ऊस पट्ट्यात बिबट्याचा वावर वाढला, वन विभागाच्या सूचना जारी...
पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात का वाढतीय बिबट्यांची संख्या, वन विभागाचं म्हणणं काय? शेतकऱ्यांनी कसं करावं बिबट्यांपासून स्वत:चं आणि कुटूंबाचं रक्षण वाचा अशोक कांबळे यांचा स्पेशल रिपोर्ट
कोरोनाच्या भीतीने लोक जीव मुठीत धरून जीवन जगत असताना सोलापूर जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीने जनता हैराण झाली आहे. गेल्या वर्षभरात अनेक पाळीव जनावरांचे हल्ल्यात गेले जीव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मार्च २०२० पासून सलग ६ महिने लॉकडाऊन केले होते. या लॉकडाऊनच्या दरम्यान रस्ते वाहतूक तसेच नागरिकांना संचारबंदी होती. त्यावेळी वन्य प्राण्यांना पूर्ण मोकळीक मिळाल्याने मुंबई सारख्या शहरात प्राणी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच याच लॉकडाऊनच्या काळात सोलापूर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला होता.
बिबट्याने मोहोळ, माढा, करमाळा तालुक्यात अनेक पाळीव जनावरांची शिकार केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या बिबट्याने अचानक ३ जून रोजी भोयरे ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे शेतकरी गोरख जाधव यांच्या वस्तीवर म्हशींचे रेडकू मारल्याने बिबट्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातून भीमा व सीना या दोन नद्या वाहत असून या नद्यांच्या परिसरात ऊसाची शेती मोठया प्रमाणावर केली जाते. बिबट्याच्या वाढीसाठी या नदी काठची ऊसाची शेती पोषक असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येते. त्यामुळे भविष्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
करमाळा तालुक्यात उजनी धरण पाण्याचे लाभ क्षेत्र जास्त असून या भागात ऊसाची शेती व केळीच्या बाग जास्त प्रमाणात आहेत. तर माढा तालुक्यातील ही बराचसा भाग उजनी लाभ क्षेत्रात येतो. उजनी-सीना जोड कालव्यातून सीना नदीत पाणी सोडले जाते. यामुळे माढा, मोहोळ ,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यातील शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली आले आहे. त्यामुळे या भागात जास्त प्रमाणात ऊसाची शेती आहे. तसेच भीमा नदी पंढरपूर तालुक्यातून वाहत असून या नदीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. या नदी काठी ही मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र आहे.
जिल्ह्यातील भीमा व सीना नदीला उजनी धरणातून बारमाही पाणी सोडले जाते. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या परिसरातील शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली आले आहे. या ठिकाणी नगदी पीक म्हणून ऊसाची शेती केली जाते. करमाळा,माढा, मोहोळ या तालुक्यातील भागात ऊसाची शेती जास्त प्रमाणात आढळून येते. ऊसाचे पीक कारखान्यास जाण्यास सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागतो.
ऊसाची लागण करून खुरपणी केली जाते. ऊसाला खत टाकून काही महिन्यानंतर बांधणी केली जाते. ऊस वाढीस लागल्यानंतर शेतकरी ऊसाच्या फडात जात नाही .ऊसाला पाण्याची सोय सरीद्वारे किंवा ठिबक सिंचन द्वारे केली जाते. ऊस वाढत असताना या ऊसाच्या शेतात रान डुकरे, कोल्हे, बेडके, व इतर प्राणी वाढू लागतात. या नद्यांच्या काठी मैलोनमैल ऊसाचे फड असल्याने बिबट्यांना फिरण्यासाठी व जीवन जगण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे मानले जात आहे.
या ठिकाणी असणारी रान डुकरे, कोल्हे,बेडके व इतर प्राणी बिबट्यांची भक्ष्यके आहेत. त्यामुळे बिबट्या ऊसाच्या शेतीत वास्तव्य करून राहू शकतो. ऊसात जास्त दिवस राहिल्याने बिबट्यांचे प्रजनन होऊन दीड वर्षाच्या कालावधीत बिबट्याची पिल्ल वाढण्याची शक्यता आहे.त्या मुळे भविष्यात सोलापूर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढू शकते असे अंदाज वन विभागाकडून वर्तवले जात आहेत. बिबट्यांची संख्या वाढल्यास त्यांच्याबरोबर जीवन जगायला शिकले पाहिजे असे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
कोरोनाने अनेकांचे बळी जात असताना बिबट्यामुळे मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. आधीच कोरोनाच्या भीतीने जनता हैराण असताना बिबट्याच्या रूपाने उभ्या राहिलेल्या या नव्या संकटामुळे लोकांवर जीव मुठीत धरून जीवन जगण्याची पाळी आली आहे.काही महिन्यांपूर्वीच बिबट्याने करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालत ३ जणांचे बळी घेतले होते. यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शार्प शूटरना पाचारण करण्यात आले होते. तेथे शूटरनी बिबट्याला गोळ्या घालून ठार केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून अज्ञात वासात गेलेला बिबट्या पुन्हा सक्रिय झाल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
भोयरे येथील शेतकरी गोरख जाधव यांच्याशी बातचीत केले असता ते म्हणाले की, ३ जूनला पाऊस सुरू होता. पाऊस उघडल्यानंतर रात्री वस्तीवर झोपायला गेलो. यावेळी म्हैस सुटलेली होती. रेडकाचा शोध घेतला असता दिसून आले नाही. यावेळी म्हैस बांधलेल्या ठिकाणी पाहिले असता बिबट्याच्या तावडीत रेडकू सापडू नये यासाठी बिबट्या व म्हैस यांच्यामध्ये बराच वेळ झटापट झाल्याचे तेथील पाऊल खुणावरून दिसून आले. आजूबाजूला रेडकाचा शोध घेतला असता बिबट्या दूर जाऊन रेडकाला खात होता. यावेळी बाजूच्या वस्तीवरील शेतकरी आबासाहेब पवार यांना बोलावले व याबाबतची माहिती दिली.
सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी येऊन वन्य प्राण्यांच्या ठशावरून बिबट्याचं असल्याचे सांगितले. यावेळी मृत रेडकाचा पंचनामा डॉक्टरांनी केला असून नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगितले.
मोहोळ वन परिक्षेत्राचे वनपाल अधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे यांनी सांगितले की, दि. ३ जून रोजी मौजे भोयरे या गावी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्या या वन्य प्राण्याने जाधव यांच्या पाळीव पशुधनावर हल्ला करून ठार मारले आहे. वन विभाग सोलापूर यांच्या वतीने मानव व बिबट यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन केल्यास बिबट व मानव यांच्यातील संघर्ष कमी होईल.
त्यासाठी बिबट्याचा वावर ज्या क्षेत्रात आहे तेथील लोकांनी विशेष काळजी घेण्यासाठी
हातात घुंगराची काठी किंवा टॉर्च बाळगावी.
मोबाईल किंवा रेडिओवर गाणी वाजवावी जेणेकरून बिबट्याला तुमच्या येण्याची चाहूल लागेल. त्यामुळे बिबट्या त्याचा मार्ग बदलेल.
उन्हाळ्यात घराबाहेर किंवा अंगणात झोपू नये.
अंगणाला जाळीचे बंदिस्त कुंपण घालावे.
उघड्यावर शौचास जावू नये.
बिबट्या आपल्या उंची समान किंवा कमी उंची असलेल्या जीवांवर हल्ला करून भक्ष्य करू शकतो.
शक्यतो नागरिकांनी बंदिस्त शौचालयाचा वापर करावा.
ऊसाची लागवड करताना ऊस हा अगदी घराला खेटून लावू नये.
ऊसाची शेती आणि घर यामध्ये कमीत - कमी २० ते २५ फुटाचे अंतर असावे.
बिबट वावर क्षेत्रात लहान मुलांवर विशेष लक्ष द्यावे. मुलांना एकटे अंगणात किंवा घराबाहेर सोडू नये.पालकांनी नेहमी लहान मुलासोबत राहावे.
नागरिकांनी आपल्या घराच्या चारही बाजूने जाळीचे बंदिस्त कुंपण करावे. जेणेकरून लहान मुलांना खेळता येईल.
पाळीव प्राणी बिबट्यांचे भक्ष्य असल्याने त्यांना बंदिस्त गोट्यातच ठेवावे.त्यामुळे बिबट घराभोवती फिरणे बंद होईल.
नागरिकांनी आपल्या घराच्या अवती भवती वाढलेले गवत व इतर झुडपे काढून टाकावी.परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून बिबट्याला लपायला जागा राहणार नाही.
आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा घाणीमुळे कुत्री, डुकरे, उंदीर, घुशी इत्यादी प्राणी येतात व त्यामागे त्यांना खाण्यासाठी बिबट येतो.
लहान मुलांनी शाळेत ये-जा करताना समूहाने जावे.तसेच गाणी गात किंवा मोठ्याने बोलत जावे.
बिबट वावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावेत.
बिबट दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये.त्वरित वनविभागाला कळवावे.पाठलाग केल्यास घाबरून जाऊन बिबट प्रतिहल्ला करू शकतो.त्यामुळे बिबट वावर क्षेत्रात मुजुरांनी विशेष काळजी घ्यावी.
ऊस तोडणीच्या वेळी बिबट्याची पिल्ले दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवावे.
बिबट्याच्या पिल्लांना हाताळू नये.त्याचे फोटो किंवा सेल्फी काढू नये.
बिबट विहरीत अडकल्यास त्वरित वनविभागाला कळवावे. गोंधळ गर्दी करू नये. वनविभागाला त्याची सुटका करण्यास मदत करावी.
पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला डिवचू नये. किंवा त्याचे फोटो काढू नये.
बिबट्या संदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नये. अफवांकडे दुर्लक्ष करावे.
शेतीकाम करत असलेल्यानी बिबट हल्ला करू नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी.
ऊस मजुरांनी ऊस तोडणी करताना सूर्योदयाच्या आधी व सूर्यास्तानंतर ऊस तोडणी करू नये.
अशा प्रकारची खबरदारी शेतकरी, नागरिक यांनी घेणे आवश्यक आहे.
जंगलावर राज्य होते ते वन्य प्राण्यांचे त्यातील काही भागावर शेतीची बीजे रोवली गेली आहेत.शेतात राहून चांगली शेती करता येते यासाठी शेतकऱ्यांनी शेतात घरे बांधली आहेत.मानवाला जंगल आणि शेतातील फरक कळत असला तरी वन्य प्राण्यांना मात्र हा फरक समजत नाही.त्यामुळे बिबट आणि मानवात संघर्ष होत आहे.