बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला जबाबदार कोण...?
महाराष्ट्राचा बिहार अशी ओळख असलेल्या राज्यातील बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून विधीमंडळात आक्रोश होऊनही प्रत्यक्षात मात्रा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे, प्रतिनिधी हरीदास तावरेंचा रिपोर्ट...;
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कायदा-सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पाडवा हा सण सर्वत्र जिल्ह्यात उत्साहात साजरा होत असतानाच दुपारी एका पुजाऱ्याची एका माथेफिरूने हत्या केल्याचं समोर आलं होतं मात्र पोलीस प्रशासनाने त्या आरोपीला अटक केली असली तरी ही एकच घटना नसून जिल्ह्यात अशा अनेक घटना घडत आहेत...महिला व मुलीवर अत्याचाराच्या अनेक घटना घडत असताना पोलीस प्रशासन मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट अशीच भूमिका घेत आहे त्यामुळे जिल्ह्यात कधी कुठे काय होईल हे सांगताच येत नाही...
केज तालुक्यात लाडेवडगाव परिसरात एक जळालेला अवस्थेत मृतदेह सापडला असून हा मृतदेह नेमका कोणाचा आहे. हे शोधून पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालं आहे..?केज तालुक्यात पुन्हा अजून एक विहिरीत मृतदेह सापडला आहे. बीड जिल्ह्यात काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन विवाहित मुलीवर चारशे जणांनी बलात्कार केल्याची घटनाही याच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या ठिकाणी घडली होती त्यानंतर पोलिसांनी त्यातील काही आरोपींना अटक जरी केले असले तरी पुन्हा आंबेजोगाई तालुक्यातच एका चिमुकलीवर एका 23 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली असून सर्वत्र एकच खळबळ उडाली होती पोलीस प्रशासन मात्र या आरोपींना अटक करीत असला तरी कठोरात कठोर शिक्षा त्यांना व्हावी अशीच त्या नातेवाइकांची अपेक्षा असते तर बीड जिल्ह्यात एक नव्हे दोन नव्हे अशा अनेक घटना रोज घडत आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन गप्प का आहे..? हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
बीड जिल्ह्यातील केज मतदार संघाच्या महिला आमदार नमिता मुंदडा यांनी आपल्या बरोबर सेल्फी काढण्यावरुन झालेल्या वादाचा पाढा विधानसभा सभागृहात वाचून दाखवला होता. तर त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन किती कर्तव्यदक्ष आहे हे यावरून लक्षात आले. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा स्वामी यांना या अधिवेशनात यावेळी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मात्र पोलीस अधीक्षक आर राजा स्वामी यांना रजेवर पाठवून हे प्रश्न इथे सोडतील का हा सुद्धा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे..?
माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यात काय काय घडतय याचा पाढा वाचून दाखवला होता. तर चक्क वाळूमाफिया कशा पद्धतीने वाळूउपसा करतात तर यावर कशा पद्धतीने नियंत्रण केलं पाहिजे. हे जर आपण लवकरात लवकर केलं नाही तर येणाऱ्या काळात अनेक अडचणी चा सामना पोलीस प्रशासनाला करावा लागेल असेही यावेळी त्यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर जिल्ह्यात वाळू माफियांनी तर हौदासच माजवला आहे. वाळू माफिया वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच ट्रॅक्टर घालत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कालच जिल्ह्यात घडली आहे.
जिल्ह्यात अनेक गुन्हे नोंद आहेत मात्र या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत हे मात्र मोकाट फिरत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात कायदा आहे का नाही जर कायदा आहे तर मग हा कायदा कुणासाठी आहे..? सर्वसामान्य माणसांकडून काही झालं तर पोलीस प्रशासन त्यांच्यावर गुन्हा नोंद करतोय. मात्र जिल्ह्यात होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनेत मात्र वाढ होताना दिसत आहे .बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे याही सभागृहात बोलल्या मात्र त्याच्यावर काहीही कार्यवाही झालेली मात्र दिसत नाही.