आम्ही खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं
बाबासाहेबांनी आम्हाला अंधारातून उजेडात आणलं, घाणीतून वर काढलं एवढंच नाही तर आम्ही जी सुखाने भाकरी खात आहोत, त्यामागेही बाबासाहेबांची पुण्याई असल्याचं मत बुलढाणा जिल्ह्यातील एका वृध्द महिलेनं व्यक्त केलं आहे. याविषयी सविस्तर जाणून घेतलं आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी;
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त लाखो लोक चैत्यभुमीवर दाखल होत असतात. त्यातच एक आजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आली होती. यावेळी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी त्या वृध्द आजीशी संवाद साधला. यावेळी प्रत्येक शब्दातून आजी बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत होती.
यावेळी बोलताना आजी म्हणाली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या गावकुसाबाहेरच्या दलित समाजाला अंधारातून उजेडात आणलं. घाणीत जीवन जगत होतो. तिथून आम्हाला वर काढलं. आमचं आयुष्य बाबासाहेबांमुळं बदललं. आता आमच्या घरात प्रत्येक सुख-सुविधा आहेत. त्या फक्त बाबासाहेबांमुळेच. एके काळी गावकुसाबाहेर जगणारा दलित समाज सध्या सन्मानाने जीवन जगत आहे ते बाबासाहेबांमुळे आणि रमाई मातामुळेच, अशी भावना आजीने व्यक्त केली.
तसेच पुढे बोलताना आजी म्हणाल्या, बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मंत्र दिला आहे. मात्र सध्या पालकांमुळेच मुलं शाळेपासून लांब राहत आहेत. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी ही पालकांची असते. मात्र बहुतेक वेळा मुल शाळेत जायला नकार देतं, तेव्हा आई-वडील ठीक आहे म्हणतात आणि शेतात काम करण्यासाठी घेऊन जातात. यातूनच मुलं शाळेपासून लांब जात आहेत आणि बाबासाहेबांच्या मुलमंत्रापासूनही. त्यामुळे बहूजन समाजातील मुलांनी शिकलं पाहिजे, असंही आजी यावेळी म्हणाल्या.