शोषखड्यांचा बरवाडपाडा पॅटर्न
पालघर जिल्ह्यातील जव्हार मधील बरवाडपाडा या ग्रामपंचायतीने सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्लास्टिक टाक्या वापरून शोषखड्ड्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. त्यामुळे जव्हारच्या अतिदुर्गम भागातील बरवाडपाडाची यशोगाथा केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर झळकली आहे.;
पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील बरवाडपाडा या ग्रामपंचायतीने घरांमधील सांडपाण्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी प्लॅस्टिक टाक्याचा वापर केला आहे. खर्चिक सिमेंटच्या टाकीऐवजी कमी खर्चाच्या या टाक्या वापरून गावाने शोषखड्डे तयार केले आहेत. नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला आहे.
बरवाडपाडा गावाच्या या उपक्रमाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. हे नाविन्यपूर्ण कार्य भारत सरकारच्या ग्रामीण स्वच्छता विभागाच्या संकेतस्थळवर यशोगाथा म्हणून प्रसिद्ध केला आहे. दादरा नगर हवेली व जव्हार तालुक्याच्या सीमेवर अतिदुर्गम भागात वसलेल्या बारवाडपाडा येथे 189 कुटुंबांतील 1039 लोकसंख्या आहे. गावातील सांडपाणी रस्त्यावर किंवा अन्यत्र सोडून देत असल्याने गावचे आरोग्य धोक्यात होते. त्यासाठी सरपंच अनिल मौळे व ग्रामसेवक प्रशांत सोनेरी यांनी शोषखड्डा संकल्पना अमलात आणण्याचे ठरवले व गावानेही त्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला.
शोष खड्डासाठी लागणारे साहित्य पुरवणारा ठेकेदार याठिकाणी उपलब्ध होत नव्हता. गावानेच यातून मार्ग काढण्याचे ठरवले व खर्चिक बाबी ऐवजी सहज उपलब्ध होणाऱ्या प्लास्टिक टाक्यांच्या माध्यमातून शोष खड्डा तयार करण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आली. ग्रामपंचायतीच्या निधीतून या प्लास्टिक टाक्या खरेदी करून लाभार्थीना वितरित केल्या. रोजगार हमीद्वारे नागरिकांना मजुरी म्हणून मिळालेल्या पैशातून टाक्याचे पैसे नागरिक ग्रामपंचायतीला परतफेड करणार आहेत. गावातील तब्बल 156 कुटुंबांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक शोषखड्डेसाठी अर्ज केला व ही कामे पूर्ण झाली. 33 कामे प्रगतीपथावर आहेत. एका शोषखड्ड्यासाठी 2750 इतका खर्च येत आहे. ते तयार करण्यासाठी लाभार्थींना अकुशल व कुशल कामगार मजुरी रोजगार हमी योजनेतून मिळत आहे. प्लॅस्टिक टाक्या सिमेंट टाक्याच्या तुलनेत किफायतशीर, वाहतूक करण्यास सोप्या, 10 वर्षांहून अधिक काळ टिकू शकतात आणि त्यांना स्वच्छ करणे सोपे आहे. कमी खर्चात हा उपक्रम राबविल्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. या उपक्रमामध्ये तरुण व महिलांचा सहभाग लक्षणीय होता. भूजल पातळीचे पुनर्भरण देखील यामुळे होणार असल्याने परिसरात पाण्याची उपलब्धता वाढेल.स्वच्छ भारत मिशन ही योजना रोजगार हमी मध्ये रुपांतरीत करून कमी खर्चाची टिकाऊ उपक्रम हाती घेतल्याने याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे पुढे हा उपक्रम जिल्ह्यातील गावांमध्ये राबविण्याचा संकल्प असल्याचे पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ सिद्धाराम सालीमठ, यांनी सांगितले
कृती आराखडा:
2.80 लाख रुपये खर्चून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी 2021-2022 मध्ये जिल्हा कृती आराखड्यात या गावाचा समावेश करण्यात आला आहे. अनेक संशोधने केल्यानंतर, सरपंच, ग्रामसेवक यांनी गावातील नागरिकांना सामुदायिक स्तराऐवजी वैयक्तिक स्तरावर निवडण्यास जनजागृती केली व त्यातून उपक्रमाचे महत्व पटवून दिले. रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थीनी शोष खड्डा निवडला.
प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे प्रयत्न
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,अतुल पारसकर, जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांचे सक्रिय पर्यवेक्षण व बरवाडपाडा गावचे सरपंच अनिल मौळे, ग्रामसेवक प्रशांत सोनेरी यांनी गावांतील नागरिकांना शोषखड्डे उपक्रमाचे महत्व पटवून देऊन नागरिकांच्या सहभागाने ही योजना तयार केली व तिला मूर्त रूपही मिळाले आहे.
शोष खड्ड्यांमध्ये 5X5X5 फूट आकाराचे खड्डे तयार केले जातात. खड्ड्याच्या मध्यभागी 100-लिटर क्षमतेची प्लास्टिकची टाकी ठेवली जाते.आजूबाजूला वाळू, विटा,दगड भुका टाकला जातो. सिमेंटच्या पिशव्या आणि मातीने टाकी झाकलेले असते. स्वयंपाकघर किंवा न्हाणीघर व घरातील इतर ठिकाणाहून निघणाऱ्या सांडपाणीची वाहिनी शोषखड्ड्यातील प्लास्टिकच्या टाकीला जोडलेला असते. प्लास्टिक टाकीमधील छिद्रामुळे पाणी हळूहळू जमिनीत मुरते. टाकीच्या तळाशी साचलेला काही प्रमाणात घनकचरा वेळोवेळी स्वच्छ केले जाऊ शकतात व हा खड्डा पुन्हा पुन्हा वापरता येतो.