जागेअभावी शाळा मंदिरात भरवण्याची वेळ

एका बाजूला 'देशात मंदिर वही बनायेंगे' असं घोषणांचे राजकारण होत असताना वर्ग खोल्याअभावी शाळा देवळात भरत असून विद्यार्थ्यांची हेळसांड झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी जागेच्या संदर्भात लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट...;

Update: 2022-02-13 13:44 GMT

 ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया मजबूत करणाऱ्या मानल्या जातात.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकावल्या आहेत.याच जिल्हा परिषदेच्या शाळेतून महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांची जडणघडण झाली आहे.अनेकजण शासकीय नोकरीत मोठ्या हुद्यावर काम करीत आहेत.लाखों विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम या जिल्हा परिषदेच्या शाळांनी केले आहे.समाजातील शोषित, वंचित व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असणाऱ्या वंचित वर्गाला शिक्षणाच्या रूपाने याच जिल्हा परिषदेच्या शाळेने मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.त्यांना ताठ मानेने जगायला शिकवले.शिक्षणामुळे त्यांच्या आचार,विचार आणि राहणीमानात अमुलाग्रह बदल झाला आहे.त्यांना जगातील बदलत्या घडामोडींची जाणीव होऊ लागली.याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांनी परदेशी शिक्षणापर्यंत मजल मारली आहे.पण बदल्या काळानुसार या जिल्हा परिषदेच्या शाळांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.




 


अशीच अवस्था सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गोटेवाडीच्या शाळेची झाली आहे. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेने अनेक पिढ्या घडविल्या त्याच शाळेची आज दैनिय अवस्था झाली आहे.मौजे गोटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारती धोकादायक झाल्या म्हणून गेल्या दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आल्या.पण जागेअभावी त्या बांधता आल्या नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे.प्रशासनाने शाळेच्या बांधकामासाठी वर्ग खोल्या मंजूरही केल्या होत्या.परंतु जागेअभावी त्या बांधल्या गेल्या नाहीत.त्यामुळे गोटेवाडी गावात असणाऱ्या महादेव मंदिर,मारुती मंदिर व समाज मंदिरात वर्ग भरत असून पुरेशा साधनसामग्री उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शाळेच्या जागेसंदर्भात लक्ष घालून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.

एक वर्ग गटाराच्या कडेला तर दुसरा वर्ग नागरीकांची वर्दळ असणाऱ्या चौकात भरतो

गोटेवाडी गावची लोकसंख्या 3 हजाराच्या आसपास आहे.या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत.पण गेल्या दोन वर्षापूर्वी वर्ग खोल्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक झाल्याने त्या पाडण्यात आल्या होत्या.पण वर्ग खोल्या बांधण्यास अडचणी आहेत.त्यामुळे शासनाने शासनाच्या गायरानात शाळा बांधण्यास परवानगी देण्यात यावी.अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे. वर्ग खोल्या पाडल्याने शाळेचे वर्ग उघड्यावर झाडाखाली भरत आहेत.शाळेचा वर्ग भरत असलेल्या जवळून मोठी गटार वाहत असून एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे.6 वर्ग खोल्या पाडण्यात आल्या होत्या असे येथील गावकऱ्यांनी सांगितले.त्यापैकी दोन वर्ग देवळात तर दोन वर्ग समाजमंदिरात तर एक वर्ग उघड्यावर झाडाखाली भरत आहे.गावातील मुख्य चौकात शाळेचा वर्ग भरत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. विद्यार्थ्यांच्या वर्गापासून ऊस वाहतूक करणारी वाहने व इतर वाहनांची वाहतूक होते.ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये गाणी लावली जात असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यासाठी शासन,प्रशासनाने शाळेच्या जागेचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी इच्छा ग्रामस्थांची आहे.

शाळेसाठी जागा पडतेय अपुरी


 



गोटेवाडी गावचे उपसरपंच दत्तात्रय व्होनमाने यांनी बोलताना सांगितले की,23 मार्च 2019 रोजी जिल्हा परिषदेच्या विभागाकडे अ, ब,क,ड प्रस्ताव सादर करून शाळेच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी जागेची मागणी केली होती.पूर्वीची जिल्हा परिषदेची एकूण 4 गुंठे जागा आहे. त्या जागेमध्ये किचन शेड,विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता गृह किंवा वर्ग खोल्यांचा विचार केल्यास मुलांना खेळण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही.26 जानेवारी व 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या वेळेस जागा अपुरी पडते.त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवले की,गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या गायरान गट नंबर 156 मध्ये शाळेच्या वर्ग खोल्यांचे स्थलांतर करायचे व त्याठिकाणी वर्ग खोल्या बांधायच्या त्यासाठी जिल्हा परिषदेकडे अ, ब,क,ड प्रस्ताव सादर केला आहे.

रस्त्याच्याकडेला शाळा असल्याने मुलींचा झाला अपघात

या शाळेच्या जवळून ऊस वाहतूक व इतर वाहनांची रेलचेल असते.वाहने भरधाव वेगाने जा-ये करतात.रस्ता शाळेच्या जवळून असल्याने सतत वाहनांचा गोंगाट असतो.वाहनातील गाण्याचा आवाज मुलांचे लक्ष विचलित करतो.शाळा गावातील मुख्य चौकात असल्याने नागरिकांची वर्दळ असते.गेल्या दोन वर्षांपूर्वी वाहनाच्या धडकेत एका मुलीचा अपघात झाला होता तर दुसऱ्या मुलीचा पाय मोडला होता.त्यामुळे शाळा गावापासून जवळ असणाऱ्या गायरानावर बांधण्यात यावी.अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.महादेव मंदिराच्या पटांगणात एक वर्ग भरत असून त्याजवळून गटार वाहत आहे.त्या पाण्यात मुले खेळतात.त्यामुळे प्रशासनाकडे जागेसंदर्भात सतत पाठपुरावा करत आहोत.पण प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.शाळेच्या बांधकामासाठी सर्व प्रकारच्या एनओसी दिल्या असून फक्त वनविभागाची राहिली आहे.

वनविभागाच्या आडकाठी धोरणामुळे शाळा बांधण्यास अडचण

दत्तात्रय व्हनमाने यांनी सांगितले की, शाळा बांधकामाच्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या आहेत.फक्त वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे शाळा बांधणीला आडकाठी येत आहे.वनविभागाच्या ऑफिसला काही दिवसांपूर्वी गेलो होतो.त्यावेळी त्यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,वनविभागाच्या गट नंबर 157 च्या सीमा निश्चित नसल्याने शाळा बांधण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देता येत नाही.गट नंबर 156 हा गायरान जमीन आहे. तर 157 हा वनविभागाचा गट नंबर आहे. पण 156 गट नंबर मध्ये आमचा काही संबंध नाही असे वनविभाग लेखी देण्यास तयार नाही.त्यामुळे शाळा आजपर्यंत उघड्यावर भरत आहे.

शाळेची होते घुसमट

पाठीमागच्या काळात दोन वर्ग खोल्या मंजूर झाल्या होत्या.जागेअभावी त्या माघारी गेल्या आहेत.या शाळेसमोर चौक आहे.येथेच महादेवाचे मंदिर,मारुतीचे मंदिर,खंडोबाचे मंदिर आहेत. यात्रेच्या काळात या शाळेला दोन दिवसांची सुट्टी द्यावी लागते.मुलांच्या क्रीडागणाची अडचण आहे.समोरच्या रस्त्यावरून वाहने वहात असल्याने मुलांना बागडता येत नाही. त्यामुळे शाळा गायरानात बांधणे आवश्यक आहे.असे मत व्हनमाने यांनी मांडले.

शिकवण्यासाठी शिक्षकांना येतेय अडचण

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी खांडेकर यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की,शाळेला जागा नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. वर्ग देवळात आणि समाज मंदिरात भरत असल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना अडचणी येत आहेत.शाळा व मंदिरासमोरून वाहने वहात असल्याने विद्यार्थ्याचे लक्ष विचलित होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. वनविभागाने आपला अभिप्राय लवकर देऊन शाळा बांधणीचा मार्ग मोकळा करावा.

शाळेच्या बांधकामासाठी मंजूर झालेला निधी गेला परत

गोटेवाडी येथील शाळेच्या बांधकामासाठी दोन वर्ग खोल्या मंजूर झाल्या होत्या.पण जागेअभावी त्यांचा निधी परत गेला आहे. ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडून जागेच्या संदर्भात तात्काळ मंजुरी आणल्यास पहिल्या टप्प्यात 3 वर्ग खोल्या तर दुसऱ्या टप्प्यात 3 वर्ग खोल्या मंजूर करण्यात येतील असे मोहोळचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी यांनी सांगितले.


Full View

Tags:    

Similar News