सिंचन योजना रखडली,शेतकऱ्यांचे 30 फूट खड्ड्यात आंदोलन
सिंचन योजनेसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात,यावा यासाठी शेतकरी गेल्या पाच ते सहा दिवसापासून कॅनॉल च्या खड्ड्यात आंदोलन करीत आहेत. आंदोलन पाटकुल च्या माळरानावर सुरू असून आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यासह वृध्द शेतकरी सहभागी झाले आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट..;
शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृध्दी यावी,या उद्देशाने शासन अनेक योजना राबवत असते. त्यापैकीच सिंचन योजना एक होय. वर्षानुवर्षे कोरडवाहू शेती केल्या नंतर बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रात बदल झाले पाहिजे,असे राज्यकर्त्यांना वाटू लागल्याने त्यांनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. सरकारे येतात आणि जातात. परंतु मागच्या सरकारे घेतलेले निर्णय नवीन आलेले सरकार व्यवस्थित रित्या राबवेल यांची काही शाश्वती नसते. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजनाच्या बाबतीत घडला आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील आष्टी सिंचन योजनेचा देखील समावेश होतो. या सिंचन योजनेला 1995 साली मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात 1997 साली झाली. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सरकारे आली,परंतु त्यांनी या योजनेकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे ही योजना गेल्या 26 वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत उभी आहे. या सिंचन योजनेसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाटकुल येथील माळरानावर असलेल्या सिंचन योजनेसाठी खोदण्यात आलेल्या अर्धवट कॅनॉल च्या 30 फूट खड्ड्यात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे, की एक तर ही योजना पूर्णत्वास लावा. अथवा हा कॅनॉल बुजवून टाका. त्यामुळे आम्हाला शेती कसता येईल. यावर सरकारने काय तो निर्णय घ्यावा,असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
सिंचन योजना कार्यान्वित होईल याबाबत शेतकऱ्यांच्या अजूनही आशा पल्लवित
गेल्या अनेक वर्षापासून सिंचन योजना रखडली असल्याने शेतकरी वर्गातून सिंचन योजनेचे काम सुरू करण्यात यावे,यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत आहे. परंतु निवडणुकी पूर्ता हा मुद्दा उचलून धरलं जातो. निवडणुकीनंतर राजकीय पक्ष यावर बोलत देखील नाहीत. असे शेतकरी सांगतात. वर्षानुवर्षे सिंचन योजना रखडली असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून कॅनॉल गेला आहे. त्यांची शेती दोन विभागात विभागली गेली आहे. कॅनॉल खोदण्यात असताना त्यातून निघालेला राडारोडा शेतकऱ्यांच्या शेतात पडला असून त्यामुळे वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या जमिनी भरावात गुंतून राहिल्या आहेत. शासनाने या रखडलेल्या सिंचन योजनेला पुन्हा एकदा गती द्यावी,असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
अर्धवट अवस्थेत गेल्या अनेक दिवसापासून कॅनॉल उभा
आष्टी सिंचन योजना मोडनिंब ते मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावापर्यंत आलेले आहे. या कॅनॉल चे काम पाटकुल माळरानावर थांबण्यास आले असून पुढे कुठे कॅनॉल घेवून जाणार आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना नाही. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख सांगतात,की गेल्या तीन वर्षापूर्वी कोन्हेरी येथील 42 फूट खड्ड्यात 11 दिवस प्राणांतिक आंदोलन केले होते. या आंदोलनात महिला देखील सामील झाल्या होत्या. या आंदोलनाची दाखल घेवून शासनाने तात्पुरत्या स्वरूपात या सिंचन योजनेचे काम चालू केले होते,परंतु पुन्हा काही दिवसानंतर ते बंद करण्यात आले. त्यामुळे ही योजना वर्षानुवर्षे रखडत चालली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर शासनाने गांभीर्याने विचार करावा,असे त्यांना वाटत आहे.
30 फूट खड्ड्यात शेतकऱ्यांचे आंदोलन
सिंचन योजनेसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात,यावा यासाठी शेतकरी गेल्या पाच ते सहा दिवसापासून कॅनॉल च्या खड्ड्यात आंदोलन करीत आहेत. आंदोलन पाटकुल च्या माळरानावर सुरू असून आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यासह वृध्द शेतकरी सहभागी झाले आहेत. आंदोलनाचे दिवस वाढत चालल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे शासनाने या आंदोलनाची दखल घेवून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात,असे या भागातील शेतकऱ्यांना वाटत आहे.
पावसात ही कॅनॉल मध्ये आंदोलन सुरूच
कॅनॉल मध्ये बेमुदत आंदोलन सुरू असून आंदोलक शेतकरी कॅनॉल च्या खड्ड्यात ठिय्या देवून बसले आहेत. सध्या परतीचा पाऊस जिल्ह्याला झोडपून काढत आहे. अशाही परिस्थितीत आंदोलक शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. त्यांनी कॅनॉल मध्येच बाज टाकून त्यावर प्लास्टिक कागदाचे आवरण टाकून झोपडी तयार केली आहे. पडत्या पावसात ही शेतकरी या झोपडीतून हालण्यास तयार नाहीत. या कॅनॉल च्या आजूबाजूला आणि कॅनॉल मध्ये मोठ्या प्रमाणात दगड गोठे आणि गवत असून साप आणि जंगली प्राण्यांनी हल्ला केल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील,असे आंदोलक शेतकरी सांगत आहेत.
शेतकऱ्यांच्या या आहेत मागण्या
कॅनॉल मधील आतील बाजूस प्लास्टर नसल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे प्लास्टर करण्यात यावे. कॅनॉल मध्ये मोठ मोठे दगड पडल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कॅनॉल लेव्हल करण्यात यावा. या सिंचन योजनेत पाटकुल,कोन्हेरी, तेलंगवाडी, बैरागवाडी,शेटफळ,मोडनिंब या भागातील शेतकऱ्यांच्या कित्येक एकर जमिनी या कॅनॉल मध्ये गेल्या गेल्या आहेत. त्याचा मोबदला देण्यात यावा. या योजनेत या कॅनॉल च्या आसपास असणाऱ्या हिवरे,वडाची वाडी,चिखली,यावली या गावांचा समावेश करण्यात यावा. यासाठी त्वरित निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा. सिंचन योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील बंद पडलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे. या सूचना योजनेतून मायनर म्हणजे कॅनॉल चे फाटे शेतकऱ्यांना काढून द्यावेत. उजनी धरणातील पाणी रोटेशन पद्धतीने आष्टी तलावात सोडण्यात यावे. मायनर ची अर्धवट राहिलेली कामे तातडीने सुरू करण्यात यावीत. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
पालखी महामार्ग रोखून धरण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
शासनाने आंदोलनाची दखल नाही घेतल्यास शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोहोळ - पंढरपूर पालखी महामार्ग रोखून धरण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.