स्वातंत्र्यानंतरही गावाला स्मशानभूमी नाही...

सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील मुंगशी गावात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला असून स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या गावाला उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मुंगशीच्या ग्रामस्थांना झगडावे लागत आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट

Update: 2022-10-08 14:29 GMT

देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या थाटा - माटात साजरा केला. या निमित्ताने देशाने स्वातंत्र्यानंतर काय कमावले, काय गमावले आणि काय करायचे राहिले,यावर चर्चा होणे अपेक्षित होते. पण चर्चा मात्र राजकारणावर झाली. राजकीय पक्षांनी अमृत आपापल्या पद्धतीने साजरा केला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी मोर्चे काढवे लागतात. वर्षानुवर्षे गटार,पाणी,रस्ते,वीज यावर काम करूनही त्या आहे,तशाच असल्याच्या दिसून येतात. यामुळे जनतेतून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येते. पण राजकारणी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. आजही ग्रामीण भागात स्मशानभूमी विना अनेक गावे उभी आहेत. यावर शासनाने तोडगा काढून स्मशानभूमीचा प्रश्न कायमचा मिटवावे,असे नागरिकांना वाटत आहे.

सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील मुंगशी गावात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला असून स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या गावाला उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मुंगशीच्या ग्रामस्थांना झगडावे लागत आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

उघड्यावरच नदीच्या कडेला केले जातात मृत देहावर अंत्यसंस्कार

मुंगशी गाव मोहोळ - वैराग रस्त्यावर वसलेले असून सुमारे चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहत असून परंपरेनुसार त्यांच्या पूजा अर्चा होतात. येथील ग्रामस्थांची उपजीविका मुख्यतः शेती या क्षेत्रावर अवलंबून असून या गावात निम्मा वर्ग हा शेतमजूर आहे. गाव नदीच्या कडेला वसलेले असल्याने येथे काही प्रमाणत बागायती शेती ही दिसून येते. या चार हजार लोकसंख्येच्या गावात साधारण अडिज ते तीन हजारांच्या आसपास मतदार असून गावच्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ आहे. पण या गावात विविध सोयी - सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. या गावाला स्मशानभूमी नसून गावाने मागणी करून ही स्मशानभूमी मिळत नसल्याने प्रशासन आणि शासनाच्या कारभारावर ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मतदारसंघाचे आमदार ही या ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. या गावच्या कडेवरून नदी वाहत असून या नदीच्या पात्रात मृत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. काही वेळेस नदीला पाणी आल्यास अर्धे मृतदेह देखील वाहून गेल्याचे येथील नागरिक सांगतात. तसेच या पाण्याबरोबर मृतदेहाची राख ही वाहून जाते. त्यामुळे संबधित मृत व्यक्तीचे नातेवाईक निराश होवून तिसरीचा कार्यक्रम रद्द करतात. परंतु अलीकडच्या काळात नदीला सातत्याने पाणी येत असल्याने नदीच्या पलीकडील बाजूस असणाऱ्या खासगी जागेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या खासगी जागेतील शेतकऱ्याने येणाऱ्या काळात मृतदेह जाळू न देण्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Full View

नदीच्या पलीकडे मृतदेह घेवून जाताना ग्रमस्थांचे होतात हाल

मुंगशी गावातील एखादी व्यक्ती मृत पावली तर त्या व्यक्तीवर नदीच्या पलीकडे उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जातात. या नदीवर अगदी लहानसा पुल बांधण्यात आला असून या पुलावरून शेतकरी ये - जा करत असतात. या पुलावरून अंत्यविधीसाठी मृतदेह घेवून जात असताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलावर संरक्षक पोल नाहीत. त्यामुळे या पुलावरून जाताना शेतकरी,वृध्द पुरुष,महिला,लहान मुले नदीत पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुलाला संरक्षक पोल बसण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात येवू लागली आहे. सध्या तरी गावातील ग्रामस्थ नदीच्या पलीकडे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुल ओलांडून जातात. या पुलावरून जात असताना एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे.

गावाला स्मशानभूमीसाठी जागाच नाही

या गावात असणारी गावठाण ची जागा पूर्णपणे व्यापली असल्याने गावाला गावठाणची जागाच शिल्लक राहिली नाही. गावात अनेक ठिकाणी गावठाणच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने ग्रामपंचायत अतिक्रमणे काढण्यासाठी काय भूमिका घेतेय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. कदाचित ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमणे काढल्यास स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध होईल,असे येथील नागरिकांना वाटत आहे. या गावाला स्मशानभूमी साठी निधी आला होता,परंतु जागेअभावी निधी शासनाकडे परत गेला. काही आठवड्यांपूर्वी या गावातील एक वृध्द महिला मृत पावल्यानंतर पुन्हा एकदा स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावच्या कडेला थोडेफार गावठाण शिल्लक असून तेथे राहणाऱ्या नागरिकातून या शिल्लक जागेवर स्मशानभूमी बांधण्यास विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीची अडचण झाली असल्याचे दिसून येते.

गावापासून गायरान आणि वनविभागाची जमीन ही दूर

मुंगशी गावापासून गायरान आणि वनविभागाची जमीन दूर असल्याचे येथील नागरिक सांगतात. नदीच्या पलीकडे शेतकऱ्याची जमीन विकत घेवून ग्रामपंचायतीने स्मशानभूमी बांधल्यास पावसाळ्याच्या दिवसात नदीला पाणी आल्यास नदीच्या पलीकडे मृतदेह घेवून जाणे मुश्किल होणार आहे. त्यावेळेस गावातील ग्रामस्थ आपल्या खासगी जागेत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देणार नाहीत. त्यामुळे भविष्याचा विचार करून ग्रामपंचायतीने स्मशानभूमीसाठी जागा संपादित करावी,असे या गावातील ग्रामस्थांना वाटत आहे.

विशेष ग्रामसभा घेवून यावर तोडगा काढू

मुंगशी गावचे सरपंच रक्षे यांनी बोलताना सांगितले,की गावाला गावठाणची जागा शिल्लक नसल्याने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. गायरान आणि वन विभागाची जमीन गावापासून लांब आहे. या स्मशानभूमीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायती च्यावतीने विशेष ग्रामसभा बोलावून यावर तोडगा काढला जाईल. असे सरपंच रक्षे यांनी सांगितले.

गावातील जागेची पाहणी करून निर्णय घेवू - तहसीलदार

स्मशानभूमीच्या प्रश्ना संबधी बार्शीचे तहसीलदार शेरखाने यांनी सांगितले, की गावात जावून गावठाण जागेची पाहणी करून निर्णय घेवू.

Tags:    

Similar News