वाढते हवा प्रदूषण, ऐन कोरोना संकटात नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाढते प्रदुषण ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. पण या प्रदुषणाला केवळ मोठे प्रकल्प, उद्योग जबाबदार आहेत का, घराघरातूनही हवा प्रदूषण होते का आणि त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो याची माहिती देणारा लेख नक्की वाचा...;

Update: 2021-04-10 10:16 GMT

कोरोना संकटाने सध्या आऱोग्याबाबत आपल्याला नव्याने विचार करण्यास भाग पाडले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि जग काही काळ थांबले. त्यामुळे गेल्यावर्षी प्रदुषणात घट झाली. पण पुन्हा सर्व काही सुरळीत होताच वायू प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. हेच वायुप्रदुषण अनेक आजारांना निमंत्रण देणारे ठरते आहे. यामुळे लहान मुलांना, वृद्ध लोकांना जास्त त्रास होण्याची देखील भीती असते. वायू प्रदुषण हे फुफ्फुसांवर परिणाम करत असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात हवा प्रदूषणाने दरवर्षी जवळपास ७० लाख लोक मरण पावतात. तर महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 1 लाख 80 हजार लोकांचा प्रदूषित हवेमुळे दरवर्ष मृत्यू होतो, असे लॅन्सेट हेअल्थ जर्नलचा रिपोर्ट सांगतो. त्यातच कोरोनाचे संकट महाराष्ट्रभरात गंभीर झाले आहे. कोरोना हा श्वसनाचा आजार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशातच हवेची गुणवत्ता गाठू न शकणारी सर्वाधिक १९ शहरे महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्रातील नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. याच धर्तीवर हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम काय असतात आणि त्यावर उपाय काय यावर तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली. प्रदूषित हवेमुळे लहान मुलांच्या मेंदूच्या विकासावर काय परिणाम होतो, त्यामुळे लहान मुलांना काय त्रास होतो, कोविड महामारीनंतर हवा प्रदूषण हेच जगापुढील सगळ्यात मोठे संकट असणार आहे का याबाबत आम्ही तज्ज्ञांची मते जाणून घेतली.

व्यक्तिगत पातळीवर हवा प्रदूषण रोखता येते का?

पल्मोकेअर रिसर्च अँड एज्युकेशन, पुणे चे डायरेक्टर डॉ. संदीप साळवी यांच्या मतानुसार, "प्रदूषित हवा ही केवळ घराबाहेरील वातावरणातच असते आणि हवा प्रदूषणाचे स्त्रोतही घराबाहेरच असतात, असा बहुतांश लोकांचा समज असतो. मात्र, असे समजणे चूक आहे कारण घरात आपण डासांना घालवण्यासाठी एक कॉईल जाळतो, त्यातून निघणाऱ्या धुराचे हे प्रमाण जवळपास १०० सिगारेट्स ओढल्यावर जेवढे घातक प्रदूषण आपल्या शरीरात जाते तेवढे असते. आपण घरात जाळणारी एक धूप अगरबत्ती ही ५०० सिगारेट्स एव्हडे घातक प्रदूषण आपल्यासाठी घरात तयार करते. आजही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जातो. त्यात जाळले जाणारे घटक आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण हे सीओपीडीचे मुख्य कारण ठरताना दिसत आहे. केवळ औद्योगिक क्षेत्रातून, वाहनांतून हवा प्रदूषण होत आहे, असे समजणे चूक ठरेल. आपणही या प्रदूषणात व्यक्तिगतरित्या भर घालतो हे प्रत्येकाने मान्य करायला हवे."



कोरोनानंतरचे संकट हवा प्रदुपषणाचे?

लीड इंटर्वेंशनल आणि पल्मोनोलॉजिस्ट, क्रीम्स रुग्णालय, नागपूरचे डॉ. समीर अर्बट यांच्यानुसार, "हवा प्रदूषण हे फुफ्फुसासंबंधी आजार होण्यामध्ये आणि ते वाढण्यामध्ये महत्वाचे कारण आहे. हवा प्रदूषण हे फुफुसांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आघात करते. त्यामुळे आपल्याला श्वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. पुढे ते म्हणतात की, आज कोरोना महामारीने संपूर्ण जग वेठीस धरले आहे. हवा प्रदूषण आणि कोरोना याचा थेट संबंध अजून स्पष्ट झाला नसला तरी, येणाऱ्या काळात कोरोनानंतर सर्वात मोठी महामारी हवा प्रदूषणाच्या रूपाने येईल याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे हवा प्रदूषणाच्या धोक्याला वेळीच आळा घालणे महत्वाचे आहे."

लहान मुलांना वायु प्रदुषणाचा धोका

नानावती सुपर स्पेशालिटी रुग्णालय, मुंबईच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अदिती शहा यांच्या मते, " सहा महिन्यापर्यंत नवजात बालकांमध्ये फुफुसांचा पूर्णतः विकास झालेला नसतो. अशा काळात लहान मुलं प्रदूषित हवेच्या संपर्कात आले तर त्यामुळे कायम स्वरूपाच्या फुफुसासंबंधी आजारांना मुलांना सामोरे जावे लागू शकते. गेल्या १० वर्षांत लहान मुलांमध्ये अशा प्रकारच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्दी, पडसे आणि खोकला यांचे प्रमाण नेहमी लहान मुलांमध्ये आढळून येत असते. पालक मुलांना आमच्याकडे घेऊन येतात. आम्ही त्यावर काही औषधे लिहूनही देतो. मात्र याचे वाढते प्रमाण पाहता आता प्रिस्क्रिप्शनवर शुद्ध हवा असे लिहून देण्याची वेळ आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. डॉ. शहा पुढे म्हणाल्या की प्रदूषित हवेमुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्याच्या प्रक्रीयेमध्ये बाधा येते. परिणामी एखादी गोष्ट अधिक काळ लक्षात न राहणे, विसर पडणे अशा समस्यांना देखील मुलांना सामोरे जावे लागते आहे.

के.इ.एम. रुग्णालय, मुंबईच्या डॉ. अमिता आठवले यांनी सांगितले की, "मुले, महिला, आणि वयोवृद्ध लोक सर्वाधिक वेळ घरात राहतात. त्यामुळे घरातील प्रदूषण हा आरोग्याला धोका निर्माण करणारे मुख्य कारण ठरत असल्याचे सांगितले. तसेच आपण मोठमोठ्या उद्योगधंद्यांसाठी नियमावली बनवू शकतो. मात्र लहान उद्योगांसाठी ते करता येत नाही. आणि छोट्या छोट्या उद्योगांमधून मोठे प्रदूषण तयार होते. तसेच घरातील प्रदूषण छोटेखानी असल्याने त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, हे येणाऱ्या काळात घातक ठरू शकते" असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.



 


वायू प्रदूषणामुळे २०१७ ते २०१९ या दोन वर्षात एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्यै उत्तर प्रदेशा खालोखाल महाराष्ट्र या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या मानकांनुसार ही मानके पूर्ण करू न शकणारी व २०२४ पर्यंत २०-३० टक्के प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट ठरवलेली एकोणीस शहरे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील वायू प्रदूषणात वाहने आणि उद्योग क्षेत्र (औष्णिक उर्जा प्रकल्पांसह), बांधकाम क्षेत्र आणि घन इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा आहे तसाच राहत्या घरातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचाही काही प्रमाणात वाटा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आरोग्य विषयक समस्यांना लक्षात घेता सावधानता बाळगणे आणि त्याबरोबरच स्वच्छ हवेचे धेय्य गाठणे महत्वाचे आहे. तसेच विज्ञान विकसित झाल्यामुळे जरी यावर तत्काळ काही औषधे निर्माण केली जाणार असली तरी यावर शेवटचा उपाय हा शुद्ध हवा असू शकतो हे देखील ध्यानात ठेवले पाहिजे.वाढते हवा प्रदूषण, ऐन कोरोना संकटात नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tags:    

Similar News