#गावगाड्याचे विलेक्शन : कोकणातील 'राळेगणसिद्धी'
सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार तापतोय. या निवडणुकांची बित्तंबातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास कसा होऊ शकतो हेसुद्धा दाखवणार आहोत. आमचे प्रतिनिधी कौस्तुभ खातू यांचा कोकणातील राळेगणसिद्धी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावाचा ग्राऊंड रिपोर्ट.....
अण्णा हजारेंमुळे राळेगणसिद्धीचे नाव सर्वत्र पोहोचले. आदर्श गाव कसे असावे, ग्रामपंचायतीने उत्तम काम केले तर गावाचा कसा कायापालाट होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून राणेगणसिद्धीकडे पाहिले जाते. आज आम्ही तुम्हाला ओळख करून देणार आहोत ती कोकणातील राळेगणसिद्धी अशी ओळख असलेल्या कळवंडे गावची.
हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात आहे. या गावातील प्रत्येकाकडे एक मालगाडी, एक कार, एक टुविलर अशा तीन गाड्या दारात उभ्या दिसतील आणि हे सर्व त्यांनी निव्वळ पालेभाज्या व बागायती शेतीतून कमावले आहे. विशेष म्हणजे गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कोणत्याही बँकेकडून कर्ज घ्यावे लागत नाही. कारण गावात शेतकरी विकास सोसायटी सुरू करण्यात आली आहे. या सोसायटीत गावकरी शेतीसाठी कर्ज घेतात. एखाद्या फळाची चोरी केल्यास त्याला दोन हजार रुपये दंड आहे व चोरी करताना पकडणाऱ्या ला यातील 20 टक्के रक्कम ही बक्षीस म्हणून दिली जाते. गावची आणखी एक खासियत म्हणजे मागील 65 वर्ष या गावची ग्रामपंचायत बिनविरोध होत आहे.
गमतीशीर गोष्ट म्हणजे गावातील महिलांना राजकारण, भांडण-तंटे याबाबत विचारलं असता "आम्हाला शेतीतून वेळच मिळत नाही, मग भांडण कधी करणार" अशी उत्तर या महिला देतात. या गावची खासियत असली तरी गावातील महिला बचतगट हे फक्त नावापुरतेच आहेत अशी खंत देखील गावातील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.