लोटेवाडी ग्रामपंचायतीने विधवा प्रथा काढली मोडीत

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने 5 मे 2022 रोजी ग्रामसभा घेऊन समाजात चालू असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते ठराव मंजूर केल्यानंतर या परीवर्तनाची लाट आता राज्यभर पसरली आहे सोलापूर जिल्ह्यातील लाटेवाडी ग्रामपंचायतीनेही विधवा प्रथा मोडीत काढली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट....;

Update: 2022-07-01 14:15 GMT

विधवा महिलाना समाजात दुय्यम वागणूक दिली जात असताना सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतीने हजारो वर्षापासून चालत आलेली विधवा प्रथा मोडीत काढण्याचे काम केले आहे. ग्रामपंचायतीने तशा प्रकारचा ठराव करून त्यांची अमंलबजावणी सरपंच विजय खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यास सुरुवात केली आहे. हजारो वर्षापासून विधवा महिलांना समाजात आणि घरात दुय्यम स्थान देण्याची प्रथा रूढी परंपरेने लोक पाळत आले आहेत. त्यांना कोणत्याच सार्वजनिक अथवा घरगुती कार्यक्रमात बोलवले जात नाही. त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या प्रकारचा आहे. काही समाजात तर महिला एकदा विधवा झाली तर तिला दुसरे लग्न करण्याची मुबा नाही. पण एखाद्या पुरुषाची बायको मृत्यू पावल्यानंतर दुसरी बायको करू शकतो.




 


एखाद्या महिलेचा पती तरुणपणीच मृत्यू पावला तर असंख्य वेदना सहन करत त्या विधवेला जीवन कंठावे लागते. असंख्य वेदनांनी विधवा महिलांचे जीवन वेढले असताना त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतीने केले आहे. या विधवा महिलाना शिवण काम शिकवले जात असून त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या थोड्याफार प्रमाणात आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे. लोटेवाडी ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक होत असून सांगोला तहसीलदार यांनी जर तालुक्यातील गावात विधवा महिलांच्या समस्या विषयी जनजागृतीचे काम दिले तर त्यावर उपाय सुचिण्याचे काम करू आणि विधवा महिलांच्या उन्नतीसाठी हातभार लावू,असे लोटेवाडी गावचे सरपंच विजय खांडेकर यांनी सांगितले.

विधवा महिला निर्मूलनासाठी शासन परिपत्रक जारी

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने 5 मे 2022 रोजी ग्रामसभा घेऊन समाजात चालू असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासात हेरवाड ग्रामपंचायतीने केलेला ठराव स्तुत्य आहे. आज विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असलो तरी ही पतीच्या निधनाच्या वेळी पत्नीचे कुंकू पुसणे,गळ्यातील मंगळसूत्र तोडणे,हातातील बांगड्या फोडणे,पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलाना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही. या कुप्रथांचे पालन केले जात असल्याने अशा व्यक्तींच्या प्रथिष्टेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचे उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे. सदर बाबी लक्षात घेता विधवा प्रथा निर्मूलन होणेच्या अनुषंगाने समाजात व्यापक जनजागृती होणे अवशक आहे. या अनुषगाने ग्रामीण भागातील सर्व संबंधितांना निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.




 


विधवा प्रथेच्या निर्मूलनासाठी शासनाने उचलली पाऊले

आज 21 व्या शतकात वावरत असताना विज्ञानवादी प्रगतिशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते. या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी समाजात जन करण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांना सूचित करावे. तसेच ग्रामपंचायतीना ठराव घेणेबाबत प्रोत्साहित करावे. छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा दृष्टीने कृतिशील कार्यवाही करावी.

प्रशासनाने परवानगी दिल्यास विधवांना मान सन्मान देण्यासाठी जनजागृती करणार

लोटेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच विजय खांडेकर आणि त्यांच्या टीमने बोलताना सांगितले,की सध्या समाजात विधवांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. आजच्या प्रगत युगात त्यांच्याशी दूजाभाव करणे समाजाने सोडावे. त्यांना घरातील लोकांनी त्यांना व्यवस्थित वागणूक द्यावी. समाजानेही त्यांना प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. सरपंच विजय खांडेकर यांनी ही विधवा प्रथा मोडण्याचे काम स्वतःच्या घरापासून सुरू केले. सुरुवातीला या विधवांना मान सन्मान आणि त्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत असताना सरपंच विजय खांडेकर यांच्या आजीने विरोध केला होता. सरपंच विजय खांडेकर यांनी हा विरोध मोडीत काढत गावात विधवांना मान सन्मान देण्याचे ठरवून त्यादृष्टिने पाऊले टाकून विधवांना एकत्र करीत त्यांना सामाजिक प्रक्रियेत सामावून घेतले. या विधवाना गावात मान सन्मान मिळत असल्याने त्यांच्यात एक नवी उमेद निर्माण झाली आहे. त्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर दिसू लागली आहे. जर शासन,प्रशासनाने विधवांना मान सन्मान करण्यासाठी जनजागृती करण्यास परवानगी दिल्यास सांगोला तालुक्यातील सर्व गावात या संबंधी जनजागृती करू असे सरपंच विजय खांडेकर यांनी सांगितले.




 


लोटेवाडी ग्रामपंचायतीने महिलांच्या उन्नतीसाठी उचलली पाऊले

लोटेवाडी ग्रामपंचायतीने महिलांच्या उन्नतीसाठी पाऊले उचलली असून त्यांना कपडे शिवण्याचे काम मशीनवर शिकवले जात आहे. त्यामुळे महिलांना गावात रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात भर पडू लागल्याचे शिवणकाम करणाऱ्या महिलांनी बोलताना सांगितले. विधवांच्या जीवनाबद्दल सांगताना काही महिला भावूक झाल्याचे पाहायला मिळाल्या. या कठीण प्रसंगात लोटेवाडी ग्रामपंचायतीने उचलले पाऊल अभिमानस्पद असल्याने उपस्थित महिलांनी सांगितले. त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम लोटेवाडी ग्रामपंचायत करू लागल्याने विधवा महिलानी ग्रामपंचायतीचे विशेष मानले.


Full View

Tags:    

Similar News