सांगली – दोन वर्षातील लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे बँड पथकं हवालदिल झाले आहेत. आधी काम पूर्ण बंद झाले होते, आता निर्बाधांमुळे लोकांनी लग्न समारंभांमध्ये बँड पथकांनी बोलावणे बंद केले आहे. पण या काळात बँड वाल्यांवर भंगार विकून जगण्याची वेळ आली आहे. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी विटा येथील सुरताल बँड कलाकारांची व्यथा जाणून घेतली आहे...
कोरोनामुळे अनेक छोटे उद्योजक देशोधडीला लागले. त्याचा सर्वात जास्त परिणाम ग्रामीण भागातील बँड कलाकारांच्या आयुष्यावर झाला आहे. काम नसलेल्या कलाकारांवर भंगार वेचण्याची वेळ आलेली आहे. वाद्यांवर स्वर शोधात फिरणारे या कलाकारांचे हात कचऱ्यातील कागद काच पत्रा शोधत आहेत. बँड कलाकारांची व्यथा मांडणारा आमचे विशेष प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा हा रिपोर्ट नक्की वाचा.
ज्या हातांची बोटे हार्मोनियमच्या बटनावर फिरत होती. ज्या बोटाच्या कलागतीमुळे सनई मधून सप्तसूर उमटत होता. ज्या हातांमध्ये माईक आणि ढोल होता. कोरोनामुळे त्याच हातांवर कचऱ्याच्या ढिगातून कागद काच पत्रा गोळा करण्याची वेळ कोरोनामुळे आली. लोकांच्या मंगल प्रसंगी सप्त सूर वाजवणाऱ्या कलाकारांवर भंगार गोळा करण्याची वेळ आली आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा शहरात असणाऱ्या सुरताल या बँजो पथकातील कलाकार संभाजी चव्हाण यांचे आयुष्य सुरळीत सुरु होते.बँड पथकात गायन करून आलेल्या पैश्यातून ते आपल्या कुटुंबाची गुजराण करत होते. कोरोना आला आणि सुरळीत सुरु असलेले त्यांचे आयुष्य या देशोधडीला लागण्याची वेळ आली. याबाबत ते सांगतात "माझ्या घरात कुणीही नोकरीला नाही. आमचे पोट या बँजोवरच अवलंबून आहे. कोरोना आला आणि आमचे खाया पियाचे वांद झाल. आमच्यातले काही कलाकार भंगार विकून जगू लागले. काच पत्रा विकून जगू लागले. दुसरा काम धंदा मिळाला नाही. असेच दोन वर्ष निघून गेले. आताही सुरु असलेल्या निर्बंधांमुळे आमच जगणं मुश्कील झाल आहे. सगळ सुरळीत होईल या आशेवर दोन वर्षे काढली पण अद्याप कार्यक्रम सुरळीत झालेले नाहीत. लग्न समारंभात दोनशे लोकांची मर्यादा असल्याने लोक बँड बोलावत नाहीत. लोकांनी हा खर्च कमी केला असून भविष्यातील काही वर्षे हा परिणाम आम्हा कलाकारांना सोसावा लागणार आहे. कलाकारांना सरकारने आजपर्यंत कोणतीही मदत केलेली नाही. आम्हाला मदत तरी करावी आठवा आम्हाला कार्यक्रम तरी करू द्यावे". अशी विनंती ते करतात.
सलग दोन वर्षे राज्यात निर्बंध होते. यामुळे सन समारंभ, लग्न तसेच इतर कार्यक्रमांवर मर्यादा होती. या कार्यक्रमांवर अवलंबून असलेला एक मोठा वर्ग यामुळे बेरोजगार झाला. बँड, सूर सनई, शिंग वादक, हलगी वादक, वाघ्या मुरळी या कार्यक्रमातील चौंडके वादक, ढोलकी तबला वादक यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. बँड पथकातील कलाकारांवर तर उपासमारीची वेळ आली होती. या आर्थिक धक्क्यातून हे कलाकार अजूनही सावरलेले नाहीत. अजूनही कार्यक्रमांना लोकांची मर्यादा असल्याने त्यांचे कार्यक्रम सुरळीत सुरु झालेले नाहीत. याबाबत किलाट वादक असलेले बाबासाहेब जाधव सांगतात कि " कार्यक्रमांना दोनशे माणसांची मर्यादा आहे. बँड वाल्याची संख्याच कमीत कमी पंचवीस ते तीस असते. पाहुणेच दोनशे च्या वर होतात. त्यात बँड वाले सांगितल्यास हि संख्या वाढते. या स्थितीत बँड सांगायला लोक धजावत नाहीत. त्यामुळे माझ्यावर बँड ची गाडीच विकायची वेळ आलेली आहे. गाडीचे कर्जाचे हफ्ते फेडणे मला शक्य झाले नाही. हीच अवस्था अनेक बँड वाल्यांची आहे. आम्ही वाद्य वाजवल कि अनेक जन आमची वाहवा करतात. चांगला वाजवतो म्हणतात. पण आमच्या जगण्याचे काय ? आमच्या कुटुंबाचे काय याची कुणाला काळजी नसते". अशी खंत ते व्यक्त करतात.
कोरोनापासून अनेक लोकांनी लग्न समारंभातील बँड तसेच इतर खर्चाला फाटा दिला आहे. त्यामुळे सर्व काही सुरळीत झाल्यानंतर देखील पूर्वीसारखी कामे मिळण्याची शास्वती नाही. त्यामुळे पूर्णवेळ या कामावर कुटुंब चालवणे देखील या कलाकारांना जिकीरीचे ठरणार आहे.
बँड पथकातील गायक वाद्य कलाकार याना मजुरी तसेच इतर कष्टांच्या कामाची सवय नसते. त्यांना कष्टाचे काम होत नाही. त्यामुळे त्यांना सहसा मजुरीला देखील कुणी सांगत नाही. त्यांच्या या कलेच्याच जीवावर त्यांचे कुटुंब अवलंबून असल्याने कुटुंबाचे चक्र थांबले आहे. आयुष्यभर आपल्या कलेच्या माध्यामातून लोकांचे आयुष्य सुकर करणारा कलाकार आज संकटात आहे.
बँड पथकात अनेक महागडी वाद्ये असतात. त्यांच्यासोबत साहित्याची गाडी असते. पंचवीस ते तीस लोकांचा ताफा असतो. बँड पथक टिकवायचे असेल तर कलाकारांना आगाऊ पैसे द्यावे लागतात. अनेक बँड पथक मालकांनी पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्जे काढून बँड पथकासाठी पैसे लावलेले आहेत. अनेकांच्या फायनान्स च्या गाड्या आहेत. त्यांचे हफ्ते आहेत. उत्पन्न थांबले परंतु कर्जाचे हफ्ते सुरूच होते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कर्जाचे हफ्ते थटलेले आहेत. बँकांचा पतसंस्थांचा खासगी सावकारांचा तगादा बँड पथकांच्या मालकाकडे लागलेला आहे. त्यामुळे अनेकजणांनी वाहने तसेच साहित्य विकून हा धंदाच बंद केला आहे. स्वयंपूर्ण जीवन जगणारा सरकारवर बेरोजगारीचे ओझे न झालेला हा कलाकारांचा वर्ग आज बेरोजगार झालेला आहे. सरकारने मात्र अद्यापही या कलाकारांना अर्थसहाय्य केलेले नाही. सरकारने या कलाकारांना पुन्हा उभा राहण्यासाठी मदत करावी अशी यांना आशा आहे.
याबाबत या कलाकारांच्या प्रश्नावर काम करणारे प्रा दत्ता हेगडे सांगतात " सलग दोन वर्षे या कलाकारांचे सीजन वाया गेलेले आहेत. या काळात त्यांना कोणतेही काम मिळालेले नाही. त्यामुळे अनेक कलाकारांची उपासमार झालेली आहे. यातील वृद्ध कलाकारांची अवस्था अतिशय बिकट आहे. अनेक कलाकारांना त्यांचे साहित्य गाड्या विकण्याची वेळ आलेली आहे. मजुरी करण्याची वेळ आलेली आहे. या परिस्थितीत त्यांना सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. या काळात त्यांना मदत केली गेली नाही तर एक मोठा वर्ग बेरोजगार होण्याची भीती असून या पारंपारिक वाद्य कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
कोरोनामुळे अनेक छोट्या उद्योग धंद्यांवर परिणाम झालेला आहे. याचे दूरगामी परिणाम येत्या काही वर्षात राहणार आहेत. यासाठी या पारंपारिक कलाकारांच्यासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या योजना आणणे गरजेचे आहे. अन्यथा लोकांचे मंगल प्रसंग साजरे करणाऱ्या कलाकारांचे आयुष्य उध्वस्थ होईल.