इथं मरणानंतर ही मरण यातना संपेनात
देश महासत्तेकडे वाटचाल करतोय, स्मार्ट सिटीची स्वप्न ही रंगवली जातायेत, शहरात मशीनच्या वापराने एका बटनावर प्रेताची व्हिलेवाट लावली जाते, मात्र गावखेड्यात मुख्य गावाला स्मशानभूमी असते, तर अनेक आदिवासी वाड्याना स्मशानभूमीच नसते ही तफावत आजही विषमतावादी मानसिकता दाखवून देणारी दिसते, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नावंदे आदिवासीपाड्याच्या विदारक परीस्थितीचा धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट....
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नावंढे आदिवासीवासींवाडीला प्राथमिक सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामस्तांनी अनेकदा लोकप्रतिनिधी व प्रशासनदरबारी आपली लेखी निवेदने दिली आहेत, कैफियत मांडली आहे.मात्र कुणालाही येथील ग्रामस्थांच्या वेदनेची जाणीव होत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगीतले. वर्षानुवर्षे येथील ग्रामस्त मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील आदिवासीवाडी नावंढे ग्रामपंचायत हद्दीत येते. ग्रामपंचायत दिवसेंदिवस विविध विकास कामे करत असतांना आदिवासी वाडी येथे स्मशानभूमी व मूलभूत सोयीसुविधा नसणे ही बाब अतिशय खेदजनक आहे. असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
येथील वैशिष्ट्ये म्हणजे येथील ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकात आदिवासी वाडीला स्मशानभूमी देणारच असा अजेंडा घेऊन आश्वासनांची खैरात होते, मात्र या मुद्द्यावर मते घेऊन आम्हाला केवळ आश्वासनाचे गाजर दाखवले जाते,असा संताप येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला. आता ग्रामस्थांनी एक निर्धार केलाय, यापुढे आदिवासी वाडीतील कुणीही मयत झाला तर त्या प्रेताचा अंत्यविधी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात करणार असा इशारा संतप्त आदिवासींनी प्रशासनाला दिलाय. स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून गेली तरीही ग्रामस्थ स्मशानभूमी पासून वंचित आहेत. स्मशानभूमी अभावी मृतदेहांची विटंबना होणे, अंत्यसंस्कारासाठी भटकावे लागणे ही बाब अतिशय संतापजनक आहे. शासनाने त्वरित येथे स्मशानभूमी बांधावी. तसेच अन्य मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आदिवासी बांधवानी केलीय.
नावंढे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिवासीवाडीची लोकसंख्या साधारणात 1000 च्या आसपास आहे. 200 घरांचा येथे उंबरठा आहे. येथे स्मशानभूमी नसल्याने येथील अंत्यविधीसाठी वणवण भटकावे लागत आहे. येथील एखादी व्यक्ती मरण पावली तर गावापासून काही अंतरावर मिळेल त्या जागेत मोठंमोठी दगडे रचून त्याच्यावर अंत्यसंस्कार करावा लागतो. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार कुठे आणि कसे करावे हा प्रश्न पडतो. भर पावसात मृदेहांवर अंतविधी (अंत्यसंस्कार) करावा लागतो. गावापासून दिड दोन किलोमीटर खडकाळ व काटेरी मार्गावरून पायी चालत मार्ग काढत जाऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ या ग्रामस्थांवर येते,
अशा वेळी लाकडे व जागा ओली असल्याने अनेकदा मृतदेह अर्धवट जळतात. डोळ्यात अश्रूंचा पूर, वरून धुवाधार पाऊस, रचलेले सरण व वरून कापड पकडून प्रेताला अग्नी द्यावा लागतो, अनेकदा मृतदेह दगडावरून खाली पडतो, मृतदेहांची अक्षरशः विटंबना होते. हक्काची स्मशानभूमी नसल्याने अशा भयानक परिस्थितीत अंत्यविधी करावा लागत असल्याने ग्रामस्थ प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.
ग्रामस्थांनी याबाबत वारंवार शासनाकडे मागणी करून आवाज उठविला असूनही हा विषय अजूनही निकाली निघालेला नाही. येथील एका वृद्ध महिलेने कैफियत मांडताना सांगितले की माझे काळ्या चे पांढरे केस झाले, मरणाच्या दारात आले, पण पिढ्या न पिढ्या गेल्या पण स्मशानभूमी कुणी केली नाही, पावसाळ्यात चिखलात खड्डा करून प्रेत गाडावे लागतेय, दगडावर सरण रचून अग्नी द्यावा लागतोय, प्रेत जळता जळत नाहीत, कापड पकडून अंत्यसंस्कार करावा लागतोय, सर्व गावांना किती काय काय मिळतंय, आमाला काय मिळत नाय, मत फुकट घेतात, पण काही सोयी देत नाही असा संताप येथील वृद्ध महिलेने व्यक्त केला. आम्हाला हक्काची स्मशानभूमी केव्हा मिळणार असा सवाल येथील तरुण, महिला व ज्येष्ठ वृद्ध ग्रामस्थांनी उपस्थीत केला आहे.
येथील आदिवासी वाडीला स्मशानभूमी मिळावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ठराव पास करून कागदी घोडे नाचवले आहेत, पंचायत समिती , वनविभाग, तहसीलदार यांच्याकडे कागदपत्रे गेली आहेत, मात्र त्यासाठी आवश्यक असलेला नित्याचा पाठपुरावा होत नसल्याने स्मशानभूमी चा प्रश्न जैसे थे राहिला आहे.
अशिक्षित व गोरगरीब आदिवासींची वनविभाग व प्रशासन दरबारी खेपा मारून चपला झिजत आहेत, अनेक पावसाळे गेले, आदिवासी वाडीत अनेकजण मयत देखील झाले, पण त्यांना जलीत करण्याची प्रक्रिया ही अंगावर शहारे आणणारीच आहे, ग्रामपंचायतीने सुचविलेल्या वनविभागाच्या जागेत आदिवासींना स्मशानभूमी मिळणे मोठे आव्हानात्मक झाले आहे. ग्रामपंचायतीने वनविभागाच्या अखत्यारीत जागा सोडून इतरत्र जागा उपलब्ध करून दिल्यास आदिवासींच्या स्मशानभूमी चा मार्ग सुकर होणार आहे.