Max Maharashtra Impact : बीड जिल्ह्यात शासकीय रिक्त जागांवर नियुक्ती, बातमीनंतर वेगवान हालचाली
बातमी आहे मॅक्स महाराष्ट्रच्या इम्पॅक्टची...बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात महत्त्वाच्या पदावर अधिकारी नसल्याची बातमी मॅक्स महाराष्ट्राने 12 नोव्हेंबरला प्रसारित केली होती. याच बातमीची दखल घेत प्रशासनाने काही विभागात मूळ पदावर अधिकारी नियुक्त केले आहेत. याबाबत आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याशी याविषयावर चर्चा केली होती. तसेच काही दिवसातच संबंधित विभागातील जे अधिकारी असतील ते लवकरात लवकर येतील अशी माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिली होती.
त्याचबरोबर या बातमीच्या अनुषंगाने आमच्या प्रतिनिधींनी आष्टी-पाटोदा -शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांना विचारणा केली होती, त्यावेळी मंत्रालय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्या त्या विभागाला पत्र देऊन आष्टी पाटोदा शिरूरसह जिल्ह्यातील अनेक विभागातील अधिकारी नसल्याने सर्वसामान्य लोकांना येणाऱ्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यासंदर्भात शुक्रवारी बीड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता पदावर तब्बल 15 अभियंता रूजू झाले असून आता येणाऱ्या काही दिवसात पाटोदा तालुक्याला तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जलसंधारण अधिकारी, महिला बाल कल्याण अधिकारी, सामाजिक वनीकरण अधिकारी, या सर्व विभागाला लवकरात लवकर अधिकारी येतील व पाटोदा तालुक्यातील जनतेच्या होणाऱ्या अडचणी थांबतील, असेही त्यांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांची पदे रिक्त होती. शाखा अभियंत्यांकडे त्या पदाचा रिक्त अतिरिक्त पदभार होता. अखेर बांधकाम विभागातील रिक्त पदांची भरती झाली आहे. राज्यातील 583 शाखा अभियंत्यांना उप अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला 15 उपअभियंता मिळाले आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला सहा उप अभियंता मिळाले आहेत.