जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके येथील बालगृहात वर्षभरात पाच अल्पवयीन मुलींवर काळजी वाहकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . याप्रकरणी काळजी वाहक, अधीक्षक व सचिव अशा तीन जणांविरुद्ध पोक्सो व अॕट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बालगृहाचा काळजीवाहक गणेश शिवाजी पंडित (वय ३२) व अधीक्षिका अरुणा गणेश पंडित (वय २९ ) यांना ताब्यात घेण्यात आलय. धक्कादायक म्हणजे हे दोघे पती पत्नी आहेत.
एरंडोल तालुक्यातील खडके गावात मुला-मुलींचे बालगृह आहे. गेल्या वर्षभरापासून येथील काळजीवाहक गणेश पंडित हा पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत होता. मुलींनी वेळोवेळी अधीक्षक व सचिव यांच्याकडे तक्रारी करूनही त्यांनी दुर्लक्ष केले.
महिला व बालकल्याण समितीकडे मुलींनी तक्रार केली. मुलींचे समिती सदस्यांपुढे जबाब घेण्यात आले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी तसेच बाल कल्याण समिती जळगाव बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट यांच्या आदेशाने पिडीत मुलींना जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे बालगृह संस्थेत तात्पुरत्या स्वरूपात जळगाव येथे दाखल करण्यात आलय. एरंडोल पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. एरंडोल पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद बागल यांच्या फिर्यादीवरून काळजीवाहक, अधीक्षक आणि सचिव अशा तिघांविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे