पेरमलभट्टीवासीयांसाठी जल जीवन की ‘जेल जीवन’ ?
देशभर जल जीवन मिशन अंतर्गत देशभरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी दिले जात असल्याचे सरकारी जाहिरातीतून दिसते. पण प्रत्यक्षात मात्र अनेक दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना नदी नाल्यातून पाणी भरावे लागते. याविषयीचा वाचा कविश्वर मोतकूरवार यांचा ग्राऊंड रिपोर्ट…;
जल जीवन मिशन(jal jivan mission)अंतर्गत प्रत्येक गावाला स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा दिली जात असल्याचे सरकारी जाहिरातीत दिसते. पण गडचिरोली (Gadchiroli)जिल्ह्यातील अनेक गावात अद्यापपर्यंत पिण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. भामरागड तालुका मुख्यालयापासून चाळीस किमी अंतरावर असलेल्या पेरमलभट्टी(peramalbhatti )या गावातील नागरिकांना नाल्यातून पाणी भरावे लागते. उन्हाळा सुरु झाल्याने गावातील विहिरी, कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे डोक्यावर हंडे घेऊन स्त्रियांना नाल्यावरून पायपीट करून पाणी भरावे लागत आहे. पाणी भरण्यात त्यांचा अर्धा दिवस जात असल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी इतर काम करायचे कधी असा प्रश्न येथील स्त्रियांना पडला आहे.
याबाबत भामरागडचे(bhamaragad )गट विकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी खालील प्रतिक्रिया दिली. “ तालुक्यातील काही गावांतील पाण्याची समस्या लक्षात घेऊन ३ दिवसांपूर्वी १० बोअरवेल मंजूर केल्या आहेत. त्यासाठी ठेकेदार निवडला आहे. एखाद्या आठवड्यात नवीन बोअर मारणार आहोत.
सरकारी अधिकाऱ्यांचा हा ‘एखादा आठवडा’ उजाडणार कधी हे येत्या काळातच कळेल. देशभरात जल जीवन मिशनचा डांगोरा पिटला जात असताना पेरमलभट्टीवासियांसाठी मात्र सध्या पाणी भरने हे ‘जेल जीवन’ झाले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणखी किती आठवडे घेणार हे येत्या काळातच कळेल.