कोरोना संकटाच्या काळात दिव्यांग विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा मॅक्स महाराष्ट्रने लावून धरला आहे. दरम्यान अंध विद्यार्थी संघटनेने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन या विद्यार्थ्यांच्या तक्रारी मांडल्या. त्याची दखल घेत वर्त्यांषा गायकवाड यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. अंध विद्यार्थी संघटना आणि शालेय शिक्षण विभागाची एक बैठक झाली आहे. 10 वी 12 वीच्या परीक्षांच्या अनुषंगाने दिव्यांग दृष्टिहीन विद्यार्थ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यासुद्धा उपस्थित होत्या. अंध विद्यार्थ्यांना लेखनिक उपलब्ध करून देणे आणि परीक्षा केंद्र बदलून देणे यावर सहमती झाली आहे.
गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या संकटात कोणताही विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेऊ शकला नाही. उपलब्ध ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्येही विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. कित्येक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणही घेऊ शकले नाही. अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या सोयी- सवलती नसल्याने त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.
तर दुसरीकडे सध्याच्या परीक्षेबाबतची सर्वात मोठी समस्या म्हणजे अंध विद्यार्थ्यांना लेखनिक उपलब्ध होत नाही. यासंदर्भातले वृत्त मॅक्स महाराष्ट्रने दिले होते. शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे कोणीही लेखनिक म्हणून येण्यास तयार नाही. त्यातच या कोरोनामुळे पालक आपल्या मुलांना लेखनिक म्हणून पाठविण्यास तयार नाही. त्यामुळे अंध विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच सामाजिक अंतर पाळणे हे देखील अंध विद्यार्थ्यांसमोरील एक मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर टाळेबंदीच्या काळात सर्व अंध विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. त्यांना पुणे मुंबई यांसारख्या शहरांमध्ये वसतीगृहात राहण्याची आणि जेवणाची देखील समस्या भेडसावत आहे, असे अनेक मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले.
अंध विद्यार्थी संघटनेच्याम मागण्या
१) बोर्डाने लेखनिक उपलब्ध करून देणे
२) विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाजवळील परीक्षा केंद्र मिळावे
3) या महामारीच्या काळात लेखनिकाची One step Belowची अट ठेवू नये.
४) अंध विद्यार्थ्यांबाबत असलेले नियम योग्य रीतीने पाळण्यात यावे.
५) अंध विद्यार्थ्यांना वेळेचे आणि गुणांची असलेली सवलत देण्यात यावी.
६) सामाजिक अंतर पाळणे कठीण असल्यामुळे अशा वेळी अंध विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
७) लेखनीका करिता पालकांकडून असलेले संमतीपत्र अनिवार्य करू नये.
८) यंदाच्या वर्षी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून फॉर्म भरून आणणे अनिवार्य करू नये.
९) सर्वच रुग्णालयात covid-19 चे रुग्ण असल्याने अंध विद्यार्थ्यांना त्याची बाधा होऊ शकते. या ऐवजी वैद्यकीय प्रमाणपत्रावरच त्यांची निश्चिती करावी.
१०) राज्य शिक्षण मंडळाने सर्वच शाळा, महाविद्यालय, परीक्षा केंद्र आणि विभागीय मंडळांना एक परिपत्रक जारी करून विद्यार्थ्यांबाबत जनजागृती आणि अधिक विशेष लक्ष देण्यास सांगावे.
ज्या अंध विद्यार्थ्यांना अद्यापही लेखनिक उपलब्ध झाला नाही, परीक्षा केंद्र बदलून हवे आहे किंवा ऑडिओ फॉरमॅट मध्ये अभ्यासक्रम हवा असेल अश्या दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांनी अधिक माहिती करिता खालील दिलेल्या क्रमांकावर आणि ई-मेल आयडीवर संपर्क साधावा असे आवाहन अंध विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे
9511880018
8055919233
bsa.maharashtra@gmail.com