महाराष्ट्राच्या नायलॉन रस्सीला आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात मागणी
महाराष्ट्राच्या यावली सारख्या खेडेगावात चरक्यावर तयार झालेल्या रस्सीला आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात मोठी मागणी आहे. या रस्सीच्या उद्योगावर येथील 200 कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. नायलॉन रस्सीच्या उद्योगाला चालना देण्यासाठी शासन,प्रशासनाने आर्थिक पाठबळ देण्याची मागणी या व्यावसायिकाकडून करण्यात येत आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...;
एकेकाळी सुताच्या रस्सीना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी होती. शेतीची नांगरणी,पेरणी करताना बैलांसाठी या सुती रस्सीचा उपयोग केला जात होता. या रस्सीला ग्रामीण भागात दावं असेही म्हटले जाते. या रस्सीचा उपयोग गाई,म्हशी,शेळ्या बांधण्यासाठी केला जात होता. पण कालांतराने रानातील मशागतीची साधने बदलली. बैलांच्या जागी ट्रॅक्टर आले. त्यांच्या सहाय्याने शेतकरी नांगरणी,पेरणी,बागेची फवारणी करू लागले. त्यामुळे सुती दाव्यांचा जमाना कालबाह्य होऊन ग्रामीण भागात या सुती रस्सीचे उत्पादन दुर्मिळ असे झाले. बाजारात सुती रस्सीची मागणी घटल्याने हा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर बेकारीची वेळ येऊन, कामाच्या शोधार्थ ग्रामीण भागातील हे व्यावसायिक शहरात स्थायिक झाले. त्याठिकाणी हाताला मिळेल ते काम करू लागले. गावाकडे राहिलेले बेरोजगार व्यावसायिक इतर कामाकडे वळले.
पण अशाही कठीण परिस्थितीत मोहोळ तालुक्यातील यावली या गावात हा रस्सी बनवण्याचा पारंपारिक व्यवसाय आजही टिकून आहे. बदलत्या काळानुसार येथील व्यवसायिकांनी स्वतःच्या व्यवसायात बदल करून नायलॉन रस्सीचे उत्पादन करण्यास सुरुवात करून ती हैद्राबाद,विजयवाडा येथे विकण्यास सुरुवात केली. कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्यापुरते यातून पैसे मिळतात. महाराष्ट्राच्या यावली सारख्या खेडेगावात चरक्यावर तयार झालेल्या रस्सीला आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात मोठी मागणी आहे. या रस्सीच्या उद्योगावर येथील 200 कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. नायलॉन रस्सीच्या उद्योगाला चालना देण्यासाठी शासन,प्रशासनाने आर्थिक पाठबळ देण्याची मागणी या व्यावसायिकाकडून करण्यात येऊ लागली आहे. याला शासन, प्रशासन कसा प्रतिसाद देते याकडे येथील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
दिल्ली,चेन्नई,कोलकता येथून मागवला जातो रस्सी बनवण्याचा कच्चा दोरा
यावली येथील व्यावसायिक नायलॉनची रस्सी बनवण्यासाठी दिल्ली,चेन्नई,कोलकता येथून विशिष्ट प्रकारचा दोरा मागवता. कंपनीतून खरेदी करत असताना जाग्याला हा सुटा दोरा 40 रुपये किलो प्रमाणे मिळतो. तर ट्रान्सपोर्टचा खर्च पकडून 50 रुपयांत गावात पोहच होतो. या सुट्या दोऱ्यातील काही दोरे खराब निघतात. त्यामुळे रस्सी बनवण्याचा कच्चा माल 55 ते 60 रुपये किलो पर्यंत जातो. दिल्लीवरून आलेला दोरा फारच गुंतागुंतीचा असतो. त्याला व्यवस्थित करून नायलॉनच्या रस्सीसाठी तयार केला जातो. सुरुवातीला या दोऱ्या तुटलेल्या अवस्थेत असतात. त्या चरक्याला लावल्या जातात. एकव्यक्ती चरका फिरवतो. तर दोघे-तिघेजण चरक्याच्या हुकला तुटलेल्या दोऱ्या जोडत राहतात. चरका जसा फिरेल तसा तो व्यक्ती दोऱ्या जोडत राहतो. चरका फिरत राहिल्याने त्याला पीळ बसत राहतो. त्यामुळे कच्चा माल असलेला दोरा एकात-एक गुंतत जातो. चरक्याला चार दोऱ्या जोडलेल्या असतात. या चार दोऱ्यापासून एक मोठी दोरी बनवली जाते. या कामासाठी घरातील लहानापासून थोरांपर्यंत राबतात. कडाक्याच्या उन्हातही सध्या रस्या बनवण्याचे काम अविरतपणे सुरू आहे.
बनवलेली नायलॉन रस्सी हैद्राबाद, विजयवाडा येथे विकली जाते
तयार झालेली रस्सी आंध्रप्रदेशातील हैद्राबाद आणि कर्नाटकातील विजयवाडा येथे विकली जाते. हा व्यवसाय बारा महिने चालतो. जसा माल तयार होईल तसा विक्रीसाठी पाठवला जातो. हैद्राबाद आणि विजयवाडा येथे 75 ते 80 रुपये किलो प्रमाणे विकला जातो. यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. या व्यवसायाची वाढ होण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पण शासन जेंव्हा मनावर घेईल तेंव्हाच हे शक्य आहे,असे या व्यावसायिकांना वाटते. ही नायलॉनची रस्सी वेगवेगळ्या रंगात बनवली जाते. ती चरक्याच्या सहाय्याने बनवली असल्याने मजबूत अशी बनली जाते. नायलॉनची दोरी असल्याने ती टिकण्यास मजबूत आहे. या नायलॉन दोरीचा उपयोग ट्रकचे टफ बांधण्यासाठी केला जातो. ती वर्षानुवर्षे टिकणारी आहे,अशी वाहनधारकांची धारणा आहे. त्यामुळे वाहनधारक या रस्सीच्या खरेदीला प्राधान्य देत असल्याचे येथील व्यवसायिकांचे म्हणणे आहे. पण हा नायलॉन रस्सीचा धंदा वाढवण्यासाठी मार्केटिंगची गरज आहे. पुरेशा पैशा अभावी हे शक्य नाही,असेही त्यांना वाटते. बदल्या काळानुसार रस्सीच्या धंद्यात बदल केल्याने त्यांच्यात एक मानसिक समाधान ही जाणवते. घरातील सर्वजण या रस्सी बनवण्याच्या कामात झोकून देऊन काम करतात. या कामाला वेळेचे बंधन नाही. सकाळी चालू करून संध्याकाळी ही बंद करू शकतात. तर कधी कंटाळा आला तर सुट्टी ही घेऊ शकतात. कोणाच्या बंधनात काम करत नसल्याने त्यांच्यावर काम कमी किंवा जास्त झाल्याचा दबाव ही नाही. त्यामुळे हे व्यावसायिक अगदी हसत-खेळत काम करतात. गेल्या 50 वर्षांपासून हा रस्सी बनवण्याचा व्यवसाय अविरतपणे सुरू असल्याचे यावली या गावातील नागरिक सांगतात.
पाच दशकापासून रस्सी बनवण्याचा व्यवसाय
बदल्या काळानुसार विविध क्षेत्रात बदल झाले,त्याप्रमाणे या रस्सी बनवण्याच्या व्यावसायातही झाला. यात काही कंपन्याही रस्सीचे उत्पादन करू लागल्या आहेत. अशाही कठीण परिस्थितीत यावली या गावातील नागरिक गेल्या 5 दशकापासून नायलॉन दोरीचा व्यवसाय करत असून येथील नागरिकांची पाहिजे तेवढी आर्थिक प्रगती झाली नाही. गरिबी,अज्ञान आजही त्यांच्यात कायम आहे. या धंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून फक्त कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो . त्यामुळे आर्थिक उन्नती झाली नाही. या धंद्यातून आलेला पैसा कुटूंबाच्या गरजा भागविण्यासाठी खर्च होतो. त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्षच जात नाही. पण पूर्वीच्या मानाने आताचे जीवन बऱ्यापैकी चालले आहे. असे या व्यावसायिकांना वाटते. एवढे वर्ष व्यवसाय करूनही या उद्योगाचा ब्रँड तयार करता आला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. उद्योगाच्या भरभराटीसाठी जाहिरातबाजी आवश्यक असते. जाहिरात झाली,पण ती कमी प्रमाणात झाली. लोकांचा कल कंपनीच्या रस्सी घेण्याकडे वाढत चालला आहे.
त्यामुळे हाताच्या सहाय्याने चरक्यावर बनवलेल्या रस्सीकडे दुर्लक्ष होत चालले आहे. आता शेतातील कामातही मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे देखील रस्सीचा खप कमी झाला आहे. पूर्वी छपरावर प्लस्टिक कागद झाकल्यानंतर जोराच्या वाऱ्यात छपर उडून जाऊ नये म्हणून या मजबूत रस्सीचा उपयोग केला जात होता. पण अलीकडे गाड्यांचे टफ बांधण्यासाठी याचा उपयोग केला जात आहे. ट्रक, टेम्पो यामध्ये माल भरल्यानंतर माल बाहेर पडू नये,यासाठी पाठीमागच्या बाजूला ही नायलॉनची रस्सी बांधली जाते. या रस्सीचा उपयोग थोड्याफार प्रमाणात जनावरे बांधण्यासाठीही केला जातो. पूर्वी बैल पोळ्याच्या सणाला मोठ्या प्रमाणात रस्सीची विक्री होत होती. पण शेतातील मशागतीची साधने बद्दलल्याने या धंद्यात मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे.
उद्योग उभारण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे
येथिल रस्सी व्यावसायिक संतोष खंदारे यांनी बोलताना सांगितले की, उद्योगधंद्याच्या संदर्भात असलेल्या कर्जाचा आम्हाला आणखीनही लाभ मिळालेला नाही. आणाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडूनही काही कर्ज मिळाले नाही. या उद्योगाच्या विकासासाठी शासनाने कर्ज देण्याची व्यवस्था करावी. आणाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ बंद असल्याने कर्ज प्रकरणे सध्या बंद आहेत. त्यामुळे शासनाने हे आर्थिक विकास महामंडळ लवकरात-लवकर पूर्वपदावर आणावे,असे संतोष खंदारे यांना वाटते.