचंड सैन्याशी मुकाबला करीत होते. त्यातच कोरेगांवच्या त्या लहानशा तटबंदीच्या आत कोंडले गेल्याने, गावात दोन्हीही सैन्याची प्रचंड प्रमाणात गर्दी झाली. आणि याचाच फायदा घेत, अशा अडचणीच्या जागेत सापडलेल्या इंग्रज सैन्यावर हल्ला करण्याकरीता एक हजार अरब सैनिकांची तुकडी, अशा तीन तीन फळ्यांनी चोहोबाजूंनी एकत्र हल्ला करून गावच उध्वस्त करण्यासाठी पुढे चाल केली. हातघाईच्या या लढाईमध्ये इंग्रजांकडून प्रभावी मारा करणाऱ्या तोफांवर गावकुसाच्या तटबंदीचा आधार घेत, अरबांनी जोरदार हल्ला केला. आणि शेवटी त्यांनी मोठ्या हिकमतीने एका तोफेवर ताबा मिळवून तोफेवरील अधिकारी लेफ्टनंट चिशोलम यास गनिमी काव्याने ठार मारले, व त्याचे शिर धडावेगळे केले व ते भाल्याच्या टोकावर खोचून , इंग्रज सैन्याचै मनोबल या भीतीने कमी होईल, व त्यांच्या दहशत निर्माण होईल, या करीता ते शिर इकडे तिकडे मिरवत राहिले व आरोळ्या ठोकू लागले.ग्रेनेडियरचा ऍडजंट लेफ्टनंट पँटिनसन हा शक्तीशाली, ६फूट ७इंच उंचीचा दुसऱ्या तोफेवरील धिप्पाड अधिकारी जखमी होऊन पडला होता. त्याचीही तोफ पेशव्यांकडील अरब सैनिकांनी आपल्या ताब्यात घेतली, तेव्हा तशा जखमी अवस्थेतही त्याने आपल्या सैन्याला पुन्हा आवाहन केले व पेशव्यांच्या त्या अरब सैन्यावर निकराचा हल्ला करून आपली तोफ परत मिळवली. हे करत असतांना पँटिनसनला वीरगती प्राप्त झाली. इंग्रज सैन्यातील इतर अधिकारी लेफ्टनंट कोनलेन, असिस्टंट सार्जंट वुईंगेट हे देखील जबर जखमी झाले. इंग्रज सैन्याचे नेतृत्व करणारा कॅप्टन स्टाँटन हा स्वत:ही जखमी झाला होता. त्यामुळे या सर्व जखमींना गावातील मंदिरे व धर्मशाळेत ठेवण्यात आले. परंतु , पेशवा सैन्यास याचा सु गावा लागताच त्यांनी धर्मशाळेवर कब्जा करून आतील सर्व जखमींना ठार मारले. त्याच दरम्यान पहिल्या बटालियनचे लेफ्टनंट जोन्स आणि असिस्टंट सार्जंट विली यांच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्य आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीसाठी तेथे आले.हल्ले- प्रतिहल्ले करून त्यांनी आपल्या सैन्याच्या चपळाईने धर्मशाळा परत हस्तगत केली. दोन्हीही बाजूंच्या सैन्यात तुंबळ युद्ध सुरू होते. अनेक सैनिक जखमी होत होते, तर बरेच लढता लढता मरत होते.
इंग्रजांचे सैन्य खूपच शौर्याने लढत होते. तहानेने, आणि भूकेने व्याकूळ झाल्यामुळे आता हळू हळू त्यांचा प्रतिकार कमी होत होता. पेशव्यांच्या सैन्याने देखील आपल्या शौर्याची शिकस्त केली होती. तेही चांगले कसलेले लढवय्ये होते व त्यांच्या दमदार माऱ्यापुढे इंग्रज सैन्याने अनेकदा कच खालली होती. पेशव्यांच्या अफाट सैन्यापुढे हे मूठभर इंग्रज सैन्य निष्प्रभ ठरत होते. पेशव्यांच्या सैन्यापुढे आता टिकाव धरणे शक्य नाही , असेच आता त्यांना वाटू लागले, आणि आपला पराभव निश्चित आहे, असे समजून ते शरणागती पत्करणार , याचा अंदाज जेव्हा खुद्द कँप्टन स्टाँटनला आला, तेव्हा या अत्यंत बिकट परिस्थितीतही आपल्या सैन्याचे मनोबल वाढावे, म्हणून त्यांना '' धीर न सोडता, न घाबरता, शेवटचा सैनिक जीवंत असेपर्यंत प्राणपणाने लढत रहा. मरण पत्करा, परंतु शरण जाऊ नका ", असे आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून ' बाँबे नेटिव्ह इन्फन्ट्री ' च्या महार सैनिकांचे मनोबल वाढल्याने, त्यांच्यात पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले व आपला नाईक जसनाक यसनाक याच्याकडे जखमी स्टाँटनने सोपवलेल्या नेतृत्वाखाली ते पेशवे सैनिकांवर निकराने तुटून पडले. अतिशय विषम संख्येने, आपल्यापेक्षा ५६पट जास्त असलेल्या पेशवे सेन्यावर त्वेषाने ते महार सैनिक गोळीबार करू लागले. पेशवा सैन्याचे मुडद्यावर मुडदे पडू लागले. या अवघ्या ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या हजारोंच्या संख्येने असलेल्या सैन्याला मात्र आक्रमक चढाया करुन जेरीस आणले. त्यांच्याकडील दारुगोळा जेव्हा संपला, तेव्हा त्यांनी आपल्या तलवारी व कटारी म्यानाबाहेर काढून पेशवा सैन्याची कापाकापी सुरू केली.
पेशवा सैन्याने कोंडी केल्यामुळे पुण्याहून कर्नल बर किंवा इतरत्र असलेल्या जनरल स्मिथचे सैन्य त्यांच्या मदतीस कोरेगांव येथे येऊ शकत नव्हते.आता रात्र होऊ लागल्याने कसेबसे नदीचे पाणी त्यांना प्यायला मिळाले, आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने याच संधीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजता महार सैन्याने पेशवा सैन्यावर जबरदस्त हल्ला चढवला. महार सैनिकांच्या या जबरदस्त तडाख्याने पेशवा सैन्य गर्भगळीत झाले व कच खाऊन ते रणांगणातून माघार घेऊन पळ काढू लागले. याच हातघाईत पेशव्यांचा सेनापती असलेल्या बापू गोखल्याचा एकुलता एक पुत्र महार सैनिकांच्या हातून ठार झाला, आणि पेशवा सैन्य युद्ध करण्याचे सोडून, सापडेल त्या दिशेला सैरावैरा धावू लागले. या धावत्या सैनिकांचा महार सैनिकांनी थेट वढू, फुलगांव, आपटी पर्यंत पाठलाग केला. खुद्द दुसरे बाजीराव पेशव्यांनी अगोदरच पळ काढला होता. त्रिंबकजी डेंगळे,विंचूरकर, शिंदे व होळकरांसह बापू गोखल्याने तुळापूर येथे भीमा नदी ओलांडली.
पेशव्यांच्या या अफाट सैन्याला रणांगण सोडून पळ काढावयास लावणारी जी ' बाँबे नेटिव्ह इन्फंट्री ' ची प्रमुख तुकडी होती, ती सर्व लढवय्या, शूर अशा महार सैनिकांची होती. तीचे नेतृत्व रतनाक, जतनाक, व भिकनाक यांनी केले होते. त्यामुळे पेशव्यांना पळ काढण्यास भाग पाडणारे सर्वच योद्धे हे महार होते, हेच सिद्ध होते.
या लढाईत इंग्रजांकडून लढणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या रेजिमेंटच्या एकूण ५०सैनिकांना वीर मरण आले, तर २०५ सैनिक जखमी झाले. त्यापैकी इंग्रजांना हे युद्ध जिंकून देण्यास ज्यांनी अति पराक्रम करून आपल्या जीवनाचे बलिदान दिले, अशा २३ महार सैनिकांची नावे, त्यांच्याबद्दल अतीव कृतज्ञता बाळगून, या युद्धात पहिल्या महार सैनिकाला जेथे लढतांना हौतात्म्य प्राप्त झाले, बरोबर त्याच ठिकाणी ३३×३३फूटांच्या चबुतऱ्यावर ६५फूट उंचीचा , घडीव दगडांचा सूच्याकार स्तंभ उभारून , त्यावर संगमरवरी फलकावर कायम स्वरुपी कोरून त्यांची स्मृती जतन करून ठेवली आहे.
कोरेगांवच्या या लढाईत धारातीर्थी पडलेले , व जखमी झालेले ते शूर वीर महार सैनिक, व त्यांचा सैन्यातील हुद्दा पुढील प्रमाणे-
- सोननाक कमलनाक - नाईक.
- रामनाक येसनाक - नाईक.
- गोंदनाक कोढेनाक - शिपाई.
- रामनाक यसनाक - शिपाई.
- भागनाक हरनाक - शिपाई.
- अंबरनाक काननाक - शिपाई.
- रूपनाक लखनाक - शिपाई.
- गणनाक बाळनाक - शिपाई.
- काळनाक कोंडनाक - शिपाई.
- वपनाक रामनाक - शिपाई.
- विटनाक धामनाक - शिपाई.
- राजनाक गणनाक - शिपाई.
- वपनाक हरनाक - शिपाई.
- रैनाक वाननाक - शिपाई.
- गणनाक धरमनाक -शिपाई
- देवनाक आमनाक - शिपाई.
- गोपाळनाक बाळनाक -शिपाई.
- हरनाक हिरनाक - शिपाई.
- जेठनाक दैनाक - शिपाई.
- गणनाक लखनाक - शिपाई.
जखमी झालेले वीर सैनिक -
- जाननाक हिरनाक - शिपाई.
- भीकनाक रतननाक - शिपाई.
- रतननाक धाकनाक -शिपाई.
या महार सैनिकांच्या पराक्रमाची गौरवगाथा संपूर्ण जगाला कळावी, म्हणून त्यांच्या या महान पराक्रमाबद्दल भीमा कोरेगांवच्या या विजयस्तंभावर इंग्रजीत पुढील प्रमाणे गौरववाक्य लिहिलेले आहे -
" One of the proudest triumphs of the British Army in the East " .
अर्थात - "पूर्वेकडील देशांत ब्रिटीश सैन्याला जे अनेक विजय मिळालेले आहेत, त्यामध्ये अतिशय गर्व बाळगण्यासारखा हा विजय आहे.....! "
जुलमी, अन्यायकारक पेशवाई संपवून, जातीअंताची ही लढाई जिंकून, सन्मानाने गौरवान्वित होणाऱ्या त्या ५०० महार शूरवीर पूर्वजांना माझा स्वाभिमानाचा जय भीम.......!!!
- अशोक नगरे
पारनेर, जि. अहमदनगर.