लॉकडाऊन यात्रा : झाडू बनवणाऱ्यांचा रोजगार 'लॉक'

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक पारंपरिक व्यवसायांना फटका बसला. पण सरकारने या व्यावसायिकांना मदत केलेली नाही. अशाच एका पारंपरिक व्यवसायाची सध्या काय अवस्था झाली आहे हे दाखवणारा सागर गोतपागर यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Update: 2021-07-07 02:32 GMT

घराच्या कोपऱ्यातली थोडीशी जागा व्यापणारा झाडू जेंव्हा घरभर फिरतो तेंव्हा घराला घरपण येते. घर स्वच्छ होते. म्हणून तर ग्रामीण संस्कृतीत झाडूचीही हळदी कुंकू वाहून पूजा केली जाते. कोणत्याही महत्त्वाच्या सणाला सर्वप्रथम झाडूची खरेदी केली जाते. घराला घरपण देणाऱ्या या झाडूची निर्मिती करणाऱ्या कारागीरांच्या घरावर मात्र लॉकडाऊनमुळे उजाड होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमध्ये झाडूचे मार्केट पूर्णपणे बंद झाल्याने गावोगावी फिरून झाडू विकता आले नाही, त्यामुळे मोठा फटका बसल्याचे हे व्यावसायिक सांगतात.



झाडू बनवण्यासाठी आणलेला कच्चा माल खराबव झाल्याने मोठा फटका बसल्याचेही हे व्यावसायिक सांगतात. खरेतर हा व्यवसाय करणारे कारागीर कायमच उपेक्षित राहिले आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या रेवनगाव येथील मातंग समाजातील कारागिरांनी हा परंपरागत व्यवसाय अजूनही जतन केला आहे. या गावातील ५० घरांचे पोट याच झाडू बनवण्याचा व्यवसायावर अवलंबून आहेत. पण सध्या त्यांच्यापुढे मोठे संकट उभे आहे.

झाडू कसे तयार केले जातात?

झाडू तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून सिंधीच्या झाडाचे फड उपयोगात येतात. आंध्र प्रदेशमध्ये ही झाडे मुबलक प्रमाणात आहेत. काही व्यापारी हा माल या कारागिरांना पुरवतात. याची किंमत अडीचशे ते तीनशे प्रती फड अशी असते. या एका फडातून किमान २२ झाडू तयार होतात. यासाठी लागणारे तुंगुस दोरी-कच्चे साहित्य मिळून किमान २५ रुपये खर्च होतो. झाडू बनवणे हे कुशल कारागिराचेच काम आहे. विकत आणलेले झाडाचे फड वाळवले जातात. हातात घेऊन काठीने त्याच्यावरील काटे झाडून काढले जातात. यामधून उपयोगाचे असणारे या फडाचे तुकडे हाताने तसेच दाताने ओढून काढले जातात. या कामामुळे कारागिरांचे दातही पडतात.


 



यानंतर जमा केलेले उपयोगी छोटे फड भिजवून ठेवले जातात. व्यवस्थित भिजल्यानंतर फड झाडू बांधण्यासाठी घेतले जातात. झाडू बांधणे ही एक विशेष कला आहे. यानंतर सुरू होते घट्ट बांधलेल्या झाडुला विंचरण्याची प्रक्रिया. अनुकुचीदार खिळे ठोकलेल्या फळीवर झाडू विंचरला जातो. अलीकडे हे काम मशीनवर देखील केले जाते. या सर्व प्रक्रियेनंतर अंतिमतः विक्रीसाठी झाडू तयार होतो.




 


झाडू बनवणारा समाज आजही उपेक्षित

ग्रामीण भागात आजही याच झाडूंना मागणी आहे. परंपरागत व्यवसाय जपणारे हे कारागीर आजही उपेक्षितच आहेत. इतक्या वर्षात बहुतांश लोकांच्या डोक्यावर पक्के छत नाही. सरकारने हा व्यवसाय टिकवण्यासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून द्यावे अशी या कारागिरांची अपेक्षा आहे. लॉकडाऊन सारख्या अडचणीच्या काळात या कारागिरांना पुन्हा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. अन्यथा हा पारंपारिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

Tags:    

Similar News