नगरपंचायत Election दिग्गजांना धक्का, धक्कादायक निकालांची नोंद

नगरपंचायत निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी रंगली होती. त्यात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. तर अनेकांनी आपले गड शाबूत राखले आहेत.;

Update: 2022-01-20 12:34 GMT

राज्यात नगरपंचायत निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी रंगली होती. या निवडणूकीत महाविकास आघाडीसह भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे नगरपंचायत निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. तर या निवडणूकीत अनेक धक्कादायक निकाल आले आहेत. यामध्ये दिग्गजांचे गड उध्वस्त झाले आहेत. तर काहींनी आपले गड राखले आहेत. याबरोबरच बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षानेही जोरदार मुसंडी मारत संग्रामपूर नगरपंचायतीवर प्रहारचा झेंडा फडकवला. तर नगरपंचायत निवडणूकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजप क्रमांक एकवर पोहचला आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका-

राज्यात पहिल्यांचा ओबीसी आरक्षणाशिवाय 106 नगरपंचायतीसाठी निवडणूका पार पडल्या. त्या नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. त्यात भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत 25 नगरपंचायतींसह 419 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी 381 जागांसह दुसऱ्या तर 344 जागांसह काँग्रेस तिसऱ्या तर 296 जागांसह शिवसेना चौथ्या स्थानी राहिली. तसेच या अपक्षांनी २३९ जागांवर विजय मिळवला. यासह राज्यातील मतदारांनी भाजपला पसंती दिल्याचे चित्र आहे.

दिग्गजांना धक्का, अनेकांनी गडही राखले-

बीड जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडेंना धक्का देत पंकजा मुंडेंनी आपले वर्चस्व कायम राखले. तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला. भातकुलीत रवी राणांनी वर्चस्व राखले आहे. याबरोबरच बुलढाण्यातील मोताळ्यात काँग्रेस तर संग्रामपूर नगरपंचायतीवर बच्चू कडू यांच्या प्रहारने सत्ता खेचून आणली. याबरोबरच सांगली जिल्ह्यातील कडेगाव नगरपंचायत निवडणूकीत मंत्री विश्वजीत कदम यांना दणका देत भाजपाने वर्चस्व राखले.

कोकणात शिवसेनेने कमबॅक केल्याचे चित्र आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीने भाजपाची धुळधाण उडवत घवघवीत यश मिळवले आहे. तर पारनेर आमदार निलेश लंके यांच्या हातून निसटले. दिंडोरी नगरपंचायत निवडणूकीत केंद्रीय मंत्री भारती पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणूकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असली तरी भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. हा भारती पवार यांना धक्का मानला जात आहे.

रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये पालकमंत्री आदिती तटकरेंना स्थानिक आघाडीने दुर ठेवत जोरदार धक्का दिला आहे. तर इतर ठिकाणी वर्चस्व राखण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. विदर्भात भाजप काँग्रेस अशी थेट लढत झाली. त्यात चंद्रपुरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी आपले वर्चस्व कायम राखले. तर गोंदियात नाना पटोलेंनी गड राखला. याबरोबरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मतदारसंघातील घनसांगवी नगरपंचायत ताब्यात ठेवण्यात टोपे यांना यश आले. तर शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्या ताब्यात असलेली सोयगाव नगरपंचायत खेचून आणली. त्यामुळे दानवेंसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात विश्वजित कदम यांना भाजपाने धक्का देत कडेगाव नगरपंचायतीवर सत्ता मिळवली. तर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि इतर या सगळ्यांना जोरदार धक्का देत रोहित आर आर पाटील यांनी राजकारणात धडाकेबाज लाँचिंग केले. तर उत्तर महाराष्ट्रात खडसेंना आमदार चंद्रकांत पाटील यांनी धक्का दिला. याबरोबरच चंद्रपुर जिल्ह्यातील ९ नगरपंचायतीमध्ये भाजपला अवघ्या एक नगरपंचायतीत वर्चस्व राखता आले आहे. 

कोणी काय दावे केले-

नगरपंचायत निवडणूकीतील निकालावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचे म्हटले आहे. तर भाजपाने 25 नगरपंचायतींवर तर मित्र पक्षांसह 30 नगरपंचायतींवर भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

बीड जिल्ह्यातील पाच पैकी तीन जागांवर भाजपची सरशी झाली आहे. त्यावरून बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, सत्ता असतानाही सत्ताधारी यश मिळवण्यात कमी पडले. लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक म्हणाले की, नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला 80 टक्के जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ मतदारांनी भाजपला नाकारले आहे, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले तर पुन्हा एकदा एकला चलो चा नारा दिला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत काँग्रेस पुन्हा स्वबळावर निवडणूकीत उतरणार असल्याचे सांगितले. तर नगरपंचायत निवडणूकीत मतदारांनी भाजपला नाकारल्याचे म्हटले आहे.

माध्यमांचे काय आहे विश्लेषण-

साम+सकाळ यांनी केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, महाविकास आघाडीचा राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. तर मुख्यमंत्री पद वगळता शिवसेनेला पक्षसंघटनेत त्याचा फायदा होत नाही. याबरोबरच नगरपंचायत निवडणूकीत भाजपला कोणतेही नुकसान झाले नाही. तर काँग्रेसला महाविकास आघाडीचा फायदा होत नसल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

काय आहे नगरपंचायत निकालांचे विश्लेषण-

राजकीय विश्लेषक पत्रकार सुधीर सुर्यवंशी म्हणाले की, नगरपंचायत निवडणूकीत भाजप पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून दिसून येत आहे. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने दोन नंबरचा पक्ष म्हणून उभारी घेतली आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता नव्हती त्या कर्जतसह, बोदवड, कवठेमहाकांळ अशा अनेक ठिकाणी राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विरोधी पक्ष भाजपासारखेच राष्ट्रवादीनेही सामान्य लोकांच्या प्रश्नांशी जोडून घेत आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारले आहे. त्याचा मोठा फायदा राष्ट्रवादीला झाला आहे, असे राजकीय विश्लेषक सुधीर सुर्यवंशी यांनी सांगितले.

तसेच त्यांनी पुढे सांगितले की, शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानासुध्दा शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानेची सर्जरी झाल्याने लोकसंपर्क कमी झाला आहे. त्यापाठोपाठ उध्दव ठाकरे हे फक्त मुख्यमंत्रीच नाहीत तर पक्षप्रमुखही आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे पक्षाकडे दुर्लक्ष होत आहे का? हा प्रश्नही निर्माण होत आहे. तसेच संघटनात्मक कामांमध्ये दुर्लक्ष झाले आहे त्याच फटका शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही नगरपंचायत निवडणूकीत झालेल्या पिछेहाटीतून दिसत आहे. तर काँग्रेसच्या नेते राज्य पातळीवर एक्टिव दिसत नाहीत. तर ते आपल्या जिल्ह्यापुरतेच मर्यादित झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आपले गड राखले असले तरी राज्यात काँग्रेसला हवी तेवढी उभारी मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यासाठी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी सुरू आहे. तर अशोक चव्हाण यांनी नांदेड, नाना पटोलेंनी गोंदिया याप्रकारे इतर मंत्र्यांनीही आपापल्या मतदार संघात वर्चस्व मिळवले असले तरी त्यांना पुर्ण विभाग किंवा राज्यस्तरावर छाप पाडता आली नाही. यावरून नगरपंचायत निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला आहे. तर शिवसेनेला मोठा फटका बसला आहे, असे मत राजकीय विश्लेषक सुधीर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.

नगरपंचायत निवडणूकीचे विश्लेषण करताना जेष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपंचायत निवडणूका पार पडल्या. तर ओबीसी आरक्षण जाण्यासाठी राज्य सरकारच कारणीभूत होत असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात होता. तर सरकारच्या कारभारावरून भाजपने टीका करत सरकारला बेजार केले होते. या पार्श्वभुमीवर भाजपाला जेवढं यश मिळायला हवं होतं ते मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत हे पक्ष पुन्हा स्वतंत्र लढून भाजपला दुर ठेवण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. तर दसरी गोष्ट म्हणजे साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रवादी राज्यात सर्वदुर पसरल्याचे या नगरपंचायत निकालातून दिसत आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीला सत्ता मानवलेली दिसत आहे. याबरोबरच विदर्भातील भाजपाच्या सत्ता असलेल्या नगरपालिका पुन्हा जिंकल्याने विदर्भात काँग्रेसचा जनाधार कायम असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली जाणे ही शिवसेनेसाठी आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. त्याबरोबरच शिवसेनेच्या नेत्यांनी नगरपंचायत निवडणूकीसाठी विशेष मेहनत न घेतल्याने त्याचे प्रतिबिंब निकालात स्पष्ट दिसून आले. तर मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे त्यांना आपले गड राखता आले. मात्र पक्षाचे सामुहिक प्रयत्न कमी पडल्याने शिवसेनेची पिछेहाट झाले असल्याचे जेष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितले.

याबरोबरच स्वतंत्र लढूनही महाविकास आघाडीच्या एकत्रित जागांची संख्या जास्त असल्याने आगामी काळातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढण्यास फायदा होईल, असेही यावेळी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले.

भंडारा-

ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या भंडारा जिल्हा परिषद निवडकीत कोणत्याही पक्षाला पुर्ण बहूमत मिळाले नाही. तर काँग्रेस 21, राष्ट्रवादी आणि भाजप प्रत्येकी 13 जागा, शिवसेना 1 , अपक्ष 4 तर बसपाने 1 जागा मिळवली आहे. त्याचबरोबर भंडारा पंचायत समितीमध्ये 104 जागांपैकी भाजप 36, काँग्रेस 33, राष्ट्रवादी 23, शिवसेना 5 तर अपक्ष 6 जागांवर विजयी झाले आहेत.

गोंदिया-

गोंदिया जिल्हा परिषद निवडणूकीत 53 पैकी भाजपाने 26 जागांवर जिंकल्या आहेत. तर काँग्रेस 13, राष्ट्रवादी 8, विभागीय पक्ष 4 आणि अपक्षांनी दोन जागांवर विजय मिळवला आहे. याबरोबरच पंचायत समिती निवडणूकीत 106 जागांपैकी 57 जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर काँग्रेस 20, राष्ट्रवादी 13, राज्यस्तरीय पक्ष 10 आणि विभागीय पक्ष 12 तर अपक्ष तीन जागा राखण्यात यशस्वी झाले आहेत.

Tags:    

Similar News