लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदार दारिद्र्याच्या खाईत
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गावगाडा हाकणाऱ्या बारा बलुतेदाराचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावर पोट भरणारा हा वर्ग दारिद्र्याच्या खाईत लोटला जात आहे. मात्र, या बारा बलुतेदारांना सरकाराने कोणतीही मदत न देता वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे हा बारा बलुतेदार वर्ग मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. पाहा मॅक्समहाराष्ट्र चा स्पेशल रिपोर्ट;
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गावगाडा हाकणाऱ्या बारा बलुतेदाराचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावर पोट भरणारा हा वर्ग दारिद्र्याच्या खाईत लोटला जात आहे. मात्र, या बारा बलुतेदारांना सरकाराने कोणतीही मदत न देता वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे हा बारा बलुतेदार वर्ग मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. पाहा मॅक्समहाराष्ट्र चा स्पेशल रिपोर्ट
कोरोनाने आमचं सर्व संसाराचं चक्रच बदलून टाकलं आहे. आता हा रोजचा प्रश्न झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यशोदाबाईंचा परिवार माठ व भांडी बनवून विकण्याचा व्यवसाय करतो. बाजारात पोलीस विक्रीसाठी दुकान लावू देत नाही. ह्या व्यवसायातून पोट भरणचं मुश्किल झालं आहे, मग परिवारातील कोणाला कोरोना झालाच तर पैसे आणणार कोठून आणू मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कसे जमा करणारं असं बोलून त्या आपल्या कामाला पुन्हा लागल्या.
लॉकडाऊनमुळे होरपळलेल्या समाजाची ही व्यथा आहे. गरिबाचं फ्रीज बनवणारा समाज अर्थात गावचा गाडा हाकणाऱ्यांपैकी बाराबलुतेदारांपैकी कुंभार समाज. गावात मातीचे मडकी बनवणं आणि भांडी बनवणं अशी अत्यंत कष्टाळू काम करणारा समाज मात्र, या समाजावर आता उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभर वेगवेगळ्या सणांना तसेच लग्न समारंभात लागणारी मातीची भांडी बनवण्याचं काम हा समाज करत असतो.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या समाजानं तयार केलेली मातीची भांडी लॉकडाऊनमुळे तशीच पडून आहेत. मातीची भांडी बनवणाऱ्या कुंभारवाड्यात सध्या शुकशुकाट आहे. बाजारात दुकान थाटता येत नाही. दुकान लावली तर लॉकडाऊनच्या नियमांमुळे पोलीस कार्यवाही करतात. तर कोरोनाच्या भीतीमुळे लोक वस्तू घेत नाही. 500 रुपयांचा होणारा व्यवसाय 150 ते 200 रुपयांपर्यंतच मोठया मुश्किलीने होतो, परिवाराने काय खायचं आणि जगायचं कसं आणि परिवारातील कोणाला कोरोना झाला तर करायचं काय? असा प्रश्न कुंभार व्यवसाय करणाऱ्यांना सतावतोय.
सरकारने कोणतीच मदत केली नाही कसं जगायचं?
मॅक्समहाराष्ट्र ची टीम जने जळगाव परिसरातील कुंभारवाडयातील काही परिवारांना भेट दिली. सुनील कुंभार ह्यांची चौथी पिढी ही माती पासून माठ व इतर वस्तू बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. मात्र, कधी एवढं आपण हताश झालो नाही. तेवढं ह्या कोरोनाच्या काळात झालो असल्याचं हताश पणे सुनिल सांगतात.
सर्वसामान्य बारा बलुतेदारांमध्ये आमचा कुंभार समाज येतो. लॉकडाऊनमुळे आमचं खूप नुकसान झालं. आमचा संयम सुटत चालला आहे. काय करावं सुचत नाही. कष्टाने तयार केलेला माल पडून आहे. लॉकडाऊनमुळे दुकान लावता येत नाही
दर वर्षापप्रमाणे अक्षय तृतीया हा सण कुंभार समाजासाठी खूप मोठा मानला जातो. कारण वर्षभर बनवलेल्या वस्तूंची विक्री मोठया प्रमाणात होते. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणेच ह्या ही वर्षी लॉकडाऊन मुळे कुंभारवाड्यात शुकशुकाट आहे. कोरोनांच्या भीतीमुळे मोजकेच ग्राहक येतात. लग्न सोहळे बंद आहेत. त्याचा ही आम्हालाही मोठा फटका बसला आहे.
रोजचा 500 रुपयांचा व्यवसाय व्हायचा आता तर 150 ते 200 रुपये ही हातात मिळत नाही. कसा परिवार चालवायचा? मुलांचं पुढचं शिक्षण कसं करायचं? सरकार ने काहीच मदत केली नाही. सरकारी नोकरांना पगार चालूच आहे. राज्य सरकारने इतर लोकांना मदत केली. मात्र, बाराबलुतेदारांना काहीच दिलं नाही. काय करावं आम्ही? असं हताश होऊन सुनिल कुंभार सांगतात.
सरकारकडून बारा बलुतेदारांना कोणतीच मदत नाही -
गावगाडा हाकणारा बारा बलुतेदार आर्थिक विवंचनेत सापडला आहे. कोरोना आणि लॉकडाऊन मुळे गावगाडा हाकणाऱ्या कुंभार, लोहार, न्हावी, सोनार, गुरव, चांभार, सुतार, शिंपी, धोबी, कोळी, महार, मांग हा बाराबलुतेदार मोठया आर्थिक संकटात सापडला आहे.
आर्थिक विवंचनेमुळे काही जणांनी आत्महत्या केल्याची बातम्याही आल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्या ह्या बाराबलुतेदारांना आर्थिक मदत करावी अशी मागणी विविध संघटनांनी तसच विरोधी पक्षांनी ही केली आहे. मात्र सरकारने अजूनही कोणताही निर्णय घेतला नाही.
दरम्यान लॉकडाऊनमध्ये तरी या समाजातील व्यवसाय तरी काही नियम अटींवर चालू करू द्या अशी मागणी केली आहे. मात्र, त्यालाही सरकारने दाद दिली नाही यामुळे सरकार विरुद्ध बारा बलुतेदार समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
बारा बलुतेदार संघटनांचे शासनाकडे मागण्या...
बारा बलुतेदारांच्या विविध संघटनांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे, मात्र अद्याप पर्यंत या समाजातील घटकांना कोणतीच आर्थिक मदत राज्य सरकार तसच केंद्र सरकारने जाहीर केली नाही. बारा बलुतेदार संगटनेचे किशोर सूर्यवंशी यांनी सरकारकडे पहिल्या लॉकडाऊन आणि त्यानंतर दुसऱ्या लॉडाऊन मध्ये आर्थिक मदतीचे करण्याबाबतचे निवेदन दिले होते मात्र त्याबाबत कोणताच निर्णय सरकारने घेतला नाही .कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आले या लॉकडाऊन चा सर्वाधिक आर्थिक फटका गावगाडा चालवणारा बारा बलुतेदारांना बसला हातावर काम करणाऱ्या ह्या घटकाला मदत करण्याबाबत सरकारने हात आखडता घेतला आहे.अशी भावना बारा बलुतेदार संगटनांची झाली आहे.बरलुतेदार समाजातील नाभिक समाजाच्या केसकर्तनालय बंद झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले यामुळे या समाजातील काही व्यवसायिकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या ही समोर आल्या आहेत . अस असतांनाही सरकारने या समाजाकडे गांभीर्याने घेऊन मदत करावी अशी मागणी विविध संगटनांनी केली आहे.
बाराबलुतेदारांबाबत शासनाची भूमिका स्पष्ठ नाही - तंज्ञाच मत -
बारा बलुतेदार समाजातील एक कुंभार समाजाचे अभ्यासक असलेले डॉ सचिन कुंभार सांगतात की आर्थिक सुधारण्याच्या कालखंडानंतर फार मोठ्या संख्येने देशात उद्योग आणि व्यवसायाची उभारणीत देशात करण्यात आली आणि याच काळात अनेक विदेशी उद्योग देखील देशात स्थापन करण्यात आले कारण उद्योगातून रोजगार निर्मिती होते आणि त्यातून उत्पन्नात वाढ होऊन त्या देशातील लोकांचा आर्थिक विकास होऊन, देशाचा ही आर्थिक विकासही झपाट्याने होतो असा त्याचा अर्थ असतो. व्यक्तीचे राहणीमान उंचावणारा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पैसा किंवा वित्त हे जर मोठ्या प्रमाणात समाजातील व्यक्तीकडे असेल तर अशा वेळेस तो समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होतो. आपल्या देशात जातीनिहाय व्यवसाय करण्याचे बंधने घालून देण्यात आले आहे. त्यामुळे भारतात उत्पन्नाच्या संदर्भात विविध जातींमध्ये भीषण विषमता आपल्याला आढळून येते.
आज संपूर्ण जगावरती कोरोना या महामारी चा परिणाम झालेला आपण अनुभवत आहे, या लॉकडाऊन च्या काळात अनेक पारंपारिक व्यवसाय करणारे कुटुंबे आज त्यांच्यावर उपासमारीची स्थिती उद्भवलेली आहे यात प्रामुख्याने पारंपरिक माती काम करणारा शहरी तसेच ग्रामीण भागातला कुंभार समाजाच्या कुटुंबावर या लॉकडाऊन चा परिणाम मागील मार्च 2020 पासून सुरू झालेला आहे, कारण मातीकाम हे हंगामी स्वरुपाचा असल्याकारणाने उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी माठ, रांजण व घागरी या मातीच्या भांडी तयार करून विकत असतात तसेच पोळा, दिवाळी, गणपतीमूर्ती, नवरात्र इत्यादी सणांमध्ये लागणाऱ्या मातीच्या भांड्यांची मागणी इतर समाजाकडं होते आणि ही मागणी पूर्ण करण्याचे काम हा कुंभार समाज अनादी काळापासून पूर्ण करीत असतो. आणि वर्षाच्या इतर महिने त्याचे मातीकाम हे बंद असते. मिळवलेल्या उत्पन्नावर तो वर्षभर आपला उदरनिर्वाह करीत असतो. परंतु मागील वर्षापासून हा हंगामी स्वरूपाचा मातीकाम व्यवसाय शासनाच्या राबवलेल्या धोरणामुळे या समाजावर आज अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली दिसून येते.
या सोबतच काही कौटुंबिक समस्याही निर्माण होताना दिसतात, की ज्यामध्ये आजारपण असेल, मुलगा व मुलगी यांच्या पुढील शिक्षणाच्या संदर्भात समस्या निर्माण झालेली दिसून येते, तसेच मुला-मुलींचे विवाह संदर्भातील समस्या अशा अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्या या कुंभार समाजाच्या कुटुंबाच्या समोर निर्माण झालेल्या आहेत कारण या समाजाला शासनाने कोणत्याही प्रकारच्या शासकीय सवलती त्या शैक्षणिक असो, आर्थिक असो दिलेल्या नाहीत.
अशा या कुंभार समाजाप्रती शासनाची भूमिका स्पष्ट दिसून येत नाही, ज्या पद्धतीने शासन इतर क्षेत्रातील व्यवसायिकांना ज्या पद्धतीने प्राधान्यक्रम दिला जात आहे. त्या पद्धतीने या माती काम करणाऱ्या कुंभार समाजाला सुद्धा शासनाने मातीकाम करण्याची परवानगी द्यावी सोबतच विक्री व्यवस्थेचे संदर्भात सुद्धा काही नियम तयार करून पूर्वीप्रमाणेच मातीची भांडी विकण्यास परवानगी द्यावी जर शासन परवानगी देत नसेल तर या माती काम करणाऱ्या कुंभार समाजाला शासनाने आर्थिक सवलती प्रधान कराव्यात की जेणेकरून त्यांचा उदरर्वाह चालेल.