लसीकरणाचा गोंधळ : साडे तीन लाख लोकांकरीता फक्त दोनच लसीकरण केंद्र...

देशासह महाराष्ट्रामध्ये लसीकरणाचा जो गोंधळ सुरू आहे त्याचेच प्रातिनिधीक स्वरूप आपल्याला ठाणे महानगर पालिकेच्या दिवा प्रभागात पाहायला मिळत आहे.;

Update: 2021-08-15 13:30 GMT

ठा.म.पा क्षेत्रातील लसीकरण केंद्रांची कमतरता असलेल्या दिवा प्रभाग समितीमध्ये शनिवारी (१४ ऑगस्ट) ला अखेर दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. दिवेकऱ्यांनी केलेल्या सततच्या मागणीला आता यश आले आहे. परंतू या दोन्ही केंद्रांवरची परीस्थिती जैसे थेच आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याची घोषणा केली होती. यानंतर लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समितीमध्ये देखील लसीकरण केंद्राच्या कमतरतेमुळे, प्रभागात असलेल्या एकमेव लसीकरण केंद्रावर तौबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मॅक्स महाराष्ट्रने देखील यापूर्वी या केंद्रावरील सावळा गोंधळ उघडकीस आणला होता तसेच नागरिकांची ज्यादा लसीकरण केंद्रांची मागणी देखील उचलून धरली होती. अखेरीस या मागणीला यश आले असून दिव्यात दातीवली मधील गणेश विद्या मंदिर येथे आणखी एक नवं लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतू परीस्थिती जैसे थेच आहे.


काय आहे दिव्यातील लसीकरण केंद्रांची सद्यस्थिती

ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीमध्ये दिवा, साबे, मुंब्रा देवी कॉलनी, ओंकार नगर, बेडेकर नगर, गणेश नगर, दातिवली, बेतवडे, एन. आर. नगर, शिळ, दिवा नाका इत्यादी भागांचा समावेश होतो. या दिवा प्रभाग समितीमधील लोकसंख्या आजच्या घडीला साडे तीन लाखांच्या घरात आहे. परंतू इतक्या लोकसंख्येसाठी दिव्याच्या मध्यवर्ती भागात एस.एम.जी. विद्यामंदिर येथे फक्त एकच लसीकरण केंद्र होते. या लसीकरण केंद्रासाठी ठा.म.पा.कडून फक्त ३०० डोस उपलब्ध करण्यात येतात. या ३०० डोससाठी रात्री २ वाजल्यापासून लोक रांगा लावतात. त्यातील पहिल्या आणि दुसऱ्या १३५/१३५ डोस विभागले जातात. उर्वरीत १० टक्के डोस हे गर्भवती आणि अपंगांसाठी राखीव ठेवले जातात. या रांगेत पहिल्या डोसकरीता जवळपास ४०० ते ५०० जण रांगेत ताठकळत उभे असतात. ७ ते ८ तास रांगेत उभं राहुनसुध्दा अनेकांना लस न घेताच घरी परतावं लागतं.

यावेळी तेथील स्थानिक नागरीक अमोल साबळे यांच्याशी मॅक्स महाराष्ट्र ने संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, "गेले पाच दिवस झाले मी रोज इथे येऊन रांगेत उभा राहतोय. टोकन वाटप होत असताना एकच गोंधळ उडतो त्यावेळी रांगेतील मागे उभी असलेली लोकं पुढे येतात आणि टोकन घेऊन जातात. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासुन मी रांगेत उभा आहे परंतू आज(शनिवारी) झालेल्या गोंधळामुळे मला पुन्हा टोकन मिळालं नाही. आजही मला लस न घेताच रिकाम्या हाती परतावं लागत आहे."


रांगेत उभ्या असलेल्या उज्वला सिंह यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शासनाविषयी आपला रोष व्यक्त केला. त्या म्हणाल्या, " मी रात्री ८.३० वाजल्यापासुन रांगेत उभी आहे. घरी लहान मुलीला आईजवळ सोडुन आले आहे. सगळ्यांनी व्यवस्थित रांग लावली होती, मीही त्यात उभी होते. परंतु अचानक गोंधळ उडाला आणि मागचे पुढे आले आणि पुढचे मागे गेले. आता आम्ही काय करणार? आम्हाला लसींची तर गरज आहे. रात्रभर जागे राहुन आम्ही आजारी पडू...आम्हाला काहीही करा पण लस उपलब्ध करून द्या."

लसीच्या पहिल्याच डोसपासुन अद्यापही उपेक्षित असलेले देविदास गाढवे म्हणतात, "अजुनही पहिलाच डोस मिळाला नाहीये तर मग आम्ही कामाधंद्याला कसं जाणार? चार दिवस झाले मी लस घ्यायला येतोय परंतू टोकन काही मिळत नाही त्यामुळे लसीचा पहिलाच डोस अजुन मिळालेला नाही."


भाजपने केले होते आंदोलन

लसीकरण केंद्राच्या या कमतरतेमुळे ठाणे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दिवा प्रभाग समिती कार्यालयावर शुक्रवारी(१३ ऑगस्ट) ला आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी प्रभाग समिती च्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांची भेट घेऊन लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याविषयी निवेदन दिले होते.



"दिव्यातील जनतेवर हा सर्वात मोठा अन्याय आहे. ५ ते ६ लाख लोकसंख्या असलेल्या दिवा प्रभाग समितीमध्ये केवळ एकच लसीकरण केंद्र असणं यावरून महापालिकेने या प्रभागावर साफ दुर्लक्ष केले आहे हेच सिद्ध होतं." अशी प्रतिक्रिया ठा.म.पा भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारवर देखील यावेळी त्यांनी टीका करताना ते म्हणाले,"एकीकडे देशात राज्यामध्ये सर्वात जास्त लोकांचं लसीकरण झाल्याचे सांगून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची तसेच आरोप झाले की केंद्रावर ढकलायचं आणि राज्यावर अन्याय झाला म्हणायचं. देशात लसीकरणात राज्य प्रथम येत असेल तर मग सरकारने स्वतःच्या घरातून लसींचा पुरवठा केला का? केंद्रानेच दिल्या ना... त्यामुळे सरकारने हे असलं दुहेरी बोलणं थांबवावं."

सत्ताधारी शिवसेनेचा भाजपला टोला

शनिवारपासून सुरू झालेल्या नव्या लसीकरण केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ठाण्याचे माजी उपमहापौर तसेच दिव्याचे शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी हे स्वतः उपस्थित होते. यावेळी," दिवा प्रभागात अंदाजे साडे तीन लाख लोकं राहतात. त्यांच्यासाठी दोनच लसीकरण केंद्र पुरेशी नाहीत परंतु आम्ही सातत्याने महापौरांकडे मागणी केली आणि त्यामुळे हे नवं लसीकरण केंद्र आजपासून (१४ ऑगस्ट) सुरू होतंय. आम्ही दिवा पश्चिम, साबे गाव, मुंब्रा देवी कॉलनी, अशा आणखी काही लसीकरण केंद्रांची मागणी केली आहे . ती लवकरच मंजूर देखील होईल अशी आम्हाला आशा आहे.", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


याशिवाय त्यांनी भाजपने केलेलं आंदोलन निरर्थक असल्याची टीका केली. ते पुढे म्हणाले," भाजपने हे आंदोलन का केलं हेच मुळी मला कळालं नाही. दिव्यातील वाढती लोकसंख्या पाहता आम्ही आधीच महापौरांकडे आणखी एका लसीकरण केंद्राची मागणी केली होती आणि ती त्यांनी मान्य करत दातीवली मधील गणेश विद्या मंदिर येथे नवं लसीकरण केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली होती. या नव्या लसीकरण केंद्राच्या व्हेरिफिकेशन साठी जवळपास आठवड्याभराचा कालावधी लागला. आज जेव्हा हे लसीकरण केंद्र सुरू होतंय तेव्हा त्यांनी श्रेयवादासाठी हे आंदोलन केले आहे.", असे ते यावेळी म्हणाले.

मॅक्स महाराष्ट्र ने नव्या लसीकरण केंद्रावरील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना लसींच्या पुरवठ्याबद्दल विचारणा केली त्यावेळी ते म्हणाले," नव्या लसीकरण केंद्राचा आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे इथे कोव्हिशिल्ड लसीचे २०० डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. पहिलाच दिवस असल्याने पहिल्या आणि दुसरा डोस घेणाऱ्यांकरिता लसींचा विभागणी केलेली नाही. येथील परिस्थितीचा अंदाज घेऊन लसींची विभागणी येत्या दिवसात व्यवस्थित विभागणी केली जाईल. परंतु सद्यस्थितीत आम्ही वृद्ध, अपंग तसेच गर्भवती स्त्रियांना प्राधान्य देत आहोत."


ही अशी भीषण परिस्थिती असताना साडे तीन लाख लोकांचे लसीकरण करण्यासाठी दोनच केंद्र पुरेशी ठरणार का? इथल्या लसीकरण केंद्रांची संख्या भविष्यात वाढणार का? चार चार दिवस रांगेत उभं राहणाऱ्या दिवेकराला त्याच्या हक्काची लस उपलब्ध होणार का? की ठाणे महानगर पालिकेचा ढिसाळ नियोजनाचा हा प्रकार असाच सुरू राहणार? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

Tags:    

Similar News