मुंबईतील समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेला धोका कुणाकडून?
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न लॉकडाऊननंतर पुन्हा गंभीर जाला आहे. याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांचा हा ग्राऊंड रिपोर्ट
लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली तर अनेकांचे रोजगार गेले. पण पर्यावरणाच्या दृष्टीने लॉकडाऊनचा काळ वरदान ठरला, कारण यामुळे अनेक ठिकाणी प्रदुषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले होते. नद्या स्वच्छ झाल्या होत्या. वायू प्रदुषण, ध्वनी प्रदुषण सर्व काही कमी झाले होते.
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांनी तर कित्येक वर्षांनी मोकळा श्वास घेतला होता. एरवी खचाखच गर्दी आणि प्रचंड प्रमाणात कचरा असे चित्र या समुद्र किनाऱ्यांचे असते. पण लॉकडाऊनच्या काळात मात्र हे समुद्र किनारे चकाचक दिसत होते.
लॉकडाऊननंतर मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर मात्र पुन्हा कचऱ्याची समस्या दिसू लागली आहे.
घरात व इतरत्र होणारा घनकचरा भले गोळा करून डम्पिंग ग्राऊंडवर नेला तरी मुंबईतील ही कचरा भरावक्षेत्रे खाड्यांच्या आसपासच आहेत. तिथल्या भरती-ओहोटीच्या पाण्याबरोबर हा कचरा समुद्राकडे जातो. शिवाय अशा कचऱ्यातून धूळ उडू नये म्हणून त्यावर मारण्यात येणाऱ्या पाण्याने आणि पावसाने हा कचरा आणि त्यातील असंख्य गोष्टी समुद्रात येतात.
मुंबईच्या किनाऱ्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न
मुंबई शहरात दररोज सुमारे ८-१० हजार टन कचरा गोळा केला जातो. यात वरकरणी निरूपद्रवी भासणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, काचा, पत्र्याचे डबे किंवा इलेक्ट्रोनिक वस्तूंचे तुकडे हे सर्व समुद्रात मिसळतात. कचऱ्यातील अनेक पदार्थ समुद्राच्या पाण्यात विरघळतात किंवा त्यांचे कण तरंगतात आणि पाणी प्रदूषित करतात.
स्वयंपाकघरातील पाण्यापासून ते स्नानगृह व संडासातील मैल्याबरोबर दररोज अंदाजे ३०० कोटी लीटर सांडपाणी पाच मल:निस्सारण केंद्रांतून मुंबईच्या समुद्रात सोडले जाते. यांत झोपड्या व नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा समावेश नाही, परंतु ज्या अर्थी ५०% लोक अशा वस्त्यात राहतात, त्याअर्थी बाहेर पडणारे सांडपाणी किमान १०० ते १५० कोटी लीटर असू शकते. या सांडपाण्यात सेंद्रीय पदार्थ, अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू तसेच साबणाचे घटक असतात. ई. कोलाई व व्हिबरियोसारखे रोगकारक बक्टेरिया खाऱ्या पाण्यातही वाढतात आणि त्यातील सेंद्रीय पदार्थांमुळे या जंतूंची वाढ जोमाने होते. समुद्र गढूळसर दिसतो आणि कुजणाऱ्या पदार्थांतून सल्फर डायऑक्साइड व हैड्रोजन सल्फाईड गॅस बाहेर पडून दुर्गंध पसरतो. यामुळे किनाऱ्याचे पर्यावरण बिघडून जाते. साबणातील पॉलिफॉस्फेट व सेंद्रीय पदार्थांमुळे या जंतूंची वाढ अतिशय जोरात होऊन ते पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन संपवून टाकतात. पाणी ऑक्सिजन विरहित झाले की समुद्रातील जलचर, मासे आणि वनस्पती मरायला लागतात. यामुळे हजार मासे मरुन पडतात आणि किनाऱ्यावर आढळण्याच्या अनेक घटना मुंबईच्या किनारपट्टीवर घडतात.
समुद्राच्या आक्रमणामुळे मुंबईच्या प्रभादेवीपासून दादरपर्यंतचा किनारा नामशेष झाला होता. मात्र गेल्या काही वर्षात मुंबई महानगरपालिकेनं विविध उपाय करुन दादरची चौपाटी पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पण पालिकेच्या या प्रयत्नांना फारस काहीसं यश येताना दिसत नाही आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिका समुद्र किनारे स्वछ ठेवण्यासाठी कंत्राट जरी काढत असली तरी देखील समुद्र किनारे स्वच्छ होताना दिसत नाही.
पर्यावरणवादी मुंबईकरांचा पुढाकार
या सगळ्या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने "यश फाउंडेशन" आणि "क्लीन अप दादर, माहीम बीच" या मोहिमेचे प्रमुख जय श्रृंगारपुरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दादर ते माहीम हा समुद्र किनारा क्लीन अप करण्यासाठी तरुण मुलांना एकत्र करून 100 आठवडे ही मोहीम राबवली आहे आणि जवळपास 11 टन कचरा दादर ते माहीम समुद्र किनाऱ्यावर गोळा करून तो उचललेला आहे. मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना त्यांनी सांगितले की, "गेली 2 ते 3 वर्ष आम्ही या दादर ते माहीम समुद्र किनाऱ्यावर जमा होणारा प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे काम करत आहोत. या कामामध्ये लोकांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात आहे. दादरच्या चौपाटीवर लोक फिरायला येतात, पण लोकं या चौपाटीच्या स्वछतेच्या बाबतीत तेवढे सजग नाहीत, असे ते म्हणतात. या मोहिमे अंतर्गत आत्तापर्यंत 5 टन कचरा हा चौपाटी वरून गोळा केला आहे आणि तो पुन:प्रक्रियेला सुद्धा पाठवल्याची जय श्रृंगारपुरे सांगतात.
मुंबई महानगरपालिका दादर ते माहीम चौपाटी स्वच्छता मोहीम राबवत नाही आणि या तीन किलोमीटर लांबीच्या या समुद्रकिनाऱ्याच्या स्वछतेसाठी फक्त 24 कामगार नेमते, असे जय श्रृंगारपुरे यांचे म्हणणे आहे. या 3 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्याला इतक मनुष्यबळ पुरेस नाही, हे आम्ही वारंवार महापालिकेला सांगितलं आहे. त्यातच मिठी नदीतून आणि वरळीच्या गटारातून संपूर्ण कचरा हा दादरच्या चौपाटीवर येतो आणि त्यामुळे या चौपाटीवर कचरा होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बीच क्लीन अपची संकल्पना अस्तित्वात आल्याचे ते सांगतात.
महापालिकेचे म्हणणे काय?
यासंदर्भात आम्ही महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे पर्यवेक्षक उन्मेश राणे यांना संपर्क केला. तेव्हा, "दादर ते माहीम या ३ किलोमीटच्या किनाऱ्यासाठी २४ कर्मचारी पुरेसे आहेत. त्यांना कचरा गोळ्या करण्याचे दिलेल टार्गेट ते पूर्ण करत आहे. त्यामुळे इथे कर्मचारी वाढवण्याची गरज नाही, या कामावर एवढा पैसा खर्च करण्याची गरज नाही" असे सरकारी उत्तर त्यांनी दिले.
पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांचे म्हणणे काय?
यासंदर्भात आम्ही पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत यांच्याकडून या समस्येवर उपाय काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की,
"दादर ते माहीम या संपूर्ण किनारपट्टीवर काम करण्यासाठी 24 कामगार नेमले आहेत पण ते अपुरे आहेत. महापालिका या संदर्भात तांत्रिक पद्धतीची कारणे सांगून यातून पळ काढत आहे. समुद्र किनारेच काय साधे मैदाने आणि उद्यानेसुद्धा महापालिका स्वछ करू शकत नाही हे आपल्याला रोज दिसून येत आहे. खरं तर मुंबईचे किनारे आता अजिबात स्वच्छ नाहीत आणि पालिका कारणे देऊन वेळ मारुन नेते. त्यामुळे पालिका स्वच्छतेबाबतच्या गोष्टींना कमी महत्व देत आहे हे यावरून दिसून येते. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका दादर आणि माहीम किनाऱ्यावरील फक्त घनकचरा बाहेर काढत आहे, पण समुद्रात जे द्रवरूपी रसायन मिसळलं जातं ते समुद्रातून कोण वेगळं करणार? त्यामुळे समुद्रातील ऑक्सिजनचा ऱ्हास होत आहे, त्याला कोण जबाबदार आहे? जैवविविधता नष्ट होत आहे त्याला पालिका आणि मुंबई शहरातील औद्योगिकरण जबाबदार आहे. त्यामुळे जर पालिकेला ही स्वच्छता करता येत नसेल किंवा जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, कारण पालिकेकडे प्रचंड पैसा आहे. पैसे लावून तुम्ही मनुष्यबळ उभं करून सर्व काही करू शकता पण तुमची मानसिक इच्छा नसल्याने ही घाण मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसून येत आहे."
एकूणच मुंबईचे समुद्र किनारे हे मुंबईचं वैभव आहे. याच वैभवाचा जपण्यासाठी मुंबईकरांनी आणि महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.