दारूबंदीच्या दिशेने नेणारा मुक्तीपथ.....
दारुविरुध्द काम करणारे झोपले की दारू जागृत होते. पण नेमकी कशी ते जाणून घेण्यासाठी वाचा सागर गोतपगार यांचा स्पेशल रिपोर्ट;
दारूबंदीच्या अभियानात पोलिसांचा सहभाग वाढावा म्हणून आम्ही मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून तसेच पद्मश्री डॉ अभय बंग यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवले होते. राखी विथ खाकी हा त्यातलाच एक उपक्रम. दारू सुरू असलेल्या गावातील महिलांनी पोलिसांना राखी बांधायची आणि ओवाळणीच्या ताटात पैशाची वस्तूची ओवाळणी मागण्याऐवजी गावातील दारू बंदीची ओवाळणी त्यांनी द्यायची हा उद्देश. धानोरा तालुक्यातील सावरगाव पासून ते अगदी पेंढरी पर्यंत मी अक्षय पेद्दिवार भास्कर कड्यामी फिरून कार्यक्रम आयोजित करत होतो. अनेक ठिकाणी कार्यक्रम यशस्वी झाले. पण आम्ही विचारच केला नव्हता असा एक प्रसंग गट्टा पोलीस स्टेशन मध्ये घडला. राख्यांचे नियोजन केले. गावातून उत्स्फूर्त महिला आल्या. तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. ओळीने महिलांनी राख्या बांधल्या. दारूबंदीची ओवाळणी मागण्याची वेळ आली. पोलिस अधिकारी उठून याबाबत बोलणार तोपर्यंत शेवटी एक महिला त्या गर्दीत मिसळली. दारू पिऊन ती फुल्ल होती. तिला चकातपण येत नव्हतं. पोलिस हवालदार तिला बाजूला करत होते. एका हातात राखी घेऊन बांधायला ती पुढेच येत होती. अधिकाऱ्याने हात पुढे केला राखी बांधून घेतली आणि माझ्याकडे बघत डोळा मारत मला विचारलं साहेब आता कशी दारू बंदीची ओवाळणी टाकणार ?
असे अनेक प्रसंग घडायचे कुठे दारूबंदीच्या बैठकीची मुनारी देण्यासाठी मुनारी वाल्याला बोलावले तर अगोदर तोच दारुसाठी पैसे मागायचा. अशा प्रसंगात काय करावे कसे वागावे हे सुरवातीला कळत नव्हतं. पण अशा प्रसंगांची उत्तरे समाज कार्याच्या पुस्तकात सापडली नाहीत. लोकांनीच आपण काय केलं पाहिजे सांगितले. प्रश्न लोकांचा होता, समस्या लोकांच्या होत्या आणि त्यावर उपाय देखील लोकच सुचवायचे. पहिली बैठक झाली की दारूबंदीचा ठराव घोषित व्हायचा. याची अंमलबजावणी करायची कशी महिलाच पुढे यायच्या. मुरुमगावच्या महिला म्हणाल्या सर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गटाच्या बायांना दारुबिक्रेत्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देऊ. तसच ठरलं. प्रत्येक दिवशी वेगळा गट फिरायचा. आणि बाजाराच्या दिवशी पोळ्यासारख्या सणाला ज्यावेळी दारू अधिक विक्री आणि सेवन केली जायची त्या दिवशी सर्वच महिला रस्त्यावर असायचा. ज्यांना शिवीगाळ करणारा नव्हरा घाबरत नव्हता त्यांना दारूविक्रेते घाबरु लागले. दारुडे त्यांना पाहताच पळू लागले. सणाला इतर गावातील बाया गोड धोड करण्यात मग्न असायच्या पण काकडयेली सारख्या गावात महिला रस्त्यावर फिरत होत्या. यामागे कारण एकच होतं. कार्यकर्त्या झोपल्या की दारु जागृत होते. जागी झालेली दारू गावाला गावाच्या विकासाला अर्थकारणाला झोपवते. गावात कौटुंबिक हिंसा वाढते. कष्टाचा पैसा दारुवर वाया जातो. दारूमुळे विविध आजार वाढतात. गावात दारू पिण्याचे प्रमाण जास्त असेल तर गावाच्या कारभाराकडे दुर्लक्ष होते. भ्रष्टाचार बोकाळतो.
दारूबंदीच्या कामाला पोलिस सहकार्य करायचे. पण नक्षल भाग असल्याने त्यांना सर्वतोपरी मदत करता येत नव्हती.
यासाठी मुक्तिपथला महिलांनीच अहिंसक कृतीची वाट शोधून दाखवली. पोलिस पोहचू शकत नसतील तर गावात महिलांनी दारू शोधायची. मिळालेली दारू गावाचे पोलीस पाटील, गावपाटील यांच्यासमोर नष्ट करायची. या कामात कोणतीही हिंसा करायची नाही. दारुसाठी लावलेला मोहफुलाचा सडवा नष्ट करायचा. दारू काढण्यासाठी वापरत असलेली मोठी भांडी, लाकडाचा चाटू, पाईपा यांचा मुख्य चौकात ढीग करायचा. महिलांच्या, पोलीस पाटील किंवा गावातील पाटलांच्या हस्ते या साहित्याची होळी करायची. गडचिरोली जिल्ह्यातील हजारो टन सडवा अशा अहिंसक कृतीतून महिलांनी नष्ट केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखत पोलीस विभागाला मदत करत महिलांनी गावातील अवैध दारू कमी केली आहे. शेकडो गावांमध्ये मुक्तीपथ गावसंघटना दारुमुक्तीसाठी सर्च संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या नेतृत्वात सक्रियपणे काम करत आहेत.
यामध्ये गावातील महिला जीवाची बाजी लावत आहेत. अशाच एका गावात महिला दारू पकडतात म्हणून दारू विक्रेत्या पुरुषांनी गाडीच्या डिकीत स्वतःची लघवी भरून ठेवली. महिला चेक करू लागल्या. हे काय आहे विचारले. त्यावेळी त्याने एका महिलेच्या हातावर ती लघवी टाकली आणि बघा काय आहे असे सांगितले. हा प्रकार लक्षात आल्यावर महिलांची बैठक झाली. पोलिसात तक्रार करण्यासाठी महिला गेल्या. आपण अडचणीत येणार हे लक्षात आल्यावर त्या इसमाने रडत महिलांचे पाय धरले माफी मागितली. दारूबंदीचे काम सोपे निश्चित नव्हते. आपली बायको दारू पकडायला जाते म्हणून एका नवऱ्याने एका हातात विषाची बाटली घेतली तर एका हातात कुऱ्हाड. हे विष पी नाहीतर मी तुला या कुऱ्हाडीने आत्ता ठार करतो. ती विष प्यायली. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. उपचार झाले. ती वाचली. अशा अनेक महिलांचे कष्ट या दारूबंदीसाठी लागलेले आहेत.
मुक्तीपथच्या माध्यमातून केले जात असलेले हे काम केवळ दारू पकडणे नष्ट करणे यामध्ये मर्यादित नाही. गावागावात अनेक लोकांना प्रशिक्षित करून त्यांच्याद्वारे एक मिशन म्हणून दारूच्या तंबाखूच्या दुष्परिणामाची जनजागृती केली जात आहे. यातून दारू पिण्याचे प्रमाण कमी होत आहे. दारूची मागणी घटत आहे. पोलिस विभागाच्या मदतीने गावसंघटना दारूचा पुरवठा कमी करण्यासाठी दिवसातील प्रत्येक तासाला कार्यरत आहेत. यातूनही जे दारूचे व्यसनी आहेत. त्यांच्यावर व्यसानोपचार करण्यासाठी गावागावात व्यसन उपचार शिबिरे राबवली जात आहेत. प्रत्येक तालुक्याला असे व्यसन उपचार क्लिनिक सुरू असून लोक त्याचा लाभ घेत आहेत. व्यसनाचे प्रमाण कमी होत आहे. दारूच्या सेवनाचे प्रमाण (consumption) कमी होत आहे. सर्व सरकारी कार्यालयांना या विषयातील तज्ञांनी प्रशिक्षणे दिली आहेत. त्याद्वारे ते त्यांच्या कार्यक्षेत्रात या कामासाठी योगदान देत आहेत. विशेष म्हणजे व्यसनात येणाऱ्या नव्या पिढीला वाचविण्यासाठी शाळांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम सतत राबवले जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून हि नवी पिढी व्यसनात येण्यापासून रोखता येणे शक्य झालेले आहे. बहु पातळीवर सुरू असलेला हा भारतातील एकमेव प्रयोग म्हणून यशाकडे वाटचाल करत आहे. लोकांच्या सहभागातून निर्माण झालेली दारू मुक्तीच्या दिशेने सतत आगेकूच करणाऱ्या या वाटेवर आज शेकडो महिला, कार्यकर्ते, आगेकूच करत आहेत.