गावित बहिणींची फाशी रद्द..पण काय आहे महाराष्ट्र हादरवणारे 1996 चे बालहत्याकांड?
1996 साली बालहत्याकांड प्रकरणातील गावित बहिणींची फाशी रद्द करत असल्याच महत्वपुर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.;
1996 साली कोल्हापुर येथील रेणूका शिंदे आणि सीमा गावित यांनी केलेल्या बालहत्याकांड प्रकरणी 18 जानेवारी 2022 रोजी उच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला. यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढत गावित बहिणींच्या फाशीची शिक्षा रद्द केली.
1996 साली झालेल्या बालहत्याकांड प्रकरणातील आरोपी रेणूका शिंदे आणि सीमा गावित यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल देत फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा देण्यास मंजुरी दिली आहे.
रेणूका शिंदे आणि सीमा गावित या दोन बहिणींनी 6 वर्षात 42 बालकांचे अपहरण करून नऊ बालकांची हत्या केली होती. त्यामुळे 1996 साली हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज आणि त्यानंतर उच्च न्यायालयात फाशी रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. नितीन जामदार आणि न्यायमुर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने हा महत्वाचा निकाल दिला आहे. मात्र न्यायालयाने निकाल देताना राज्य सरकारकडून झालेल्या अक्षम्य विलंबाबाबत कडक शब्दांत ताशेरे ओढले. तर राज्य सरकारने केलेल्या अक्षम्य विलंबामुळे कडक शब्दात ताशेरे ओढले. आरोपींचा गुन्हा माफीस पात्र नाही मात्र प्रशासनाने दिरंगाई केली. त्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला फटकारले.
गावित बहिणींनी केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप प्रचंड गंभीर आहे आणि त्या पुनर्वसनाच्या पलिकडे आहे. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षाच द्यावी अशी भुमिका राज्य सरकारने मांडली होती. मात्र न्यायालयाने निर्णय देत दोन्ही बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करत त्याचे जन्मठेपेत रुपांतर केले आहे,
काय आहे 1996 बालहत्याकांड प्रकरण-
90 च्या दशकात नाशिकच्या अंजना गावीत यांनी एका ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न केले. त्याच्यापासून अंजना गावितला एक मुलगी झाली. तिचे नाव रेणूका. त्यानंतर अंजना गावीत ट्रक ड्रायव्हरपासून वेगळी झाली आणि तिने मोहन गावित सोबत लग्न केले. तर मोहन गावितपासून अंजना गावितला जी मुलगी झाली तिचे नाव सीमा. तर या मुलीच्या जन्मानंतर अंजना आणि मोहन यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे अंजना रस्त्यावर आली. तर तिने दोन्ही मुलींच्या सहाय्याने चोरीचा सपाटा लावला. तर त्यांना पकडल्यानंतर त्यांनी लहान सुटका करून घेण्यासाठी लहान मुलांचा वापर ढाल म्हणून करायला सुरूवात केली.
अंजनाने एका झोपडपट्टीतून 18 महिन्यांचे मुल उचलून नेले आणि एका मंदिरात चोरी केली. त्यावेळी अंजना पकडली गेली. लोकांनी अंजनाला चोप द्यायला सुरू केला. त्यानंतर अंजनाने लोकांना विश्वास पटण्यासाठी त्या लहान मुलाला जमीनीवर आपटले. त्यावेळी त्या मुलाच्या सांडलेल्या रक्ताकडे पाहून अंजना शपथ घेत होती की मी चोरी केली नाही. त्यावेळी लोकांना विश्वास बसला. तर पुढे त्या जखमी पोराला घेऊन अंजना आपल्या मुलींकडे गेली. त्यावेळी पोलिसांची झंझट मागे लागू शकते. त्यामुळे त्यांनी त्या मुलाला खांबावर आपटून त्याचा जीव घेतला. मात्र त्यानंतर अंजना आणि तिच्या दोन्ही मुलींना हा पर्याय सोपा वाटू लागला.
गावित मायलेकी झोपडपट्टीतून मुलांचे अपहरण करून त्यांची ढाल बनवू लागल्या. चोरी करून पकडले गेल्यास लहान मुलाला जमीनीवर आपटून स्वतःची सुटका करून घ्यायच्या. त्यातून पोलिस केस होण्याची शक्यता कमीच होती. या प्रकरणात लहान मुल वाचलं तरी मायलेकी त्या मुलाला मारून टाकायच्या. याच प्रकारातून राज्यात मोठं बालहत्याकांड घडत गेले. अंजना गावित आणि तिच्या दोन्ही मुली रेणूका आणि सीमा या क्रुरकृत्याच्या भागीदार झाल्या. त्यांनी 42 बालकांची हत्या केल्या. त्यानंतर या क्रुरकृत्याचा शेवट होण्याचा मार्ग जवळ आला.
प्रकरण कसे उघडकीस आले-
रेणूका आणि सीमा गावित बालकांचे अपहरण करता करता एक दिवस अंजना गावित यांचे दुसरे पती मोहन गावित याची दुसरी पत्नी प्रतिमा यांच्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर सीमा आणि रेणूका यांनी त्या मुलीची हत्या करून ऊसात फेकून दिले. मात्र प्रतिमाने पोलिसात तक्रार केली. तर पोलिसांनी प्राथमिक तपास करत सीमा आणि रेणूका यांची चौकशी केली. दरम्यान रेणूकाचे लग्न झाले होते आणि तिला मुलेही झाले होते. त्यामुळे पोलिसांनी रेणूकाला माफीची साक्षीदार होण्याचा फायदा समजावला. त्यातून रेणूका शिंदे (लग्नानंतर) हीने या प्रकरणाचा उलगडा केला. तर क्रांतीची हत्या आई अंजनाच्या सांगण्यावरून केल्याचे रेणूकाने सांगितले. त्यानंतर अशाप्रकारे 42 मुलांचे अपहरण करून खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर हे बालहत्याकांड जगासमोर आले. त्यामुळे या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरून गेला.
पुढे काय घडले?
रेणूका शिंदेने या प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर आई अंजना आणि बहिण सीमा गावित यांच्यासह रेणूका शिंदेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राज्यभर या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. तर राज्य सरकारने सीआयडी तपासाची घोषणा केली. या तपासात 42 पैकी 13 अपहरण आणइ 6 खून सिध्द झाले. त्यामुळे कोल्हापुर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना 2001 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान 1998 साली अंजना गावित यांचे तुरूंगात निधन झाले होते. तर पुढे गावित बहिणींनी उच्च न्यायालयात अपील केले. मात्र उच्च न्यायालयाने 2004 साली जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ 2006 साली सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली. मात्र त्यानंतरही गावित बहिणींनी 2014 साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज केला. मात्र गावित बहिणींनी केलेल्या क्रुरकृत्यामुळे राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळून लावला.
त्यानंतर 25 वर्षानंतरही फाशीची शिक्षा देण्यात आली नाही. त्यामुळे फाशीच्या शिक्षेला विलंब झाल्याच्या कारणामुळे त्यांनी वकिलामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने राज्य सरकारवर कठोर ताशेरे ओढत बालहत्याकांडातील आरोपी गावित बहिणींची फाशी रद्द केली.
उच्च न्यायालयाने आरोपींच्या फाशीची शिक्षा रद्द करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. सरकारने बालकांसाठी संवेदनाक्षमरित्या काम करणे गरजेचे असते. याबरोबरच अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयानंतर राष्ट्रपतींनीही फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्याची अंमलबजावणी न होणे हे दुर्दैवी आहे. शिक्षेची तरतूद ही एखाद्या आरोपीने केलेले कृत्य इतर कोणी करू नये. त्यासाठी शिक्षेची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे असते. त्यामुळे सरकारच्या यंत्रणेत जे दोष असतील ते लवकर दुर करून त्यावर तोडगा काढायला हवा. तर अशा प्रकारे पुन्हा आरोपींच्या शिक्षा विलंबामुळे रुपांतरीत होऊ नये ही अपेक्षा आहे, अशी अपेक्षा अहमदनगर येथील महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या Adv. भाग्यश्री जरांडेकर यांनी व्यक्त केले.