महाराष्ट्रातील काका पुतण्या वादात आणखी एक नाव

महाराष्ट्रात काका-पुतण्या वादाची अनेकदा चर्चा रंगते. त्यातच आता या काका पुतण्या वादात मुंडे, पवार, तटकरे, क्षीरसागर यांच्यापाठोपाठ देशमुख घराण्याची भर पडली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट....

Update: 2023-05-25 14:52 GMT

काका पुतण्यांचा वाद महाराष्ट्रासाठी नवा नाही. पण त्यात आता आणखी एका नावाची भर पडलीय. आधी ठाकरे, मग मुंडे, त्यानंतर तटकरे, क्षीरसागर घराण्यातील काका-पुतण्यातील वाद महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये पवार काका-पुतण्यांमध्येही वाद असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगलीय. मात्र, आता या काका-पुतण्यांच्या वादाच्या यादीत आणखी एक भर पडलीय. ती थेट देशमुख घराण्यातून.

राज्यातील मोठं राजकीय घराणं असलेल्या ठाकरे कुटूंबातील काका पुतण्या वाद समोर आला. 2005 मध्ये काका बाळासाहेब ठाकरे विरुध्द राज ठाकरे वाद समोर आला. आपला राजकीय वारस निवडताना उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केल्याने राज ठाकरे नाराज झाले. त्यातूनच राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील दुसरा काका पुतण्या वाद म्हणजे गोपिनाथ मुंडे विरुध्द धनंजय मुंडे यांच्यातील वाद. खरंतर धनंजय मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्याच तालमीत तयार झाले होते. पण 2009 च्या निवडणूकीत गोपिनाथ मुंडे यांनी मुलगी पंकजा मुंडे यांना विधानसभेचं तिकीट दिलं. त्यामुळे पुतण्या धनंजय मुंडे नाराज झाले. त्यानंतर धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेवर आमदार करण्यात आलं. पण त्यानंतरही आपल्याला डावलंलं जात असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांनी 2013 मध्ये काका गोपिनाथ मुंडे यांच्याविरोधात बंड केलं.

यानंतर कोकणातील महत्वाचं घराणं म्हणजे तटकरे घराणं. पण अलिकडे या तटकरे घराण्यातही राजकीय वाद असल्याचं समोर आलंय. काका सुनील तटकरे आणि पुतण्या अवधूत तटकरे यांच्यात झालेला राजकीय संघर्ष पहायला मिळाला.

यानंतर बीडचं मोठं राजकीय घराणं म्हणजे क्षीरसागर घराणं. या घराण्यातही काका जयदत्त क्षीरसागर विरुध्द संदीप क्षीरसागर संघर्ष रंगलाय. त्यातच आधी विधानसभा आणि आता बाजार समिती निवडणूकीतही पुतण्या संदीप क्षीरसागर याने काका जयदत्त क्षीरसागर यांना चीतपट केलं.


Full View

या काका पुतण्या वादाची चर्चा सुरु असतानाच 2019 मध्ये अजित पवार यांनी काका शरद पवार यांना न विचारता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेकदा या पवार घराण्यातील काका-पुतण्या वादावर चर्चा रंगते. पण आता या काका पुतण्यांच्या वादात नागपूरमधील महत्वाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात त्यांच्या पुतण्याने दंड थोपटले आहेत..

काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय. पण यानंतर लगेचच आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे.

नरखेड ही बाजार समिती अनिल देशमुख यांच्या ताब्यात आहे. पण अनिल देशमुख यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी नरखेड बाजार समितीच्या सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव आणलाय. त्यातच उद्या ही बाजार समिती राष्ट्रवादीच्या हातून गेलेली असेल असं म्हणत अनिल देशमुख यांना इशारा दिलाय. त्यामुळे ठाकरे, मुंडे, तटकरे, क्षीरसागर, पवार यांच्यापाठोपाठ आता देशमुख काका पुतण्याही आमने-सामने आले आहेत. त्यामुळे काका-पुतण्या वादाचा नवा अंक समोर आलाय.

Tags:    

Similar News