रिपोर्टर ने केली मुख्यमंत्र्यांकडे गाडीची मागणी, बातमी बघून तुम्हाला धक्काच बसेल
मॅक्स महाराष्ट्रच्या रिपोर्टरने केली मुख्यंत्र्यांकडे गाडीची मागणी, वाचा काय आहे नेमकं कारण;
मुख्यमंत्री साहेब, तुम्ही व्हीआयपी प्रोटोकॉल सोडला अशी बातमी ऐकली. तुमचं मनापासून अभिनंदन. माझं तुमच्याकडे एक काम आहे. मला तुमच्या ताफ्यातील एक गाडी पाहिजे. परवा बीएमसी ला जाताना तुमच्या ताफ्यातील तीन गाड्यांना अपघात झाला. त्यातील दोन गाड्यांमध्ये अक्षरशः कोणीच नव्हतं. जरा झूम करून बघा या गाडीत कोणीच नाहीय. तुमच्या मागे-मागे रिकाम्या फिरणाऱ्या अशा गाड्यांपैकी गाडी मला पाहिजे.
तुम्हाला धक्का बसेल मी ही गाडी का मागतोय... तर समजून घेण्यासाठी थोडं या खिडकीतून बघा... हे दृश्य पाहिल्यावर माझ्या तर डोळ्यातूनच पाणी आलं. नाशिकच्या वकिल गोडसे यांनी या आदिवासी बाप-लेकांचा शूट केलेला हा व्हिडीयो धक्कादायक आहे. २५ किलोमीटर... हो २५ किलोमीटर लांबून आपल्या बापाला पाठीवर घेऊन हा आदिवासी युवक रूग्णालयात पायाचं फ्रॅक्चर वर उपचार करायला घेऊन येतो, पण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने त्यांचावर उपचार होत नाहीत. शेवटी काय करायचं हे न समजल्याने हा युवक आपल्या बापाला पुन्हा पाठीवर घेऊन २५ दूरच्या आपल्या वाडीकडे जायला निघतो.. पंढरपूरची वारी आणि आणि या युवकाची ही पायपीट मला एकसारखीच वाटते. पण मायबाप सरकारला जाग येणार आहे का? स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि अमृतकाल उपभोगणाऱ्या आपल्या देशात आजही ही स्थिती आहे. रूग्णालयांमध्ये डॉक्टर नाहीत, रूग्णांना उपचार नाहीत, पुरेशा रूग्णवाहिका नाहीत, रुग्णवाहिनी कशी बोलवावी याचं प्रशिक्षण नाही.. आणि दुसरी कडे प्रवासी नसतानाही रिकाम्या गाड्या ताफ्यांमध्ये फिरतायत. ॲम्बुलन्स मधून अधिकारी बैठकांना जातात. काय सुरूय आपल्या आसपास...