Ground Report : पालघरचा जुना राजवाडा मोजतोय अखेरच्या घटका, ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

गड किल्ल्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण राज्यात अशाच अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्यांच्या संरक्षणाची गरज आहे. या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष केले गेले तर काय होते, याचे वास्तव मांडणारा रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Update: 2022-01-13 14:17 GMT

एकीकडे राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे दावे सरकारकडून केले जात आहेत, पण दुसरीकडे आदिवासी भागातील ऐतिहासिक वास्तुंकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या जनतेच्या अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या जुन्या राजवाड्याच्या वास्तूची दुरवस्था झाली आहे.  



 


जव्हारमधील जुना राजवाडा हा इथल्या नागरिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद वास्तू आहे. सुमारे २६४ वर्षांपूर्वीचा हा वाडा आहे. पण जव्हारच्या इतिहासाताची साक्ष देणाऱ्या जव्हारमधील जुन्या राजवाड्याची अवस्था बिकट झाली आहे.जीर्णोद्धार होत नसल्याने तटबंदी व इमारत अखेरची घटका मोजत आहे.

जव्हारचे दिवंगत राजे यशवंतराव मुकणे यांनी आपल्या मालकीच्या अनेक वास्तू जव्हार नगरपरिषदेला दान स्वरूपात दिल्या होत्या. हा जुना राडवाडा देखील नगर परिषदेला दान करण्यात आला होता. पण जव्हार नगरपरिषदेने आजवर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न केल्याने ही ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे.  



 


नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे येथे गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. नगारखान्यावर झाडे उगवली आहेत, त्याची तटबंदी कधीही ढासळू शकते अशी स्थिती आहे. राजदरबार, उद्याने, पाण्याचा तलाव, घोडयांच्या पागा, विहीर, भव्य पटांगण, कडेकोट भिंती आणि चारी दिशांनी असणारे बुरुज असे या राजवाडयाचे वैभव होते. सुमारे २१ हजार चौ.मी. क्षेत्र असलेला हा जुना राजवाडा आज जव्हार नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. खुले नाटयगृह, शिक्षण मंडळाचे कार्यालय, व्यायामशाळा, क्रीडांगण, गणपती सभागृह, पाण्याचे उंच जलकुंभ, अशा नागरी सुविधांसाठी या राजवाडयाच्या इमारतींचा वापर केला जातो. ही ऐतिहासीक वास्तू असल्याने पुरातत्व खात्यानेही इकडे द्यावे अशी मागणी जव्हारवासी करीत आहेत.

या परिसरातील कारागीरांनी जव्हार जवळील न्याहळे येथील कावळ्याचा बांध खाणीतील मजबूत व सुंदर दगडातून हा राजवाडा बांधण्यात उभारला होता. पुढे राजे कृष्णशहा यांनी राजवाड्याचा विस्तार करून अतिभव्य असा नगारखाना, गणपती मंदिर व अनेक खोल्यांचा विस्तार केला. जव्हार नगरपरिषदेने नुकतेच शंभर वर्षे पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे, पण इथे विकास आणि ऐतिहासिक वास्तुंची काळजी याचा अभाव दिसतो आहे. या वाड्याच्या दुरवस्थेबद्दल अधिकारी सरकारी उत्तर देऊन मोकळे होत आहेत. या वाड्याच्या नुतनीकरणासाठी निधीची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे लवकरात लवकर निधी मिळाला की काम सुरू करण्यात येईल असे उत्तर जव्हार नगरपरिषदेचे सीओ वैभव आवारे यांनी सांगितले.  



 


एकीकडे जव्हार नगरपरिषद या राजवाड्याच्या विकासासाठी आदिवासी सृष्टी निर्माण करणार असल्याचे सांगते आहे तर दुसरीकडे ऐतिहासिक वास्तू असलेल्या जुन्या राजवाड्याच्या मागील बाजूस नगरपरिषदेने डम्पिंग ग्राऊंड तयार केले आहे. निसर्गाने भरभरून दिलेले जव्हार हे नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. जव्हारला ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला व परंपरेचा समृद्ध वारसा आहे. मात्र, त्यांचा विकास झालेला नाही. ठाकरे सरकारने दखल घेऊन जव्हारला पर्यटन स्थळाचा ब दर्जा दिला आहे, पण या राजवाड्याच्या दूरवस्थेवरुन हे केवळ कागदी घोडे तर ठरणार नाही ना अशी भीती पालघर दिल्ह्यातील जनतेला वाटते आहे.

Tags:    

Similar News