कोरोना संकटात शाळा सुरू करणारे पहिले गाव, ग्रामसभेच्या निर्णयाने शाळा सुरू

राज्यात कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. पण एका गावाने 5 ते 10 ची शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.;

Update: 2021-06-20 03:50 GMT

अहमदनगर – कोरोनाच्या संकटाने संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्था ठप्प झाली. त्यानंतर ऑनलाईऩ शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. पण तरीही विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षणाची सर याला नाही, असे वाटते आहे. त्यामुळे शाळा प्रत्यक्ष कधी सुरू होतील याची प्रतिक्षा सगळेच पालक, शिक्षक आणि विद्यार्थी करत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने आणि लहान मुलांची लस अजूनही प्रत्यक्ष वापरात आलेली नसल्याने शाळा तूर्तास तरी सुरू होण्याची शक्यता दिसत नाही.

एकीकडे हे चित्र असले तरी राज्यात या संकट काळात एका गावाने पुढाकार घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. राज्यात सध्या प्रत्यक्षात एकही शाळा सुरू नसली तरी हिवरेबाजार या गावात शाळा सुरू झाली आहे. सध्या गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने आदर्शगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिवरेबाजार गावाने आणखी एक नवीन प्रयोग केला आहे. या गावात प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यात आली आहे. पाचवी ते दहावीचे वर्ग इथे सुरू करण्यात आले आहेत.


राज्य आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरू करण्याची मागणी या गावातील सर्व पालकांनी एकमुखाने केली होती. पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करता येतील का, असा प्रश्न उभा राहिला तेव्हा जिल्हा शालेय शिक्षण विभागाला विचारणा करण्यात आली होती. मात्र त्याला शालेय शिक्षण विभागाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. राज्यात अद्याप शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय़ घेतलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची पंचाईत झाली होती. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत हिवरेबाजारने ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतला. याच ग्रामसभेत पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आणि राज्यातील पहिली शाळा प्रत्यक्षात सुरू झाली.

शाळा सुरू झाली असली तरी कोरोना संसर्गाची भीती असल्याने इथे विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावासाठी काही वेगळे नियम करण्यात आले आहेत. हे नियम काय आहेत ते पाहूया...

हिवरेबाजार शाळेसाठी पाळणार हे नियम

1. विद्यार्थ्यांची तपासणी - शाळेच्या प्रवेशद्वारावरच प्रत्येक मुलाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला ताप असेल किंवा आजारी असेल तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक तसेच शाळेशी संबंधित सगळ्यांना मास्कचा वापर आवश्यक आहे.

प्रत्येकाला शाळेत आल्यानंतर हात सॅनिटराईज करावे लागणार आहेत.

सोशल डिस्टन्सिंगचे नियमसुद्धा इथे ठरवण्यात आले आहेत. प्रत्येक बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे शाळेत येताना विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.

शाळा सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यास बंदी आहे.

विद्यार्थ्यांनी शाळेत येताना आणि शाळेतून घरी जाताना रस्त्यात कुठेही थांबायचे नाही, थेट घरी जायचे, असा नियम करण्यात आला आहे.

शाळा सकाळी फक्त दोन म्हणजेज आठ ते दहा या वेळात भरणार आहे.

मुलांची सर्व जबाबदारी गाव उचलणार

राज्यात कुठेही शाळा सुरू करण्यास सरकारने अद्याप कोरोनाच्या भीतीने परवानगी दिलेली नाही. मात्र हिवरेबाजारने ही एक प्रकारे हा धोका स्वीकारला आहे. सध्या गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मार्च 2020 पासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे गावाने एकत्र येत हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली आहे.

पण कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. त्यामुळे सुरक्षेचे सर्व नियम पाळूनही एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली तर काय हा प्रश्न आहेच. पण संभाव्य संकटाचा विचारही गावाने केला आहे. कोणत्याही मुलाला काही त्रास झाल्यास त्याच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी पूर्ण गावाने घेतली आहे. सध्या पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. येत्या सोमवार (21 जून) पासून पहिली ते चौथीचे वर्गही सुरू करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.




 


गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट गंभीर होत गेले. पंतप्रधान मोदींनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा, कॉलेज बंद झाले. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सरकारने सर्व उपक्रम हळूहळू सुरू केले. पण विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न असल्याने पालकांनीही आपल्या मुलांना शाळेत कसे पाठवायचे असा सवाल उपस्थित केला. सरकारने शाळा सुरू करण्ची परवानगी दिल्यानंतर जिथे रुग्ण नाहीत त्या ग्रामीण भागातील बहुतांश शाळा सुरू झाल्या होत्या. पण त्यानंतर कोरोनाची महाभयंकर ठरलेली दुसरी लाट आली आणि शाळा अनिश्चित काळासाठी बंद झाल्या. प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने काही शाळा सुरू झाल्या. पण ऑनलाइन शिक्षणाच्या बाबतीच सर्वाधिक अडचणी या ग्रामीण भागात आणि गरिब वर्गात दिसून आल्या. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा अभाव, अनेक पालक गरीब असल्याने त्यांना आपल्या मुलांसाठी स्मार्टफोन शक्य नव्हते. त्यामुळे अनेक मुलं ही शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर राहिली.

हिवरेबाजारच्या गावकऱ्यांनी हा निर्णय घेऊन धाडसी पाऊल टाकले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजून आहेच आणि यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पण राज्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये एकही रुग्ण नाहीये. त्यामुळे त्या गावांनी हिवरेबाजार प्रमाणे खबरदारीच्या सर्व उपाययोजना करुन शाळा सुरू करता येतील का, याचा विचार करता येऊ शकतो. पण राज्य सरकार शाळा सुरू करण्यास परवानगी देणार का हा प्रश्न कायम आहे. आता हिवरेबाजारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत हा निर्णय घेतला आहे. येत्या काळात इतरही वर्ग ते सुरू करणार आहेत. त्यामुळे कोरोना संकटात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत ग्रामसभेने एक वेगळा इतिहास निर्माण केला आहे.

Full View
Tags:    

Similar News