आधारकार्ड नसलेल्या व्यक्तींनी कोरोनाची लस कशी घ्यायची?
ज्या व्यक्तीकडे आधारकार्ड नाही. त्या व्यक्तीला कोरोनाची लस दिली जात नाही. अशा व्यक्तीने लस कशी घ्यायची? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला असताना आधारकार्ड नसल्यास लस कशी द्यायची? याबाबत शासनस्तरावर देखील कोणताच पर्याय नसल्याचं समोर आलं आहे. पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट;
जगभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतातही लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिला टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आणि दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील तसंच ज्या लोकांना गंभीर आजार आहेत अशा 45 वर्षावरील लोकांना आधारकार्ड पाहून लस दिली जात आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. मात्र, ज्या लोकांकडे आधारकार्ड नाही. त्यांनी काय करायचे?
तुमच्या कडे आधारकार्ड नाही, तर मग तुम्हाला कोरोनाची लस मिळणार नाही. होय अशीच परिस्थिती आहे. आधार कार्ड नसणाऱ्यांना मध्ये भिकारी, बेघर , दिव्यांग लोकांचा समावेश आहे. त्यामुळं या लोकांनी लस कशी घ्यायची? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. विशेष बाब म्हणजे प्रशासनाकडे देखील याबाबत कुठल्याच गाईडलाईन नसल्याचे समोर आले आहे.
आधारकार्ड नाही तर लस नाही का?
कोरोना लसीकरणासाठी या टप्प्यामध्ये 45 वर्षापुढील आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. बहुतेक बेघर असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या आजाराचं प्रमाण अधिक दिसून येत. या लोकांना लस देणं गरजेचं आहे. मात्र, लसीकरणाच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये आधारकार्ड अनिवार्य असून आधार कार्ड नसल्यास कुठला पुरावा किंवा ओळखपत्र वापरावे? या संदर्भांत प्रशासनाकडे गाईडलाईन नाहीत, त्यामुळे अश्या लोकांचे लसीकरण कसे केले जाईल..? त्यांना कोरोनाची लागण होणार नाही का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय.
बुलडाणा शहरात बेघर, निराधार, दिव्यांग, भिकारी यांची संख्या 50 च्या जवळपास आहे. हे सर्व जण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भीक मागतात. तर काही भंगार गोळा करतात, तर काही दिव्यांग व्यक्ती आहेत. इतर राज्यांमधून आलेल्या या सर्व लोकांकडे आधारकार्ड नाही.
या लोकांशी आम्ही बातचीत केली असता, ते म्हणाले... आमच्याकडे रेशन कार्ड, मतदान कार्ड यासारखा कोणताच पुरावा नाही. आमचं नाही घर आहे ना कोणता पत्ता? त्यामुळं ओळखपत्र नसताना आम्हाला आधारकार्ड कसं मिळणार? असा सवाल हे लोक करत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असलेल्या मलकापूर, नांदुरा, शेगाव, आणि मंदिर, मज्जीद, दर्गा असलेल्या सैलानी, चिखली अशा ठिकाणी लोकांची संख्या अधिक असून जिल्ह्यात 500 च्या सुमारास कुठलेच ओळखपत्र नसलेल्या व्यक्ती असल्याचा अंदाज सामाजिक संघटनांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केला आहे. राज्यात ही संख्या लाखोंच्या घरात असू शकते. मात्र, अशा लोकांची निश्चित आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. कारण या लोकांची कुठेच नोंद नसते. ते सतत भटकत असतात.
या संदर्भात आम्ही चिखली येथील मायाशी बातचीत केली ती म्हणते... आम्ही घिसाडी आहोत. आता काम नाही तर आम्ही भंगार वेचण्याचं काम करतो. आमच्या कुटुंबात 10 ते 15 लोक आहेत. आमच्या घरात 2 ते 3 लोक आहेत. त्याच्याकडे आधारकार्ड आहे. बाकी कोणाकडे आधारकार्ड नाही. आता करावं हा प्रश्न आहे. सरकारने काही तरी करावे. अंगठा द्या म्हटलं तिथं आम्ही अंगठा देतो.
आजी सांगते माझ्याकडे आधारकार्ड होतं. पोत्यात आता पाहावं लागेल. आम्ही भंगार विकून खातो. आमच्याकडे कोणी लसीचं सांगायला आलं नाही. कोरोनाची भीती वाटते. सगळ्या जगालाच कोरोनाची भीती वाटते. कोणी लस दिली तर घेऊ. खायला दाना मिळत नाही. लस कुठून घ्यायची? असा सवाल आजी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात आम्ही सामाजिक कार्यकर्ते अशोक काकडे यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले... फक्त बुलडाणा शहरातच जर आपण विचार केला तर 25 ते 30 लोक असे सापडतील की, त्यांच्याकडे आधारकार्ड नाही. आधारकार्डच काय कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र नाही. तसंच आपण जिल्ह्याचा विचार केला तर प्रत्येक तालुक्यात 5 ते 7 भिकारी भेटतात. त्यांच्याकडे कोणतंही ओळखपत्र नसते. ही परिस्थिती फक्त बुलडाण्याचीच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरात तर या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बुलडाण्यात या लोकांची संख्या अधिक आहे.
त्यामुळं प्रशासनाने एखाद्या सामाजिक संघटनांचा आधार घेऊन या लोकांच लसीकरण करायला हवं. या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यावर अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणताही आदेश आलेला नसल्याचं सांगितलं. शासनाने या सर्व बाबींचा विचार करायला हवा. जे लोक भीक मागतात, रस्त्यावरचे मनोरुग्ण यांना देखील लस देण्याची व्यवस्था करण्यात यावी. समाजाचा भाग म्हणून या लोकांचा देखील आपण विचार करायला हवा.
आज ज्या लोकांकडे पैसा आहे. असे लोक लस घेत आहे. मात्र, ज्यांच्याकडे लस नाही. त्यांनी काय करायचे? त्यांना कोरोनाची भीती नाही का? असा सवाल काकडे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केला आहे. या संदर्भात बुलडाणा जिल्हा शल्यचिकित्सक यांना विचारणा केली असता वरिष्ठ कार्यालयाकडून अशा लोकांसाठी आता तरी कुठल्याच गाईडलाईन आल्या नसून ही गंभीर बाब असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन त्यावर लवकरच पर्याय काढणार असल्याचे त्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले आहे.
बुलडाण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस सांगतात... आपण वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेणार आहोत. तसंच सदर लोकांचं लसीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यावर काय तोडगा काढला जाऊ शकतो यावर अभ्यास सुरु आहे. त्यांना महसूल किंवा इतर विभागाकडून प्रमाणित करून त्यांना लसीकरणाच्या यादीमध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या संदर्भात आत्तापर्यंत कोणतेही आदेश आलेले नाही. आमचा अभ्यास गट वरिष्ठाशी ही बाब लक्षात आणून देईल आणि त्यानंतर लसीकरणाला सुरुवात होईल. असं मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं आहे.
राज्यात सध्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून १५ हजारांच्या वर कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३ % एवढा झाला आहे. त्यामुळे कोरोना विरोधात सध्या लसीकरण हा महत्त्वाचा रामबाण इलाज असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ही लस ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही. त्यांनी कशी घ्यायची? असा प्रश्न आधारकार्ड नसलेल्या बेघर, दिव्यांग, भिकारी लोकांनी काय करायचं? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. सरकारने यामध्ये तात्काळ लक्ष घालावं. अशी मागणी या निमित्ताने समोर आली आहे.