#Covid कोरोना आणि हवामान बदलाच्या संकटातून कसा सावरतोय आंबा उद्योग
हवामान बदलामुळे (climate Change) आंब्यावर (Mango) रोगाराई पडून उत्पादन आणि उत्पन्न प्रभावित झाले. कोविडच्या संकटामुळे निर्यातही (export) रोडावली. सर्व संकटावर मात करुन अलिबागच्या गावठी हापूसने पुन्हा एकादा आंतराष्ट्रीय बाजारपेठत झेप घेतली आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...;
आंबा हा फळांचा राजा आहे हे जगमान्य झालेले असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्त्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे . कोकणातील हापुस चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती व असंख्य आव्हाने पेलत अलीबाग रायगड (कोकण)चा गावठी हापुस सातासमुद्रापार पोहचला आहे. त्यामुळे येथील आंबा बागायतदार सुखावला आहे. अमेरिकेत अलीबागच्या गावठी हापुसने भाव खाल्ल्ला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकणच्या हापुस चा प्रभाव दिसुन येतो आहे.
आंबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारताचा तसेच महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो . महाराष्ट्रात आंब्याचे क्षेत्र ३,५७,२ ९ ० हेक्टर आहे . मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा निर्यात होत असून त्यापासून शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे पैसा मिळत आहे . हापूस आंब्यापाठोपाठ इतर विभागातील केशर आंबाही मोठ्या प्रमाणात निर्यात होण्यास सुरुवात झालेली आहे . त्यामुळे आंब्यापासून आपल्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले की यावर्षी हवामान बदल होत प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. संपुर्ण कोकणात 2 डिसेंबर रोजीच्या पावसाने आंबा बागायतदार यांचे कंबरडे मोडले. 30 तास सलग पाऊस व हवा यामुळे आंबा मोहर गळून पडला, तसेच पाण्याची पातळी वाढल्याने आंबा मोहर येण्याची प्रक्रिया मंदावली. डिसेंबर महिना आंबा बागायतदार यांच्यासाठी निराशाजनक गेला. अगोदर जो मोहर आला तो बुरशी व बुरशीजन्य रोगांनी नुकसान झाले. जानेवारी मध्ये आलेला मोहोराने अगोदरचे आंबे पाडून टाकले. अंबा यावर्षी उशिरा आलेला आहे, रत्नागिरी व देवगड चा आंबा संपत चालला आहे, त्यामुळे अलीबाग व रायगडच्या अंब्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. अलीबाग तालुका हापुस उत्पादनात अग्रगण्य तालुका आहे.
अलीबागच्या गावठी हापुस ला मोठी पसंती आहे, ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. मात्र आंबा उशिरा आल्याने मजूर उपलब्ध होत नाहीत, पूर्वी वेळ मर्यादा 15 मार्च ते में अखेर मिळत होता, आता फक्त 5 में ते 30 मे इतका वेळ मिळतोय, आंबा पडून देखील नुकसान होतेय. त्यामुळे घाई होते, अशात चांगले दर व मार्केटिंग यावर आम्ही काम करतोय. आता आंबा काढण्याचा सिजन जूनपर्यंत राहणार असून जूनमध्ये पाऊस पडला तर आंबा पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. फवारणी व इतर खर्च वाढला आहे. हा परवडणारा नाही. यातच एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना नंतर परदेशातील मार्केट आता व्यापार विनिमयासाठी मोकळे झाले आहे. अमेरिकासारख्या राष्ट्रात कोकणातील अलीबागच्या गावठी हापुस ला मागणी वाढल्याने सुगिचे दिवस आलेत, अस म्हणायला हरकत नाही. वादळ व पाऊस यामुळे खुप मोठ नुकसान झाल, पुढचे दहा वर्ष है नुकसान भरून येणार नाही, कोकणातील शेतकरी कधी निराश होत नाही, कोव्हीड मध्ये आंबा कमी असून उत्पादन चांगले मिळाले. कारण आम्हाला कोव्हीडने आंबा शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत थेट विक्रीचा मार्ग मिळाला. यातून आंबा शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळू लागलाय असे संदेश पाटिल म्हणाले.
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लादलेल्या निर्बंधांमुळे विकिरण सुविधांच्या तपासणीसाठी USDA निरीक्षकांना भारतात भेट देता आली नव्हती. म्हणून 2020 मध्ये भारतीय आंब्याच्या निर्यातीवर अमेरिकेने निर्बंध घातले होते. दरम्यान हे निर्बंध हटवले आहेत, यामुळे निर्यातदारांना चांगल्या व्यवसायाची आशा असल्याने, बहुतेकांनी व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यावर्षी अमेरिकन बाजारपेठेत केसरऐवजी हापूसला जास्त मागणी आहे.
कोव्हीड महामारीने दोन वर्षांपासून देशात विवीध ठिकाणी पिकला जाणारा आंबा परदेशात विकला गेला नव्हता. त्यामुळे आंबा उत्पादक व शेतकरी यांना याचा मोठा फटका बसला होता, मात्र आता संधीची दारे खुली झाली आहेत. यंदा आंब्यांची निर्यात परदेशात होणार असल्याने आंब्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तम दर्जाचा आंबा निर्यात होणार असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. दोन वर्षांपासून असलेली निर्यांत बंदी उठवल्याचा फायदा होणार आहे.
रायगड जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये आंबा बागांचे क्षेत्र 14 हजार हेक्टर इतके आहे. उत्पादनक्षम आंबा बागा या 12540 हेक्टर क्षेत्रावर आहेत. मागील दोन वर्षात निसर्ग व तौक्ते चक्री वादळाने फळ बागा व आंबा बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.
निसर्ग चक्री वादळाने जवळपास 8000 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर तौक्ते चक्री वादळाने जवळपास 1100 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शासनाकडून एन डी आर एफ व एस डी आर एफ चे नॉर्म नुसार शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली आहे.कृषी विभागामार्फत ज्या फळ बागा क्षेत्रांचे नुकसान झाले त्या क्षेत्रात फळबाग पुनर्लागवड व पुनर्जीवित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
आजतागायत 4123 शेतकऱ्यांना 13 कोटी रक्कम वितरित केलेली आहे. अजूनही 22364 शेतकऱ्यांना जवळपास 27 कोटींचा निधी वितरित करणार आहोत. सदर निधी मंजुरीकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच हा निधी देखील वितरीत केला जाईल. फळबागांचे मागील दोन वर्षांपासून होणाऱ्या नुकसानीतुन सावरण्यासाठी कृषी विभाग शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनी या परिस्थितीत डगमगू नये शासन व कृषी विभाग आपल्या पाठीशी उभा आहे. दरम्यान रायगड़ अलीबाग येथील आंबा परदेशात निर्यात होत असल्याने आंबा उत्पादकाना चांगली संधी उपलब्ध झाली असून त्यांच्या उत्पन्नात वाढ़ होतेय ही बाब समाधानकारक आहे, असे रायगडचे प्रभारी कृषिअधिक्षक दत्तात्रेय काळभोर यांनी सांगितले.