Ground Report : कोयना धरण परिसरात भूस्खलन, भूगर्भ तज्ज्ञांना पाचारण
कोयना धरण क्षेत्रात कम तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसत असतात. पण आता एका धरणाच्या जवळ असलेल्या एका शाळेच्या भिंतीला लागून भूस्खलन झाले आहे. त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंश यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
सातारा जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस पडतो आहे. अनेक भागात महापूर आला होता. तर काही ठिकाणी डोंगरांचे भाग कोसळण्याचे प्रकार घडले आहे. ही नैसर्गिक संकटे इथल्या नागरिकांची पाठ सोडत नाहीयेत. सातारा जिल्ह्यतील पाटण तालुक्यातल्या दुर्गम भागात सह्याद्रीच्या कुशीतील काही गावांवर दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढताच या गावातील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. काही गावातील लोकांना कोयना नगर इथल्या एका शाळेत जागा देण्यात आली आहे.
या शाळेत आल्यानंतर या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला खरा...पण काही दिवसातच त्यांच्यावर इथेही भूस्खलनाची टांगती तलवार निर्माण झाली आहे. कोयना विभागात सध्या भूस्खलाची भीती निर्माण झाली आहे. कोयना धरणाचा हाकेच्या अंतरावर घडलेल्या एका प्रकारामुळे कोयना धरणाच्या सुरक्षे संदर्भातही अफवांचे पेव फुटले आहे.
कोयना धरण हे 105 tmc पाणी साठवण क्षमता असलेले धरण आहे. या धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे जवळच्या काही गावांना आणि शहरांना पाण्याचा धोका असतो. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये या धरणाबाबतच्या प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर असते. याचबरोबर शेजारच्या कर्नाटक राज्याचेही लक्ष या धरणाच्या हालचालीवर असते. धरण परिसराद यंदाही रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले. ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
दरडग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्यालाही धोका
या सर्व घडामोडीत कोयना नगरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक शाळेच्या इमारतीला लागून मागच्या बाजूने मोठा खड्डा पडला आहे. यामुळे सर्वत्र भीती पसरली आहे. गेल्या ६० वर्षात भूस्खलनामुळे पडलेला एवढा मोठा खड्डा आपण पहिल्यांदाच पाहिला आहे, याआधी असे कधीही घडले नव्हते, अशी माहिती या गावातील काही ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे हा खड्डा का पडला, याचा शोध आता भूगर्भ शास्त्रज्ञांमार्फत घेण्यात यावा अशी मागणी सध्या इथल्या स्थानिकांनी केली आहे. हा प्रकार कोयना धरणापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत घडला आहे. त्यामुळे असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने धरणाच्या सुरक्षेबद्दलही काही जणांनी भीती व्यक्त केली आहे.
धरण व्यवस्थापनाचे म्हणणे काय?
यासंदर्भात आम्ही कोयना धरण व्यवस्थापनाशी संपर्क साधला. तेव्हा काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात काही दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात आता भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. पण सध्या होणारे भूस्खलन नक्की कशामुळे होत आहे याचा शोध विभागातर्फे घेतला जात आहे. तिथले काही नमुने आम्ही घेतले आहेत. तसेच महसूल आणि धरण व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली आहे. भूगर्भ तज्ञांनाही या ठिकाणी बोलावण्यात आले आहे. तसेच या सर्व प्रकारा संदर्भात काम करणाऱ्या एका संस्थेला संशोधनासाठी बोलावले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच कोयना धरणाच्या सुरक्षेबद्दल सुरू असलेल्या चर्चेबद्दल आम्ही त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, ह्या भूस्खलनामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नाही. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शाळा सुरू होण्याआधी भूस्खलन
कोयनानगर मधल्या ज्या शाळेत दरडग्रस्त गावातील लोकांना ठेवण्यात आले आहे, त्याच ठिकाणी हा खड्डा पडला आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याचे इथे मोटी दुर्घटना टळली. या शाळेची विद्यार्थी संख्या ही 1200 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे हा खड्डा पडून मोठी दुर्घटना झाली असती तर हाहाकार माजला असता. आता कोरोनाची लाट ओसरली असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण या शाळेच्या इमारतीला लागूनच हा भला मोठा खड्डा पडल्याने शाळा सुरू करताना व्यवस्थापनाला या धोक्याचाही विचार करावा लागणाऱ आहे. त्यामुळेच भूस्खलनाचा धोका कायम असल्याने तातडीने तज्ज्ञांना बोलावून या प्रकाराचा मूळ कारण शोधून काढण्याची गरज इथले नागरिक व्यक्त करत आहे.
सध्या कोयना धरण परिसरामध्ये भूस्खलन झाले आहे. अनेक गावांवर दरडी कोसळल्या आहेत. यात काही गावातील घरांवरही दरड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. अशा गावांमधील लोकांना प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आता या शाळेतील नागरिकांची स्थिती पुढे आड आणि मागे विहीर अशी झाली आहे. गावात डोंगर पडण्याची भीती आणि ज्या ठिकाणी वास्तव्य करत आतहे तिथे भूस्खलनामुळे इमारत पडण्याची भीती, अशा दुहेरी संकटातून नागरिक आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे सरकारने या नागरिकांच्या कायम स्वरुपी निवासाची सो करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
1967 साली या परिसरात मोठा भूकंप झाला होता. या प्रलंयकारी भूकंपामुळे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. धाब्याची घरे पत्त्यासारखी कोसळली होती. ही वेळ पुन्हा येऊ नये म्हणून इथले प्रकल्पग्रस्त आजही संघर्ष करत आहेत. या प्रकल्पग्रस्तांचे आजतागायत 65 वर्षात झाले पुनर्वसन झालेले नाही. त्यातच आता भूस्खलनाची भीती असल्याने इथल्या नागरिकांनी भूकंप मापन वेधशाळा पुन्हा कार्यान्वित कऱण्याची मागणी केली आहे. कोयना धरणाच्या लगत असलेल्या कोळकेवाडी धरणाजवळ असलेली वेधशाळा कोयना धरण प्रकल्पातील काही अधिकाऱ्यांनी बंद केली आहे. ती वेधशाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. भूस्खलनामुळे मोठा खड्डा पडला असल्याने वेधशाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी इथले स्थानिक नागरिक नंदकुमार सुर्वे यांनी केली आहे.
कोयना धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनाचा परिणाम धरणाच्या सुरक्षेवर होत नाही ना याची खातरजमा करण्याची गरज व्यक्त होते आहे. दरम्यान कोयनेच्या पाण्याचा रंग सध्या गढूळ झाला आहे. या परिसरात भूस्खलन होऊ माती पाण्यात मिसळल्याने पाण्याचा रंग बदलला आहे, पण त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन धरणात साठतो आहे, असेही तज्ज्ञांन म्हटले आहे. त्यामुळे धरणाच्या क्षेत्रात किती ठिकाणी किती प्रमाणात भूस्खल झाले आहे, त्याचा आढावा घेण्याची गरज व्यक्त होते आहे.