इथे शाळेच्या गेटसमोर होतात मृतदेहांवर अंत्यसंस्कार
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही राज्याच्या अनेक गावात स्मशानभूमी तयारच झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक गावातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाफळे गावच्या परिसरात असलेली स्मशानभूमी असून नसल्यासारखी आहे. त्यामुळेच या गावातील नागरिकांना स्मशानभूमी अभावी उघड्यावरच माध्यमिक शाळेसमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट....;
देशात विविध जाती धर्माचे लोक राहत असून भारतीय संविधानाने त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे. देशात हिंदू.मुस्लिम,ख्रिचन,बौद्ध या धर्मा बरोबरच अनेक जाती धर्माचे लोक राहत असून प्रत्येक जाती धर्माच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक धर्मातील माणसांच्या मृत्यू नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धती ही वेगवेगळ्या आहेत.
त्यामुळेच ग्रामीण भागासह शहरी भागात वेगवेगळ्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्मशानभूमी,दफनभूमी पहायला मिळतात. स्मशानभूमी वरून अनेक जाती धर्मातील वाद अनेकदा उफाळून आले आहेत. काही ठिकाणी तर स्मशानभूमीत मृतदेह जाळू न देण्यापर्यंत लोकांची मजल गेली असल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. त्यामुळेच अलीकडच्या काळात शासनाने एक गाव एक स्मशानभूमी असा उपक्रम राबवून एका गावात एकच स्मशानभूमी योजना राबविली आहे.
परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही राज्याच्या अनेक गावात स्मशानभूमी तयारच झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक गावातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाफळे गावच्या परिसरात असलेली स्मशानभूमी असून नसल्यासारखी आहे. त्यामुळेच या गावातील नागरिकांना स्मशानभूमी अभावी उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. या गावात स्मशानभूमी असून ती खंडोबाचीवाडी या गावच्या शिवेवर आहे. वाफळे गाव आणि खंडोबा वाडीच्या शिवे मधील अंतर चार किलोमीटरचे असून या ठिकाणी वाफळे गावातील एखादी व्यक्ती मृत पावली तर चार किलोमीटर लांब घेवून जाणे शक्य होत नाही. वाफळे गावच्या पश्चिम दिशेला वन विभागाची जमीन असून या जमिनीला लागूनच जगदंबा नावाचे माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात सुमारे तीनशे च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या समोरच वन विभागाची जमीन असून या जमिनीवर उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांनी स्मशानभूमीसाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी केली आहे.
पावसाळ्यात होते नागरिकांची गैरसोय
या गावातील एखादी व्यक्ती पावसाळ्याच्या दिवसात मृत्यू पावली तर ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. पाऊस उघडे पर्यंत त्यांना थांबावे लागते. त्यासाठी तासनतास वाट पाहत बसावे लागते. उघड्यावर असणारी स्मशानभूमी वाफळे गावातून जाणाऱ्या शेटफळ रोडवर असणाऱ्या वन विभागाच्या जागेवर आहे. या स्मशानभूमीच्या समोरच्या बाजूला शाळा असून याठिकाणा वरून सातत्याने विद्यार्थी,शेतकरी यांची वर्दळ असते. रिमझिम पावसात मृतदेहाला अग्नी देत असताना सरणावर पत्रे देखील धरावे लागले असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मृतदेहाला अग्नी देई पर्यंत नागरिक पावसातच ताटकळत थांबतात. यामध्ये महिलांचा ही समावेश असतो. आमची वर्षानुवर्षे गैरसोय होत असून प्रशासनाने आमची सोय करावी,अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
स्मशानभूमी असूनही नसल्यासारखी
या गावात स्मशानभूमी आहे,परंतु ती गावापासून चार किलोमीटर अंतरावर असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. गावातून चार किलोमीटर मृतदेह घेवून जाणे शक्य होत नाही. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेवून जात असताना यामध्ये वृध्द पुरुष,महिला देखील सहभागी झालेल्या असतात. त्यांना चार किलोमीटर चालणे शक्य होत नाही. ही जी स्मशान भूमी बांधण्यात आली आहे,ती एका खासगी जागेत बांधली असून तेथे गावातील कोणीच अंत्यसंस्कारासाठी जात नाहीत. त्यामुळे ही स्मशानभूमी म्हणजे असूनही खोळंबा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून नाही दिल्यास तहसील कार्यालयासमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा ग्रामस्थाचा इशारा
वाफळे या गावची लोकसंख्या जवळपास 7 हजाराची असून येत्या 15 दिवसात स्मशानभूमी साठी जागेची व्यवस्था न केल्यास मोहोळ पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर मृत देहावर अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा शिवसेना शिदे गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव यांनी दिला आहे. याविषयीचे निवेदन त्यांनी मोहोळचे तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांना दिले आहे .
वाफळे गावात स्मशानभूमी साठी राखीव जागा नाही. त्यामुळे वाफळे शेटफळ रस्त्यावरच अंत्यविधी केले जातात. या भीषण समस्येकडे लक्ष वेधत शिंदे शिवसेनेचे नूतन उपजिल्हा प्रमुख संतोष जाधव यांनी गावठाणातून आणि गायरानातून काही जागा राखीव करून तेथे स्मशानभूमीची व्यवस्था करावी. जेणेकरून मृत्यूनंतर होणाऱ्या एका अर्थाने विटंबना असल्येल्या या प्रकारातून वाफळेकरांची कायमची सुटका होईल. यासाठी तातडीने पावले उचलून समस्या सोडवावी अन्यथा यापुढे अंत्यविधी तहसिल आणि पंचायत समिती कार्यालयासमोर करणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या इशार्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गावच्या आसपास स्मशानभूमी बनवण्याची ग्रामस्थांची मागणी
गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर स्मशानभूमी बनवण्यात यावी,अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे. यासाठी प्रशासनाने गावठाण अथवा गायरानची जागा उपलब्ध करून द्यावी. वन विभागाची या गावच्या आजूबाजूने जमीन असून स्मशानभूमी साठी या जमिनीचा सुद्धा प्रशासनाने विचार करावा,असे ग्रामस्थांना वाटते. गावच्या आसपास स्मशानभूमी व्हावी यासाठी ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाकडे मागणी करत आहेत,परंतु प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील नागरिक सांगतात. प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार केलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
तहसीलदारांशी संपर्क केला परंतु उत्तर मिळाले नाही
वाफळे येथील स्मशानभूमीच्या प्रश्नावर मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता. फोन रिसिव्ह केला नसल्याने याबाबतीत त्याचे उत्तर मिळाले नाही.