Ground Report : मलशुद्धीकरण केंद्राच्या आडून शाळा बंद करण्याचा डाव?

सांगली जिल्ह्यातील तासगावमध्येशाळेच्या मैदानावर नगरपालिका मलशुद्धीकरण केंद्र उभारणार आहे, पण याला इथल्या नागरिकांनी विरोध केला आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या खेळण्याचा प्रश्न नाही तर आसपासच्या मागासवर्गीय वस्त्यांच्या आरोगाचा प्रश्न निर्माण होणार आहे, असा आक्षेप घेतला जात आहे. पाहा आमचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;

Update: 2021-10-08 14:50 GMT

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील नगरपालिकेने शहरातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 11 या शाळेच्या मैदानात मलशुद्धीकरण केंद्र उभा करण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप तासगावमधील काही नागरिकांनी केला आहे. या शाळेच्या मोकळ्या मैदानावर हा मलशुद्धीकरण प्रकल्प उभा करणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. या शाळेच्या जागेतच हे शुद्धीकरण केंद्र उभे राहिले पाहिजे असा नगरपालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे का, असा सवाल या निमित्ताने नागरिक विचारू लागले आहेत. तासगाव शहरात मैदानाची संख्या बोटावर मोजण्या इतपत आहे. हे मैदान लहान मुलांना खेळण्यासाठीच राहावं अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.


या शाळेच्या मैदानात किंवा विद्यार्थ्यांच्या खेळण्याचा प्रश्न नाही तर यानिमित्ताने या परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याचे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत शाळेच्या शेजारी राहणारे गणेश वायदंडे यांनी मॅक्स महाराष्ट्र बोलताना सांगितले की, शाळेच्या मैदानावर होणारे मलशुद्धीकरण केंद्र होऊ नये कारण या ठिकाणी डेंगू, चिकणगुन्या, मलेरिया, यासारखे साथीचे रोग होण्याची भीती वाटते. या शुद्धीकरण केंद्रामुळे रोगराई वाढेल अशी भीती आणखी एक नागरिक देवकुळे यांनी दिली.


लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने उरलीच नाहीत. त्यातच या भागातील एकच मैदान असून या ठिकाणी शुद्धीकरण केंद्र उभे करू नये, शाळेचे मैदान सोडून इतर अन्य ठिकाणी हा प्रकल्प उभा करावा अशी मागणी देवकुळे यांनी केली आहे.

पालकांचा शाळेच्या मैदानावरील केंद्राला विरोध

दरम्यान साठेनगर येथील रहिवासी व पालक अशोक कांबळे बोलताना म्हणाले की, " साठेनगर शेजारील शाळेवर जे शुद्धीकरण केंद्र उभा करण्याचा पालिकेने घाट घातला आहे तो आम्ही उधळून टाकू . नगरपालिकेची शाळा ही आमच्या गोरगरीब जनतेची शाळा आहे. या शाळेच्या मैदानावर नगरपालिका का आणि कशासाठी मलशुद्धीकरण केंद्र उभा करू इच्छिते? हे आम्ही पालक म्हणून चालू देणार नाही" असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.


"नगरपालिकेच्या शाळेच्या मैदानावर जर हे शुद्धीकरण केंद्र उभे केले तर, ही शाळा बंद पडेल आणि श्रीमंतांच्या शाळा, राजकारण्यांच्या शाळा या जोमाने चालतील. भांडवलदारांच्या शाळा या मोठ्या प्रमाणावर चालतील, असा डाव पालिका प्रशासनाचा आहे का ?" असा सवाल या निमित्ताने कांबळे यांनी उपस्थित केला. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोनल करणार असल्याचा इशारा यावेळी कांबळे यांनी दिला.

याबाबत माजी नगरसेवक विलास कांबळे यांनी सांगितले की, गोरगरीब लोकांची शाळा बंद करून राजकीय पुढाऱ्यांच्या शाळा भरायचा हा डाव आम्ही उधळून लावू. येत्या काळात वेळ प्रसंगी आंदोलन करु, असेही ते म्हणाले.



यासंदर्भात माहिती अधिकार कायद्यातून माहिती मिळवणारे युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष शरद शेळके यांनी सांगितले की, शाळा नंबर 11 या परिसरात पोतदार गल्ली, माळी गल्ली, साठे नगर, रोहिदास नगर अशी १२ बलुतेदारांची वस्ती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकवस्ती असताना भाजपच्या नगरसेवकांनी या ठिकाणी मलशुद्धीकरण केंद्र उभा करण्याचा ठराव घेतलाच कसा? सवाल शेळके यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणतात, " मुलांना खेळण्यासाठी मैदान उरली नाहीत. त्यात मोकळ्या मैदानावर पालिका शुद्धीकरण केंद्र उभा करत आहे. हा येथील रहिवाशी नागरिकांचा अपमान आहे. येत्या काळात या नागरसेवकांना येथील नागरिक जागा दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही. येत्या काळात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहोत," असा इशारा त्यांनी दिला आहे.

नगरपालिकेचे म्हणणे काय?

याबाबत तासगाव पालिकेचे मुख्यधिकारी पृथ्वीराज पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, " नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. कापूर ओढ्याच्या शेजारी व कंपाऊंड भिंतीच्या किंचित आतमध्ये हे शुद्धीकरण केंद्र उभा करणार आहोत. शहरातील कोणत्याही नागरिकांच्या आरोग्याला या केंद्राचा धोका होणार नाही किंवा त्याची बाधा होणार नाही. शहरातील नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन हे प्रक्रिया केंद्र उभे केले जात आहे" अशी माहिती त्यांनी दिली.

मैदान संपुष्टात येईल अस नागरिकांना वाटते या प्रश्नावर ते म्हणाले की, "नागरिकांना भीती वाटायचं काही कारण नाही. जर कोणाला काही शंका असतील तर, त्यांनी मुख्यधिकारी यांच्याशी संपर्क करावा भूलथापांना बळी पडू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. लोकांच्या सोयीसाठी व शहरातील स्वच्छतेसाठी हे केंद्र उभारत असल्याचे त्यांनी लोकांना सांगितले.

पण या मुद्द्यावरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मलशुद्धीकरण केंद्र होण्यास आमचा विरोध नाही, मात्र ते शहरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असले पाहिजे, असे मत काँग्रेसचे तासगाव तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले नगरपालिकेच्या शाळा म्हणजे गोरगरिबांच्या शाळा आहेत. त्या शाळा टिकल्या पाहिजेत. त्या ठिकाणची मैदाने टिकली पाहिजेत. त्या शाळेच्या आवारात साधारणपणे पाच हजार लोकांची वस्ती आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे, याकडे पालिका प्रशासनाने प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. यासर्व बाबींचा विचार करून पालिकेने प्रकल्प हाती घेण्याची गरज होती. मात्र तसे चित्र या ठिकाणी दिसत नाही. पालिकेने शुद्धीकरण केंद्राची जागा बदलावी अन्यथा येत्या काळात काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी महादेव पाटील यांनी दिला आहे.

या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होते आहेत, त्याची उत्तरं नगरपालिका देत नाहीये. असे प्रकल्प नागरी वस्तीजवळ उभे करताना जे निकष असले पाहिजेत त्याचे पालन होते आहे का, नगरपालिका नागरिकांनी विश्वासता का घेत नाहीये, आणि मागासवर्गीय वस्त्यांजवळच हा प्रकल्प का रेटला जातो आहे, या प्रश्नांची उत्तरं सत्ताधारी देतील का हा खरा प्रश्न आहे.

Similar News