भर पावसाळ्यात 80 गावांवर ओढवले भीषण पाणी टंचाईचे संकट

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील 80 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणातील उपयुक्त पाणी साठा संपल्यामुळे नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरविणे बंद करण्यात आले आहे . त्यामुळे भर पावसाळ्यात येथील 47 गाव व 33 नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे.. प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...;

Update: 2022-07-02 15:10 GMT

 पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर घराच्या कौलारू पागणी चे पाणी पिण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे . येथील गोरगरीब जनतेला वर्षाचे बाराही महिने पाणी विकत घ्यावे लागत आहे, त्यामुळे येथील जनतेत असंतोष उफाळून आला आहे. या पाणी टंचाईचे पडसाद रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे .




 


मेलेल्या गुरांसारखा धरणातील पाण्याला उग्र वास येत असल्याने नागरिक संतप्त झालेत.

मागील वर्षी धरणातील गाळ काढूनही यावर्षी उमटे धरणांतील पाणी संपल्यामुळे 80 गावांना पाणी टंचाईला समोर जावे लागलें आहे . धरणाची उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता धरणातील गाळ वाढल्यामुळे कमी झालेली आहे . स्थानिक प्रतिनीधी व शासनाने गेल्या वर्षी गाळ काढण्याचा प्रयत्न केला असला तरी धरण पूर्णपणे गाळमुक्त न झाल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने मत जलतज्ञ व्यक्त करीत आहेत . उमटे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा उपविभागाकडून दरवर्षीप्रमाणे पाणी टँकरवर अवलंबून वितरणाबाबत योग्य नियोजन करण्यात येऊन धरणातील पाणीसाठा जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल याबाबतची खात्री करण्यात आलेली होती . 18 जानेवारी 2022 पासून उमटे धरणात क्षेत्रांतील 43 गाव 33 आदिवासी वाड्यांना एक दिवसाआड पाणीपुरवठा व 23 मे 2022 पासून दोन दिनसाआड पाणी पुरवठा करण्याची विभागाकडून सुरवात करण्यात आली होती . 02 जून रोजी पुन्हा पाणी पुरवठा विभागाकडून उमटे धरणाची पाहणी करण्यात आली त्या पाहणीत धरणातील उपलब्ध पाणी साठा संपला असल्याचे वास्तव समोर आले. तसेच दूषित पाणी पुरवठा यामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आलेय.

उमटे धरण क्षेत्रातील अनेक गावे भर पावसाच्या हंगामात तहाणलेली दिसत आहेत. सध्या येथील 43 गावे व 33 आदिवासी वाडया भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहेत, काही ठिकाणी धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्तिती दिसून येत आहे. या पाणीटंचाईला अकार्यक्षम अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत. उमटे धरणातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे? उमटे धरण हे मागील सन 2016-17 पासून उमटे धरणाचा गाळ काढून धरणाच्या संरक्षण भिंतीची भगदाडे भरावीत यासाठी उमठे धरण क्षेत्रातील ग्रामस्थांनी शासनाला वारंवार विनंती अर्ज दिले. मात्र शासनाने नकारात्मकतेची भूमिका घेवून धरणाचा गाळ न काढता लोकांच्या भावनेची चेष्टाच केली आहे. असे संतप्त ग्रामस्थानी म्हटले. याठिकाणी शासनाच्या जलजीवन मिशनची ऐशी की तैशी झालीय.




 


प्रत्येक नागरिकाला दैनंदिन शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याचा शासन आदेश इथं धुळीत मिळालाय. आपल्या समस्या व ज्वलंत पाणी प्रश्नाबाबतीत येथील ग्रामस्त, तरुण संघटीत झाले व जिल्हाधिकारी रायगड , मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी तसेच मुख्य कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग रायगड जिल्हा परिषद यांना निवेदनाच्या प्रत देण्यात आल्या आहेत. मात्र आजही या धरणाच्या गाळ उपसा व शुद्ध पाणीपुरवठा प्रश्नावर संवेदनशिलता दिसून येत नाही. असंख्य गावांची तहान भागविणारे परंतू भ्रष्टाचाराच्या गाळात रुतलेल उमटे धरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धरणाची साठवण क्षमता जरी मोठी असली तरी सध्या धरण गाळाने भरलंय, मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा,धरणाची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी जोर धरत आहे. मागणीची जलद पूर्तता करावी अन्यथा....इथल्या पाणी प्रश्नावर उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थानी दिलाय.

सध्या उमटे धरणाच्या पाण्यावर धरणालगतची 80 गावे अवलंबून आहेत. उमटे धरण हे रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येते. मात्र राजकीय व शासकीय उदासीनतेमुळे धरणात मागील 40 ते 45 वर्षांपासून गाळ तसाच साचलेला आहे. उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या येथील तरूणाईने दिनांक 1 मे 2019 रोजी तीन वर्षापूर्वी महाराष्ट्र दिनी धरणाचा गाळ काढण्याच्या संदर्भात श्रमदान करून शासनाचा निषेधही नोंदविला होता. शासनाने गाळ काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपावेतो शासनाने घेतलेले निर्णय धुळखात पडत असून गाळ तसाच साचलेला आहे हे दुर्देव आहे. उमटे धरणाचा गाळ यावर्षी तरी आपण युद्धपातळीवर काढाल अशी अपेक्षा ग्रामस्त महिलानी व्यक्त केलीये. धरणाच्या दयनीय अवस्थेची जिल्हा प्रशासनाने पाहणी करुन तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी जोर धरते आहे.




 


येथील उमटे धरणात गाळ साठला असून सदर धरणातील गाळ काढून धरणाचे खोलीकरण करणे,जकवेल पर्यंत पोहचण्याच्या मार्गाचे व सांडवा मोडकळीस आल्याने त्याचे काम करणे गरजेचे आहे.सदर सविस्तर पाहणी अहवाल साठी नियुक्त तांत्रिक सल्लागार यांनी सर्वेक्षण केले असून अंदाजपत्रक व सविस्तर अहवाल सादर केला असल्याचे पत्र रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग अभियंता यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग रायगड जिल्हा परिषद यांना दिलेले आहे.त्यानुसार पुढील कार्यवाही होत आहे.

Full View

Tags:    

Similar News