लॉकडाऊन यात्रा : क्रीडा प्रशिक्षकांवर ऑम्लेटची गाडी टाकण्याची वेळ
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणाऱ्या रोहित गाडेकर व समाधान बेलेवार या क्रीडा प्रशिक्षकांना करोना परिस्थितीमुळे ऑम्लेटची गाडी टाकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. नेमका कसा सुरू आहे या दोन्ही शिक्षकांचा परिस्थितीशी लढा, पाहूया आमचे स्पेशल करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा हा खास रिपोर्ट...;
औरंगाबाद : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींचे व्यवसाय बंद झाले. या महामारीची झळ अजूनही लोकांना बसत आहे. अशीच काही व्यथा आहे ती औरंगाबादच्या रोहित गाडेकर आणि समाधान बेलवार या दोन क्रीडा प्रशिक्षकांची. क्रीडा क्षेत्र अद्यापही बंद असल्याने क्रीडा प्रशिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाही तर घर खर्च भागवणेही अवघड झाले असल्याने या दोन्ही प्रशिक्षकांनी अंडा ऑम्लेटची गाडी टाकून उदरनिर्वाह करत आहे.
प्रशिक्षण केंद्र चांगले चालत असल्याने त्याच्या भरवशावर या दोघांनी कर्ज काढून घर घेतलं होतं. मात्र घर घेतलं आणि त्याच काळात कोरोनाचे संकट आलं. सुरुवातीला सरकारच्या सुचनेनुसार बँकांनी तीन महिने हप्ते भरण्यासाठी सवलत दिली. मात्र त्यानंतर बँकांनी तगादा लावला. त्यात क्रीडाक्षेत्र बंद असल्याने क्रीडा क्लास सुद्धा बंद आहे. त्यामुळे या दोन्ही शिक्षकांनी पर्यायी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि टीव्ही सेंटर भागात अंडा ऑम्लेटची गाडी टाकली.
रोहित गाडेकर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्क्वॉश प्रशिक्षक आहे. तसेच ते अनेक वर्षांपासून शहरातील सिडकोतील टेनिस कोर्टवर टेनिस प्रशिक्षण देत आहेत. तर समाधान हे सिडको एन-३ व परिमल हाऊसिंग सोसायटीतील बास्केटबॉल कोर्टवर प्रशिक्षण देतात. मात्र कोरोना काळात क्रीडा क्षेत्र बंद असल्याने याचा फटका या दोन्ही प्रशिक्षकांना सुद्धा बसला आहे.