Ground Report : दरडग्रस्त तळीयेमधील गावकऱ्यांचे प्रश्न सुटले का?

गेल्या अतिवृष्टीने रायगड जिल्ह्यातील तळीये गाव उध्वस्त झाले होते. या दुर्घटनेला आता वर्ष पूर्ण होत आले आहे. मात्र तिथल्या लोकांना पक्की घरं तर सोडाच पण आजारापेक्षा इलाच भयंकर अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे. आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Update: 2022-07-18 14:24 GMT

रायगड जिल्ह्यात उंच माळरानावर आणि डोंगराच्या कुशीत तळीये हे गाव वसलेले होते. पण गेल्या वर्षी 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये इथे मोठी दुर्घटना घडली. संपूर्ण गावच्या गाव दरडीखाली दबले गेले आणि होत्याचे नव्हते झाले. या ठिकाणी दरड कोसळून 87 जणांचा मृत्यू झाला. तर, याच भागातील साखर सुतारवाडी येथे देखील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

तळीये दुर्घटनेला येत्या 22 जुलै शुक्रवार रोजी 1 वर्ष पूर्ण होतोय, येथील अनेक घरातील लोक मृत्युमुखी पडले. यामध्ये काहींचे संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब ढिगाऱ्याखाली गेले. कुणाचा बाप, कुणाची आई, कुणाचा भाऊ, कुणाची पत्नी, तर कुणाच्या पोटचे गोळे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. आभाळाएवढे दुःख मनात घेऊन प्रत्येक दिवस त्या भयानक पहाडाकडे पाहत अश्रू गाळणाऱ्या नातेवाईकांच्या वाट्याला अजूनही दिलासा मात्र आलेलाच नाही.





 


आजही मृतांच्या नातेवाईकांना मूलभूतसेवा सुविधा नाहीत, प्रशासनाने तात्पुरते दिलेल्या कंटेनरला गळती लागली आहे. आम्हाला पक्की घरे कधी मिळणार? पावसाळ्यात पत्र्याच्या घरात वारंवार शॉर्ट सर्किट होत असल्याने येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. सिलेंडर महागले आहे, पावसाळ्यात कंटेनरमध्ये चूल पेटवावी कशी हा प्रश्न महिलांपुढे आहे. प्रशासन आणि सरकारचे त्यांच्य़ाकडे दुर्लक्ष होत असल्याची इथल्या लोकांची तक्रार आहे.

महाड व पोलादपूर तालुक्यात दरवर्षी अतिवृष्टी, महापूर व दरड कोसळण्याच्या घटना घडतात. येथील अनेक गावे डोंगर कड्या कपारीत वसलेली आहेत. येथील अनेक गावे व वाड्या वस्त्यांमधील नागरिक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन एक एक दिवस ढकलतात. मृत्यूची टांगती तलवार कायम यांच्या शिरावर टांगलेली असते. तळीयेची दुर्घटना जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी आणि देशाला हादरवणारी घटना मानली जाते.




 


गेल्या अतिवृष्टीने रायगड जिल्ह्यातील तळीये गाव उध्वस्त झाले होते. या दुर्घटनेला आता वर्ष पूर्ण होत आले आहे. मात्र तिथल्या लोकांना पक्की घरं तर सोडाच पण आजारापेक्षा इलाच भयंकर अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे. आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट...येथील सुंदर निकम यांनी सांगितलं की, "आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे मोठी भेग पड्ली आहे. प्रशासनाचे लोक येऊन सांगतात की जास्त पाऊस पड्ला की तुम्ही रस्त्यावर या, पण आम्ही घर सोडून पावसात कुठे येणार, कुठं राहणार? रस्त्यावर येवुन मरण्यापेक्षा आम्ही घरात मरू".

तळीये दुर्घटनेत आपली आई-वडिल, पत्नी व बहिण गमावलेल्या व सैन्यात असलेल्या अमोल कोंडागर याने पाणावलेल्या डोळ्याने आपली व्यथा मांडली. अमोल म्हणाला की, या अपघातात मी माझे संपुर्ण कुटुंब गमावले, एक एक दिवस आम्ही दुख गिळून काढतोय. आमची घरे जमिनीत गाडली गेली, सरकारने आम्हाला राहण्यासाठी पत्र्यांचे कंटेनर दिले. उन्हाळ्यात पत्रा तापून घरात बसू शकत नाही, अशी परिस्थिती होती. तर आता पावसाळ्यात त्याहून भयानक परिस्तिती आहे. लहानशा कंटेनरमध्ये राहता येत नाही. पावसाळ्यात कंटेनरमध्ये पाणी शिरत आहे, अशा व्यथा त्यांनी मांडल्या.

येथील पूजा कोंड़ालकर यांनी सांगितले की, आपण घरात एकट्याच आहोत, सर्व नातेवाईक दुर्घटनेत गेले. आता कंटेनरमध्ये त्या एकट्याच राहतात, पण 15 दिवसांपासून घरात लाईट नाहीयेत, तक्रार करुनही लाईट आलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.




 



येथील अजय बाळकृष्ण साळुंके या तरुणाने सांगितले की इथे पहिली ते आठवीपर्यंत कंटेनरमध्ये शाळा भरवली जाते. पण इथे मुलांसाठी ना शौचालयाची व्यवस्था, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मुख्य शहरापासून कित्येक किलोमीटर दुर डोंगरावर हे ठिकाण असल्याने दुर्घटना घडली, काही झाले तर काय करावं असा प्रश्न पडतो, अशी भीती इथले गावकरी व्यक्त करत आहेत.

इथले नागरिक रवींद्र चव्हाण म्हणाले आमचे लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते गुवाहाटीला जावुन काय झाडी, काय डोंगर, काय हाटील समदं ओके हाय म्हणून मजा घेतात, पण जरा रायगडमधल्या तळीयेचे डोंगर आणि तिथली गावं, नागरिक किती धोकादायक अवस्थेत जीवन जगतात हे येवुन बघा, असा टोलाच त्यांनी लगावला.

येथील रहिवाशी सुनंदा निकम यांनी सांगितले की, "आम्ही राहत असलेल्या ठिकाणी मोठी भेग पडली आहे, आम्हाला जोराचा पाऊस वारा आल्यावर रस्त्यावर यायला शासनाच्या माणसांनी सांगितले आहे. पण अशा पावसात आम्ही रस्त्यावर येऊन बसणार कुठं आणि थांबणार कुठं, आमची काही तरी व्यवस्था केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


Full View

Tags:    

Similar News