दारुचा एक पेग तरुण पिढीला किती महागात पडू शकतो?

तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता ही चिंतेची बाब आहे. पण आता दारुचा सर्वाधिक धोका कुणाला आहे, चाळीशीनंतर दारुचे मर्यादित प्रमाणात सेवन केले तर फायदा होतो की तोटा? याबाबतचा पहिला जागतिक पातळीवरील संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे.;

Update: 2022-07-15 09:00 GMT

दारुमुळे अनेक संसार उध्वस्त झाल्याची देखील अनेक उदाहरणं आहेत. दारुचे व्यसन जेवढे जास्त तेवढे नुकसान देखील जास्त असे म्हणतात....पण या दारुचा जगाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि फायदा होतो का याचा एक ताजा अभ्यास समोर आला आहे. द लॅन्सेट मॅगझिनमध्ये यासंदर्भातले संशोधन प्रसिद्ध झाले आहे. यानुसार दारु सेवनाचे दुष्परिणाम हे तरुणांना सगळ्यात जास्त भोगावा लागत असल्याचे समोर आले आहे. जगभरातील भौगोलिक विभाग, वय, लिंग आणि अनेक वर्षांच्या आकडेवारीवर आधारित हे पहिले जागतिक संशोधन ठरले आहे.

या संशोधनानुसार १५ ते ३९ वयोगटातील पुरूषांना दारुच्या व्यसनामुळे सर्वाधिक धोका आहे. पण त्याचबरोबर चाळीशी पार केलेल्या लोकांनी कमी प्रमाणात दारुचे सेवन केले तर त्यांच्या आरोग्यासाठी ते लाभदायक ठरु शकते, असेही या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. दिवसाला ठरलेल्या प्रमाणानुसार एक किंवा दोन पेग घेणाऱ्यांना ह्रदयाशी संबंधित आजार, स्ट्रोक, डायबेटिस यामुळे होणाऱ्या त्रासाचा धोका कमी होऊ शकतो, असे या संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनानुसार जगभरातील २०४ देशांमध्ये दारुचे सेवन करणाऱ्या सुमारे सुमारे एक कोटी ३४ लाख लोकांनी २०२०मध्ये आरोग्याला हानीकारक ठरेल एवढ्या प्रमाणात दारुचे सेवन केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर जगभरातील प्रत्येक विभागात १५-३९ वयोगटातील लोक हानीकारक ठरु शकेल एवढ्या प्रमाणात दारुचे सेवन करत असल्याचे या संशोधनातून दिसले आहे.

एवढेच नाही तर दारु पिणाऱ्या व्यक्तीने दारुचे प्रमाण किती ठेवले पाहिजे याची देखील माहिती या संशोधनामधून समोर आली आहे. तसेच दारुच्या कोणत्या प्रकारात अल्कोहोलचे किती प्रमाण असते, याची माहिती या संशोधनात देण्यात आली आहे. त्याचबरोबर रेड वाईनच्या १०० एमएलमध्ये १३ टक्के अल्कोहोल असते तर बीअरच्य़ा ३७५ एमएलच्या बॉटलमध्ये साडे तीन टक्के अल्कोहोल असते. तर ३० एमएल व्हिस्कीमध्ये ४० टक्के अल्कोहोल असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे.

एवढेच नाही तर कोणताही शारिरीक त्रास नसल्यास वयाच्या चाळीशीनंतर मर्यादित प्रमाणात अल्कोहो घेणाऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा देखील झाल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

Tags:    

Similar News