GroundReport : कोरोना योद्धा आशा सेविका वाऱ्यावर, सुरक्षेविनाच करताय काम
राज्याच्या ग्रामीण भागात आशा सेविका आरोग्यदूत म्हणून कोरोना काळातही आपले कर्तव्य पार पाडत आहेत. पण त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय हे दाखवणारा आमचे प्रतिनिधी कराडचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;
राज्यात कोरोनामुऴे आरोग्य व्यवस्थेच्या दूरवस्थेचे चित्र समोर आलेले आहे. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो....सर्वत्र कोरोनाने आव्हान उभे केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाच्या आरोग्यदूत म्हणून आशा सेविका राज्यभरातील प्रत्येक गावात फिरुन लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. पण या आरोग्य सेविकांनाच सरकारने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
आज अनेक आशा सेविका तुटपुंजा मानधनामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. आशा सेविकांची प्रत्येक गावात नेमणूक करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचा आशा सेविका गावातील आरोग्य विषयक प्रत्येक गोष्टीची नोंद घेत ती माहिती आरोग्य खात्याला पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे करत असतात. कोरोनाच्या काळात इतर यंत्रणांप्रमाणेच त्यांच्यावरही कामाचा ताण वाढला आहे.
गावात एखादा पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्याला उपचार मिळत आहेत की नाही, बेड न मिळाल्यास त्याला घरीच विलगीकरणात ठेवण्यात येते. या बाधित पेशंटची देखभाल करत असताना त्याच्या संपर्कात गावातील कोणकोण आले आहे, याची तपासणी कऱण्याची प्राथमिक जबाबदारीसुद्धा आशा सेविकांची असते.
आशा सेविकांचे काम नर्सप्रमाणे
आशा सेविकांच्या दररोजच्या कामात पेशंटची नियमित वैद्यकीय तपासणी जसे बीपी, शुगर, ताप मोजण्याचे काम आशा सेविका नित्य नियमाने करतात. मात्र ही सर्व कामे करत असताना आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. एखाद्या पेशंटला तपासताना पीपीई किट किंवा, हॅन्डग्लोव्ह्ज, हँडवॉश, मास्क आशा कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत अशी तक्रार आशा सेविका करत आहेत. कोरोना पेशंटच्या संपर्कातील लोक जेव्हा कोविड चाचणीला नकार देतात तेव्हा त्यांची समजूत घालणे, वेळप्रसंगी त्यांच्या रागाला सामोरे जाणे असे अऩुभवही त्यांना येतात.
यासंदर्भात आम्ही पाटण तालुकत्याचे वैद्यकीय अधिकारी आर.बी. पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा आशा सेविकांकडे रुग्णांच्या तपासणीचे काम नाही, फक्ट कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि एखाद्याला ताप वाटला तर गनने ताप तपासण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांना पीपीई किटची गरज नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. पण कंटेन्मेंट झोनमध्ये फिरताना या आशा सेविकांना लागण होण्याची भीती असतानाही त्याबाबत शासकीय पातळीवर काहीही होत नसल्याचे यातून दिसते आहे. त्यामुळे या आशा सेविकांना सरकार आधार देणार का, त्या करत असलेल्या कामाचा सन्मान होणार का असाच प्रश्न त्यांच्या मनात आहे.