Ground Report : मुंबईतला हिमालय कधी उभा राहणार?
सरकारी काम आणि जरा थांब ही म्हण आपण जणू गृहीत धरली आहे आणि त्यामुळेच प्रशासन देखील आपल्याला गृहीत धरू लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून थेट टाइम्स ग्रुपला जोडणाऱ्या हिमालय पादचारी पुलाचं बांधकाम गेल्या चार वर्षांपासून सुरूच आहे. याच्या बांधकामाला सुरूवात होण्यासाठी २०१९ मध्ये झालेला अपघात कारणीभुत होता. नेमका हा पुल बांधण्यासाठी इतका वेळ का लागतोय हे जाणून घेणारा हा स्पेशल रिपोर्ट!;
सरकारी काम आणि जरा थांब ही म्हण आपण जणू गृहीत धरली आहे आणि त्यामुळेच प्रशासन देखील आपल्याला गृहीत धरू लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून थेट टाइम्स ग्रुपला जोडणाऱ्या हिमालय पादचारी पुलाचं बांधकाम गेल्या चार वर्षांपासून सुरूच आहे. साधारणतः एक पादचारी पुल तयार व्हायला एक वर्ष पुरे झालं पण हा पुल अजुन पर्यंत अर्धवट स्थितीत आहे. या प्रकरणाचं गांभीर्य जाणूल घेण्यासाठी चार वर्षे मागे जावे लागेल.
दिनांक 14 मार्च 2019 च्या संध्याकाळी साडे सात च्या सुमारास अचानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि द टाइम्स ऑफ इंडिया वृत्तसमुहाच्या इमारतींना जोडणारा पादचारी पूल कोसळला. सगळीकडे एकच धावपळ सुरू झाली. रस्त्यावर पुलाचे अवशेष पडले होते आणि त्यात अनेक जण जखमी झाले होते. कालांतराने या दुर्घटनेत 6 मृत्यू तर 31 जण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश होता. योगायोगाने दोघीही नजिकच्याच रूग्णालयात नर्स होत्या आणि आपल्या रात्रपाळीसाठी त्या जात होत्या. अनेक प्रश्न या घटनेनंतर उभे राहिले. मुंबई महापालिका दरवर्षी आपल्या पुलांची तपासणी करते. मग या पुलाची तपासणी केली नव्हती का? असे अनेक प्रश्न उभे राहिले. तत्कालीन मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातलं होतं. यानंतर संबंधित मनपा अधिकाऱ्यावर कारवाई देखील झाली. पण हा पादचारी पुल पुन्हा तयार होणं गरजेचं होतं. पुलाअभावी लोकांना संपुर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला वळसा घालून यावं लागतं. या पुलाचं काम सुरू झालं खर पणं ते पूर्ण व्हायचं नावच घेत नाहीये. गेल्या चार वर्षात फक्त या पुलाचे चार खांब उभे राहू शकले आहेत.
परिणामी रेल्वे प्रवाशांना भलमोठं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक पायदळी तुडवाव लागतंय. शिवाय भरधाव वेगाने गाड्या धावणाऱा रस्ता ओलांडावा लागतोय. याबद्दल आम्ही प्रवाशांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या तेव्हा बळीराम मोरे य़ा प्रवाशाने इथे पुलाअभावी रस्ता ओलांडताना गेल्या चार वर्षात अनेक मोठे अपघात झाले आहेत. हा पुल पडला तेव्हा मी स्वतः साक्षीदार होतो. हा पुल कधीच बनुन तयार व्हायला हवा होता पण प्रशासनाची तशी इच्छा दिसत नाही अशी प्रतिक्रीया दिली.
या संदर्भात आम्ही महापालिकेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
त्यांना १) 2019 मध्ये अपघात झालेल्या हिमालय पादचारी पुलाचे बांधकाम कधी सुरू करण्यात आले?
२) ते पूर्ण होण्यास आणखी किती कालावधी लागणार आहे?
३) साधारण एक पादचारी पुल बांधून पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी पुरेसा असतो. मग चार वर्ष पूर्ण होत आली असताना हिमालय पादचारी पुलाचे बांधकाम पूर्णत्वास जाण्यास इतका विलंब का लागतोय? असे प्रश्न विचारले पण त्यांनी अजून उत्तर दिलेले नाही. संबंधित अधिकाऱ्यांचं उत्तर आलं की कळवू अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.
एखादं काम तडीस न्यायचं असत पण ते वेळेत हे आपली मुंबई महापालिका विसरली आहे असं दिसतय. नाही तर एक महत्वाचा पादचारी पुल चार चार वर्ष अर्धवट रखडला नसता. मुंबई महारपालिकेची प्रतिक्रीया आली की ती या बातमीत अपडेट करण्यात येईल.