आमदार राम सातपुतेंच्या मतदारसंघात मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाला मिळेना जागा
ज्या दूरदृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हॉस्टेल सुरू केली होती. त्या उद्देशानं सामाजिक न्याय विभागानं सुरु केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहाला अकलूजमधे जागा मिळत नाही सामाजिक न्यायाच्या उद्देशाला कोठेतरी बगल देण्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मध्ये घडत असल्याची भावना येथील लोकात आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट;
शिक्षणाने माणसात विवेक निर्माण होतो. त्यामुळेच महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा,कॉलेज सुरू केल्या. ज्या समाजाला हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. त्या वंचित,शोषित समाजातील मुले शिकू लागली. त्यांच्या शिक्षणाची सोय करत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापुरात देशातील पहिल्या ' बॅकवर्ड बॉईज हॉस्टेल ' ची सुरुवात केली होती. या हॉस्टेल मध्ये राज्यातील अनेक मुले राहायला होती. आजही सोलापूर शहरात हे हॉस्टेल उभे असून त्यात अनेक विद्यार्थी राहत आहेत. या हॉस्टेल मध्ये अनेक ग्रामीण भागातील मुलांनी राहून शिक्षण घेतले. आता ती मुले मोठ - मोठ्या पदावर कार्यरत असून तश्या प्रकारची नोंद तेथील माहिती पुस्तकात मिळते.
ज्या दूरदृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हॉस्टेल सुरू केली होती. त्या दृष्टीला कोठेतरी बगल देण्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मध्ये घडत असल्याची भावना येथील लोकात आहे. अकलूज शहर राजकीय दृष्ट्या आणि भौतिक दृष्ट्या प्रगत मानले जाते. या शहराचा चौहोबाजूंनी विकास झाला असताना या शहरात गेल्या 40 वर्षापासून 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर ' यांच्या नावाने सुरू असलेल्या मागासवर्गीय मुलांच्या हॉस्टेलला अजूनही जागा मिळालेली नाही. आजही हे हॉस्टेल भाड्याच्या जागेत उभे असून आमदार राम सातपुतेंच्या मतदारसंघात मागासवर्गीय वस्तीगृहाला जागा मिळत नसल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यकारी अधिकारी,अकलूज यांच्या कार्यालयासमोर प्राणांतिक आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन आणि आमदार राम सातपुते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
अकलूज चा विकास झाला,पण वसतीगृहाचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित
अकलूज महाराष्ट्राला राजकीय दृष्ट्या परिचित असलेले शहर असून या शहराचे नेतृत्व विजयसिंह मोहिते - पाटील करतात. विजयसिंह मोहिते - पाटील यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेकदा मंत्रीपदे भूषवली आहेत. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत. त्यामुळेच शहराचा झपाट्याने विकास झाला असल्याचे सांगितले जाते. अकलूज शहरात असणाऱ्या शासकीय जागेवर अनेक ठिकाणी शासकीय इमारती उभ्या राहिल्या आहेत. पण गोरगरीब लोकांच्या मुलांसाठी कायमस्वरूपी हॉस्टेल उभे राहिले नसल्याने नागरिकांतून विविध तर्क - वितर्क लावले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. येथे अनेक कॉलेज, शैक्षणिक संस्था असून शैक्षणिक सुविधा ही चांगल्या प्रकारच्या आहेत. या ठिकाणी राज्यातील अनेक गाव,शहरातील मुले शिकायला येतात. त्यांच्या राहण्याची सोय संबधित कॉलेज,शाळा येथे असणाऱ्या वसतिगृहात होते. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे शाळा,कॉलेज यांच्या वसतिगृहाची फी भरण्यासाठी पैसे नसतात,असे विद्यार्थी शासकीय हॉस्टेलची वाट धरतात. त्या ठिकाणी संबधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतर विविध अडचणीना सामोरे जावे लागते. शहरात अनेक नामांकित शाळा,कॉलेज असून शासकीय वस्तीगृहाचा प्रश्न गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे. हॉस्टेलसाठी शासकीय जागा शहरात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. तशा प्रकारचा पत्रव्यवहार ही संबधित विभागाशी झाला असल्याचे कागदोपत्री दिसून येते. याला काही प्रमाणात राजकीय अनास्था ही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. अकलूजच्या आजूबाजूच्या गावांचा विकास देखील मोठ्या प्रमाणात असून अकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले,परंतु अद्यापही मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाला जागा मिळत नसल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अपुऱ्या जागेत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हॉस्टेल सुरू
अकलूज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी वसतिगृह सुरू असून त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथून सातत्याने वाहतूक सुरू असते. त्याचबरोबर याच हॉस्टेलच्या खाली कपड्यांचे दुकान असून याच दुकानाच्या समोरून जिना चढून हॉस्टेलमध्ये जावे लागते. हॉस्टेल मध्ये प्रवेश करताच समोरच हॉल सारखी मोकळी जागा असून त्याच्या समोर अधीक्षकांचे ऑफिस आहे. आतल्या बाजूला निमुळता भाग असून एका खोलीत तीन ते चार विद्यार्थी राहत आहेत. याठिकाणी विद्यार्थ्यांना खाटाची सोय देखील असल्याचे पहायला मिळते. पण आजच्या आधुनिक काळातील सुविधांचा अभाव तेथे असल्याचे दिसून येते. हॉस्टेल वरच्या मजल्यावर असल्याने येथे सुसज्ज अशा जागेचा अभाव असून हॉस्टेलला सुसज्ज अशी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उपोषण कर्त्याकडून करण्यात येवू लागली आहे.
ग्रामीण भागातील मुले येथे येतात शिकायला
अकलूजला चांगल्या प्रकारच्या शिक्षण संस्था असल्याने या ठिकाणी शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पैशाचा अभाव असल्याने ते मुले शासकीय वसतिगृहाचा आधार घेतात. पण येथे ही त्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. महाराष्ट्राच्या विविध भागात सुसज्ज अशी वसतिगृह उभी राहिली असताना अकलूज मध्ये का उभे राहिले नाही. याला राजकीय अनास्था जबाबदार आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे अकलूज सर्व सोयीसुविधानी सुसज्ज उभे राहिले असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हॉस्टेल होण्यास विलंब का होत आहे. याठिकाणी चांगल्या प्रकारचे हॉस्टेल उभे करण्याची मागणी सर्वसामान्य लोकातून करण्यात येवू लागली आहे.
ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूलाच आहे हॉस्टेल
अकलूज शहरात आणि परिसरातील नागरिकांची सोय व्हावी,यासाठी याठिकाणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची सोय करण्यात आली आहे. याच उपजिल्हा रुग्णालयात अनेक मृत व्यक्तींचे पोस्ट मार्टम केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यातून भीती व्यक्त केली जातेय. या वसतिगृहात आठवी पासून पदवी पर्यंतचे विद्यार्थी राहण्यास आहेस. शेजारीच पोस्ट मार्टम केले जात असल्याने अनेक विद्यार्थी या वसतिगृहात राहण्यास भित आहेत. त्यामुळे हे हॉस्टेल दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून चांगल्या प्रकारचे हॉस्टेल बांधण्याची मागणी करण्यात येवू लागली आहे.
गेल्या चाळीस वर्षापासून वसतिगृहाला मिळेना जागा
उपोषणकर्ते सांगतात,की या हॉस्टेलची निर्मिती 1982 साली झाली होती. त्यावेळेपासून ते आतापर्यंत हॉस्टेल भाडोत्री जागेत चालवले जात असून शासनाने भाड्यापोटी कोट्यवधी रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. भाड्याचा पैसा हॉस्टेल उभारणीसाठी वापरला गेला असता तर विद्यार्थ्यांची कायम स्वरूपी सोय झाली असते. एकीकडे अकलूज मध्ये शासकीय जागेवर अनेक टोलेजंग शासकीय कार्यालये उभारली,पण या हॉस्टेलला गेल्या चाळीस वर्षात जागा मिळाली नाही. आणखीन किती पैसे भाड्यापोटी शासन मोजणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. या हॉस्टेल मध्ये आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील मुले राहण्यास येतात. येथे आल्यानंतरही त्यांच्या अडचणी संपत नाहीत. येणाऱ्या काळात हॉस्टेलचा प्रश्न आणखीन उग्र रूप धारण करेल,असे यातून दिसून येते.
हॉस्टेलच्या अधीक्षकांकडे दोन हॉस्टेलचा चार्ज
शासकीय मागासवर्गीय हॉस्टेलला भोसले नावाचे अधीक्षक असून त्यांच्याकडे करमाळा आणि अकलूज येथील वसतिगृहाचा चार्ज असून त्यामुळे ते कधी करमाळ्यात असतात तर कधी अकलूज येथे असतात. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी अधीक्षक देण्याची मागणी जनतेतून करण्यात येवू लागली आहे. येथे लहानापासून - थोरापर्यंत विद्यार्थी रहायला असून त्यांची गैरसोय टाळावी,असे नागरिकांना वाटत आहे. यावर शासनाने लवकर उपाय शोधावा,असे अनेकांचे मत आहे.
शासन स्तरावरून जागेसाठी प्रयत्न सुरू - आमदार राम सातपुते
अकलूज येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी,यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करण्यात येत असून तशा प्रकारचा पत्रव्यवहार संबधित विभागाशी करण्यात आला,असल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली.