दिव्यांग मुलीला न्याय मिळाला नाही तर कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन इशारा
जोपर्यंत आमच्या दिव्यांग मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. वेळ आल्यास कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करू,असा इशारा कुरुळे कुटुंबाने प्रशासनाला दिला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट...
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चिखुर्डे गाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून याठिकाणी ग्रामपंचायती समोर आंदोलन सुरू असताना दिव्यांग वैष्णवी कुरुळे या मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे. चीखुर्डे गावच्या ग्रामपंचायती समोर दिव्यांगाच्या निधीसाठी आंदोलन सुरू होते. यामध्ये मृत दीव्यांग वैष्णवी कूरुळे सहभागी झाली होती. गेल्या अनेक दिवसापासून मृत वैष्णवी हीचे वडील रामचंद्र कुरूळे आपल्या दोन्ही दिव्यांग मुलांना शासनाचा निधी मिळावा,यासाठी सातत्याने आंदोलने करत होते. पण प्रशासन त्याची दखल घेत नव्हते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर दिव्यांग मुलीला ठेवले होते. त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसात निधी मिळवून देतो आणि संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करतो,असे आश्वासन दिले होते.
पण त्यांच्याकडून कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळेच आम्ही ग्रामपंचायतीकडे असणारा 5 टक्के निधी मुलांना देण्यात यावा,यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. पण मुलीला आंदोलनात घेवून गेल्यानंतर त्याठिकाणी काही वेळातच मुलीला चक्कर आली. तिचे डोळे पांढरे झाले,तोंडातून फेस येवू लागला त्यामुळे लागलीच मुलीला बार्शी येथील डॉ.सुनील पाटील यांच्या दवाखान्यात अॅडमिट करण्यात आले. तिच्यावर चार दिवस उपचार सुरू होते. पण अचानक आजार गंभीर झाल्याने उपचार अशक्य असल्याचे कारण देत डॉक्टरांनी मुलीला घरी घेवून जाण्यास सांगितले. त्यानंतर मुलीचा घरी घेवून येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. माझ्या मुलीच्या मृत्युला शासन आणि प्रशासन जबाबदार असून संबधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. वेळ आल्यास कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करू,असा इशारा कुरुळे कुटुंबाने प्रशासनाला दिला आहे. शासन,प्रशासन यावर काय निर्णय घेतेय याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या दीड वर्षापासून रामचंद्र कुरूळे दिव्यांग मुलांना निधी मिळावा यासाठी करत आहेत आंदोलने रामचंद्र कुरुळे यांची दोन्ही मुले दिव्यांग आहेत. त्यापैकी वैष्णवी या मुलीचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही मुलांना शासनाने दिव्यांगांचा निधी द्यावा,यासाठी गेल्या दीड वर्षापासून आंदोलने करत असल्याचे रामचंद्र कुरुळे यांनी सांगितले. पण शासन,प्रशासनाने याची दखल घेतली नाही. दिव्यांगासाठी ग्रामपंचायतीकडे 5 टक्के निधी असतो तर पंचायत समितीकडे 7 टक्के निधी असतो. पण तो खर्च केला जात नाही. याबाबत नागरिकांनाही अधिक माहिती नसल्याचे रामचंद्र कुरुळे सांगतात. 17 डिसेंबर रोजी दिव्यांग मुलीला जिल्हाधिकारी यांच्या टेबलावर ठेवले होते. त्यावेळी त्यांनी सात दिवसात न्याय मिळवून देतो आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करतो,अशा प्रकारचे आश्वासन दिले होते.
पण त्याची त्यांच्याकडून पूर्तता झालीच नाही. त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी गावच्या ग्रामपंचायती समोर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात 23 तारखेला मुलीला सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास घेवून गेलो. त्यावेळेस उन्हाचा कडाका वाढला होता. ती उभी राहिली असता तिला तीव्र झटका आला. त्यानंतर तिचे तोंड वाकडे होवून डोळे पांढरे झाले. तिच्या तोंडातून फेस येवू लागल्याने तिला बार्शी येथील डॉ.सुनील पाटील यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे चार दिवस अॅडमिट केल्यानंतर तिची स्थिती अधिकच गंभीर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी मुलीला घरी घेवून जाण्यास सांगितले. त्यानंतर गावाकडे येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. यासंबधी अधिकाऱ्यांना कळविले असता त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मृत वैष्णवी वर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैष्णवीच्या मृत्यू नंतरही शासन आणि प्रशासनाकडून नुसती आश्वासने मिळत असल्याचे रामचंद्र कुरुळे सांगतात.
माझ्या नातीला न्याय देण्यात यावा
मृत वैष्णवी च्या आजीने बोलताना सांगितले,की मुलांना दिव्यांगांचा निधी मिळावा यासाठी माझा मुलगा गेल्या दीड वर्षापासून विविध प्रकारची आंदोलने करत होता. पण शासन आणि प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. दोन्ही मुले दिव्यांग असल्याने त्यांच्या दवाखान्यासह इतर खर्च त्याला परवडेना गेला होता. त्यामुळेच तो शासनाकडे निधीची मागणी करत होता. पण निधी काही मिळालाच नाही. तिला शेवटपर्यंत न्याय मिळालाच नाही. शासनाने आतातरी दुसऱ्या दिव्यांग मुलाचा विचार करून निधी द्यावा.
..अन्यथा कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करू
वैष्णवीच्या मावशीने बोलताना सांगितले,की रोज कोणीतरी येवून आश्वासने देत आहेत. काल आमदारांनी येवून संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याची पूर्तता झाली नाही. पण आम्ही गप्प बसणार नाही,आमच्या मुलीला न्याय मिळाला नाहीतर मंत्रालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करू,असा इशारा मृत वैष्णवीच्या मावशीने दिला आहे.
आमच्या आंदोलनाची कोणीच दखल घेतली नाही
ग्रामस्थ अमर पाटील यांनी बोलताना सांगितले,की ग्रामपंचायती समोर आम्ही आंदोलन करत होतो. त्यासंबंधी पंचायत समितीला कळविले होते. 23 तारखेला पत्रकार परिषद घेण्याचे ठरले होते. पण त्याच दरम्यान मुलीच्या मृत्यूची घटना घडली. संबधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही स्मशानभूमीत देखील आंदोलन केले. त्यानंतर 27 तारखेला पिंड दान आंदोलन देखील केले,पण आमची कोणीच दखलच घेतली नाही. त्यामुळे दिव्यांग वैष्णवीच्या मृत्युला संबधित अधिकारीच जबाबदार आहेत, असे ग्रामस्थ अमर पाटील यांचे म्हणणे आहे.
पिढीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला - तहसीलदार
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पिढीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी,यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती बार्शीचे तहसीलदार शेरखाने यांनी दिली. संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई चा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला - गटविकास अधिकारी दिव्यांगांच्या निधी संबंधी कामात कुचराई केल्या प्रकरणी संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला असल्याची माहिती बार्शीचे गटविकास अधिकारी बिचुकले यांनी दिली.