आरोग्याच्या समस्यांनी होरपळणारा ‘अर्धा कोयता’ : प्रवीण खुंटे

एकूण ऊसतोड (sugarcane) कामगारांमध्ये अर्ध्या संख्येने महिला (Women) आहेत. नवरा-बायको (couple) ऊसतोडीच्या कामासाठी एकत्र जातात. त्यांच्या जोडीला कोयता असे म्हणतात. तसेच, अनेक एकट्या स्त्रिया अर्धा कोयता म्हणून काम करतात. ऊसतोड करणाऱ्या महिला मजुरांचे प्रश्न वेगळे, गंभीर आणि गुंतागुंतीचे आहेत अर्ध्या कोयत्याच्या धगधगत्या आरोग्याच्या (health) प्रश्न ऐरणीवर आणणारा NFI Fellow प्रवीण खुंटेंचा रिपोर्ताज....

Update: 2023-04-01 10:00 GMT

महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास ५० लाख मजूर विविध स्वरुपाच्या कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. (संदर्भ, दारिद्र्याची शोधयात्रा पान क्र. २१, लेखक हेरंब कुलकर्णी) यामध्ये सर्वाधिक ऊसतोड मजूरांची संख्या असून ती १० ते १२ लाख इतकी असून त्यामध्ये महिला मजूरांचे प्रमाण पन्नास टक्के असते. यासोबतच विटभट्टी, दगडाच्या खाणी, शेतमजूरी, कन्ट्रक्शन आदी स्वरुपाचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. स्थलांतराच्या काळात या मजूरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु, त्याची आवश्यक तेवढी दखल मध्यमे, प्रशासन, सरकार, लोकप्रतिनिधी यांच्याकडून घेतली जात नाही. \

स्थलांतरीत मजूर हा सखोल अभ्यासाचा विषय आहे. यातीलच एक महत्त्वाचा पैलू असलेल्या ऊसतोड मजूर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या लेखात चर्चा करण्यात आली आहे. सन २०१८ पासून ऊसतोड मजुरांचे जीवन, आर्थिक परिस्थिती, मुलांचे शिक्षण, कौटुंबिक अडचणी या विषयांवर तीन व्हिडीओ रिपोर्ताज केले आहेत. याकाळात मजुर महिलांशी बोलताना त्यांच्या आरोग्याचा प्रश्नावर देखील काम करण्याची आवश्यकता वाटली होती. त्याचाच एक भाग म्हणून हा लेखन प्रपंच.




 


वयाच्या पस्तीशीत आजी होणे

ऐन तारूण्यात महिला या आई नाहीतर आज्जी होतात. ऐकायला थोड विचित्र वाटत असले तरी हे सत्य आहे. पंधरा, सोळाव्या वर्षी लग्न, वर्षभरात मुलं, महिलेची २० ते २२ वर्षांपर्यंत दोन-तीन मुलं होऊन फॅमिली पुर्ण. आई तीशीत येईपर्यंत मुलगी चौदा पंधरा वर्षांची होते. तिचे सोळा-सतराव्या वर्षीच लग्न, वर्ष - दोन वर्षांत मुलं. ही महिला ३५ ते ३६ वर्षांची किंवा त्याही आधी आज्जी सुद्धा होऊन जाते. या सगळ्यांमुळे अनेक शारिरीक आणि मानसिक त्रासांना त्यांना सामोरे जावे लागते. आणि हि सायकल पिढ्यानपिढ्या सुरु राहते.

आशाबाई शांतीलाल अंकुशवराट, वय ३८, गाव साकत, ता. जामखेड जि. अहमदनगर, त्यांना तीन मुली, एक मुलगा. मोठ्या मुलीचे लग्न झाले असून तिला ६ वर्षांचा मुलगा आहे. दुसऱ्या मुलीने ९ वीत शाळा सोडली, तिसरी ७ वीच्या वर्गात शिकते. उर्वरीत दोन्ही मुलींची पुढील काही वर्षातच लग्न होण्याची शक्यता आहे. आशाबाई या वयाच्या ३२ व्या वर्षीच आजी झाल्या आहेत.




 


बेबीबाई युवराज तवर, वय ४५ वर्ष. मु. पो. शिव तांडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद, संपुर्ण जिवण ऊसाच्या फडातच चालले आहे. पाच मुली एक मुलगा. मोठी मुलगी ३१ वर्षांची आहे. बेबीबाई यांना एकूण सात नातवंडे आहेत. सर्वात मोठा नातू ११ वर्षांचा आहे.

शोभा नामदेव बडे, ता. बीड, जि. बीड, वय ३६ वर्ष. दोन मुली एक मुलगा. मोठ्या मुलीचे लग्न झाले असून तीला दोन वर्षांचा मुलगा आहे. तीचे वय १९ वर्ष आहे. शोभा या लग्नाच्या आधिपासून ऊसतोडणीचे काम करत आहेत.

लेखासाठी विविध वयोगटातील १५ महिलांसोबत बोलल्यानंतर जाणवले की यातील प्रत्येक महिला कुठल्या ना कुठल्या तरी शारीरिक व्याधीने त्रस्त आहे. याची सविस्तर चर्चा पुढे आली आहे. ‘आर्थिक, सामाजिक विवंचनेत जगणाऱ्या ऊसतोड मजूर महिलांचे दाहक वास्तव!’ असे शिर्षक असलेला अहवाल सन २०१९ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ‘महिला किसान अधिकार मंच’च्या (मकाम) वतीने बनविण्यात आलेल्या या अहवालातून थक्क करणारी माहिती समोर आली आहे.

बीड, ऊस्मानाबाद, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, सोलापूर या आठ जिल्ह्यातीतून १०२४ महिलांच्या सर्वेक्षणातून हा अहवाल बनविण्यात आला आहे. या अहवालानुसार २० टक्के मुलींचे लग्न १४ व्या वर्षांपर्यंत, ४९ टक्के मुलींचे १५ ते १७ वर्षांपर्यंत लावून देण्यात येते. (पान क्र. ६). म्हणजे ६९ टक्के मुलींची लग्न १८ वर्षांच्या आतच लावून दिली जातात. वयाच्या १२ व्या - १३ व्या वर्षी देखील मुलींचे लग्न लावून देण्यात आल्याची अनेक उदाहरणे असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. कोरोना साथीच्या काळात बाल विवाहांचे प्रमाण अधिक वाढले असल्याचे दिसते. याचे कारण मुलीच्या लग्नाचा खर्च, नातेवाईकांचा मानपान हे सगळे टाळण्यासाठी कमी वयातच मुलींची लग्न लावून पालकांनी आपली जबाबदारी झटकून टाकली आहे. राज्यातील बीड जिल्ह्यातून सर्वाधिक मजूर ऊसतोडणीसाठी जात असतात.

बीड मधील स्त्रिरोगतज्ञ डॉ. चंद्रकांत तोंडे यांच्याकडे अनेक ऊसतोडणी मजूर महिला उपचारासाठी येत असतात. त्यांच्याशी याविषयी चर्चा केली असता ते म्हणाले “कमी वयात लग्न, लगेच मुल, लवकर मासिक पाळीचे आजार, शरिरातील बदल, गर्भाशय काढणे, त्यामुळे स्थुलपणा येतो. हाडे ठिसूळ होतात, ह्रदयाचा आजार, चिडचीडेपणा वाढणे यामुळे शरीरासोबत मानसिक आजार बळावतो. महिला परावलंबी बनते, निर्णय घेण्याची क्षमता जाते. या सगळ्या त्रासांमुळे मनातून खचलेल्या महिलेच्या आयुर्मानावर त्याचा परिणाम तर होत असतो.” प्रचंड श्रमाचे काम यामुळे रखरखीत त्वचा, रापलेले चेहरे, थकलेले शरीर अशी अवस्था महिलांची असते. त्यामुळेच त्यांचे वय देखील अधिक वाटते. याची अगणित उदाहरणे आपल्याला सापडतात. याचा त्यांच्या आयुर्मान वर परिणाम होत असणार. परंतु, तशा स्वरुपाचे संशोधन झाल्याचे अजूनतरी आढळले नाही. मात्र, अशा स्वरुपाच्या अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे.

कळी फुलण्याआधी कोमेजली जाते.

लग्नानंतरचे संपुर्ण आयुष्य खडतर परिस्थितीत महिलांना जगावे लागते. वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी नैसर्गिकदृष्ट्या शारिरिक आणि मानसिक बदल होत असतात. भवतालची परिस्थिती, सामाजिक भान, भविष्याचा विचार, आकलन, समज विकसीत होणे, शहाणपणा येण्याचा हा काळ असतो. पण याआधीचं तिचे लग्न लावून दिले जाते. काल-परवापर्यंत लहान वाटणारी सोळा-सतरा वर्षांची मुलगी लग्नानंतर एकदम बाई होऊन जाते. घर संसार, कुटुंब, मुलं यांच्या जबाबदारीचे ओझे तीच्यावर टाकले जाते. एक बाई म्हणून कुटुंबाची मान, मर्यादा म्हणून अगणित बंधने तिच्यावर लादली जातात. माणूस म्हणून असलेले तिचे स्वातंत्र्यच हिसकावले जाते. हे सगळे स्विकारण्याची तिची शारिरिक आणि मानसिक तयारीच झालेली नसते. सगळं काही अनपेक्षित आणि जबरदस्तिने तिच्यावर लादण्यात येते. अशा परिस्थितीचे परिणाम या मुलींना आयुष्यभर सहन करावे लागतात.

लग्न लवकर झाल्याने, गर्भधारणा लवकर, गर्भपात, पोटावर ताण, गर्भधारणेच्या दरम्यान आणि प्रसुतीनंतरच्या काळात अधिक श्रमाचं काम करावे लागते. एका गर्भवती किंवा प्रसुती झालेल्या महिला व बाळासाठी आवश्यक असलेले पुरेसे पोषण, विश्रांती त्यांना मिळत नाही. अनेकदा तर ऊसाच्या फडावरच प्रसुती होते. ‘मकाम’ च्या अहवालानुसार ऊसतोडणी मजुर महिलांपैकी ३६ टक्के महिलांचे बाळांतपण राहत्या गावी तर, २२ टक्के महिलांचे बाळांतपण ऊसाच्या फडांमध्ये होते. सर्वेक्षणाच्या काळात मकामला १०६ महिला अशा मिळाल्या ज्या ऊसतोडणीच्या काळात गरोदर होत्या. त्यातील तब्बल ४० महिलांचे बाळंतपण पारंपारिक म्हणजे दाईकडून किंवा अप्रशिक्षित महिलेकडून झाल्याचे समजले. ३७ महिलांची बाळंतपणे सरकारी दवाखान्यात, ८ बाळंतपणे खाजगी रुग्णालयात करण्यात आली होती. (पान क्रं ८) १८ वर्षाखालील गर्भपात होणाऱ्या मुलींची संख्या २१ टक्के एवढी आहे तर एकुण ऊसतोड मजूर महिलांपैकी तब्बल ७६ टक्के महिलांचा एकदा तरी गर्भपात झाला असल्याचे सांगितेल. तर अनेक महिलांनी दोन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा गर्भपात झाल्याचे सांगितले. ही सर्व माहिती अहवालात नमुद करण्यात आली आहे. या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.

मासीक पाळीदरम्यान होणारे शारिरिक त्रास

७५ टक्के महिलांना अंगावरून जास्त जाणे, ६६ टक्के महिलांना खाज येणे, ६४ टक्के महिलांना आग होणे, ५८ महिला वास, दुर्गंधी येणे तर, ४३ टक्के महिलांना सूज येणे असे त्रास होतात. यातील अनेक महिलांना एकाचवेळी यातील अनेक त्रास होत असतात. महिलांशी चर्चा करताना पाळीच्या काळातील त्रासासोबतच पोट दुखण्याची समस्या या महिलांमध्ये सर्रास आढळून येते. सतत पोट दुखणे, मुळव्याध, अशक्तपणा, अंगदुखी, वजन कमी होणे आदी प्रकारच्या शारिरिक त्रासांना त्यांना तोंड द्यावे लागते. अधिक श्रम आणि आवश्यक आहार कमी. शौचालयाची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या किंवा पहाटेच्या अंधारतच शौचालयाला जावे लागते. इतरवेळी शौचालयची व्यवस्थाच नसल्याने, जेवण जात नाही, अपचणाचा त्रास होतो. पालांमध्ये रहात असल्याने आवश्यक तेवढे अन्न शिजवले जात नाही. चवीसाठी तिखट खाल्ले जाते. त्यामुळे मुळव्याधीचा देखील त्रास होत असल्याचा त्या सांगतात. पाण्यासारखी मूलभूत व्यवस्था देखील नसल्याने मासिक पाळीच्या काळात आवश्यक तेवढी स्वच्छता राखायची कशी? ग्रामीण भाग, नवीन ठिकाण त्यामुळे पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन साठी मेडिकल कुठून शोधायचे हा प्रश्न असतोच वरून पॅड वापरणे परवडत नसल्याने कपडाचा उपयोग करावा लागतो. एकच कापड वारंवार धुऊन वापरल्याने त्याच्या संसर्गातून पाळीचे त्रास उद्भवतात. याची जाणीव त्यांनाही असते पण नाईलाज असतो.

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ऍण्ड इकोनॉमीक्स संस्थेतील प्रा. डॉ. डेबाशिश नंदी यांच्या २०१४ च्या संसोधन अहवालात मजूर महिलांच्या आरोग्याविषयी टिपण्णी करण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, बहुसंख्य ऊसतोड मजूर महिला आजारी पडल्यास तात्पुरती औषधे घेतात. अधिक त्रास होत असल्यास डॉक्टर ऍडमिट करून घेतील या भीतीने दावाखान्यातच जातच नाहीत. ऍडमिट झाल्यास दोन - चार दिवसांची मजुरी बुडते. त्यामुळे असे आजारपण त्या अंगावरच काढतात.




 


गर्भाशय काढणे

संगीता सुदाम गरड, वय ३५ वर्ष, तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. सहा वर्षांपूर्वी गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाली असून तेव्हापासून ऊसतोडनीचे काम बंद केले. याविषयी विचारले असता संगीता सांगतात "सारखं पोटात दुखायचं. मेडिकल मधून तात्पुरत्या गोळ्या खायचे. पण नंतर सहनच होतं नसल्याने डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी पिशवी काढायला सांगितली. त्यानंतर बरं वाटलं असं वाटत होतं पण तस झालं नाही. उलट ऑपरेशन झाल्यापासून सारखा अशक्तपणा जाणवतो, कंबर दुखते शरीरात त्राण नसल्यासारखे वाटते. ओझ्याचं कामच होतं नाही. सारखी औषधं खावी लागतात." अशा अनेक संगीता आहेत ज्या या त्रासाचा सामना करत आहेत.

पोट दूखीवर तात्पुरता उपाय म्हणून वेदनानाशक गोळ्या घेतल्या जातात. शेवटी वेदना असाह्य होत असल्याने या महिला गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतात. या संदर्भात बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांमध्ये गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकले जात असल्याचे प्रकरण तीन वर्षांपुर्वी खूप गाजले. अनेक माध्यमांनी हा विषय लावून धरला. खाजगी रुग्णालये नफा कमविण्यासाठी अशा शस्त्रक्रिया करत असल्याचे आरोप देखील तेव्हा करण्यात आले होते. यानंतर सरकार जागे झाले आणि या विषयाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून माहिती मागविण्यात आली. त्यानुसार बीड जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ७१६ गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. सन २०२०-२१ मध्ये ६४१ गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली.

बारामती जवळील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ऊसतोडणीसाठी येणाऱ्या १२०० महिलांचा सर्वे टाटा ट्रस्टच्या वतीने करण्यात आला होता. त्यामध्ये १८८ महिलांचे गर्भाशय काढण्यात आली असल्याची माहिती या प्रोजेक्टचे समन्वयक परेश जयश्री मनोहर यांनी दिली. मागील पाच वर्ष परेश हे टाटा ट्रस्ट च्या माध्यमातूम ऊसतोडणी मुलांच्या शिक्षणावर काम करत होते.

EPW मासिकाच्या च्या २० जुलै २०१९ च्या अंकात अभय शुक्ला आणि सीमा कुलकर्णी यांचा Harvest of Uteruses अशा शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध झाला होता. ऊसतोड मजूर महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाविषयी लिहिण्यात आलेल्या लेखात एकट्या बीड जिल्ह्यात तीन वर्षांत ४६०५ एवढी गर्भाशय शस्त्रक्रिया झाल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सीमा कुलकर्णी या महिला किसान अधिकार मंचच्या (मकाम) राष्ट्रीय समन्वयक सदस्य देखील आहेत. याविषयी सीमा कुलकर्णी याच्याशी चर्चा केली असता, त्यांच्या म्हणण्यानुसार “वयाच्या २० ते ३० वर्षांच्या आतामध्येच गर्भाशय काढणे यासोबतच इतर आजारांमुळे ऊसतोड मजूर महिलांची काम करण्याची क्षमता कमी वयात कमी होते. आई काम करू शकत नसल्याने घरात चौदा, पंधरा वर्षांच्या तरूण मुलींच्या नावावर उचल घेऊन त्यांना ऊसतोडीला पाठवले जाते. या चक्रात मुलीही अडकत जातात.”

गर्भाशय काढल्यानंतर काम होते असा समज ऊसतोड मजूर महिलांमध्ये झालेला आहे. याला पुरक म्हणून श्रमाची कामे करणे सोपे जावे यासाठी गर्भाशाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. वरून यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचेही डॉक्टर सांगतात. परंतु, गर्भपीशवी काढण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर महिला कायमच्या आधू होऊन जातात याची अनेक उदाहरणे आहेत. स्त्रीरोगतज्ञ डॉ. चंद्रकांत तोंडे यांच्यामते “अशा शस्त्रक्रियेनंतर स्थुलपणा वाढणे, हाडे ठिसूळ होणे, मानसिक वाढ खुंटने, चिडचिडपणा वाढतो, परावलंबित्व वाढणे. काम करण्याची क्षमता कमी होऊ सततचे आजारपण सुरु होते.” या गर्भाशय शस्त्रक्रिया केल्यानंतर देखील त्यांचा त्रास कमी होत नसून पुढे आयुष्यभर त्यांना गोळ्या-औषधांवर काढावे लागते. घरातील प्रमुख व्यक्तीचं त्रस्त असल्याने त्याचा संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्यावर परिणाम होते.

 मुलांची शारिरिक वाढ आणि बैद्धिक विकासासाठी आईच्या पोटातील नऊ महिने आणि जन्मानंतरची दोन वर्ष असा सरासरी एक हजार दिवसांचा काळ मुलांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असतो. या काळात झालेल्या जडणघडणीचा परिमाण संपुर्ण आयुष्यावर होत असतो. सन २०१८ पासून ‘भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम’ राबविण्यात येतो. यासंदर्भातील Journey of The 1000 Days Foundation for a Brighter Future या नावाने अहवाल देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये मुलांच्या शारिरीक वाढ व बौद्धीक विकास याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

असे असताना ऊसतोड मजूर महिलांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. पुढील उदाहरणावरून हे समजून घेता येईल.




 


शितल रविंद्र राठोड, वय १६ वर्ष. शितल यांना एक वर्षाचा मुलगा असून सध्या त्या चार महिन्यांच्या गरोदर आहेत. आज रोजी त्या ऊसतोडणीचे काम करत आहेत.

बाळाच्या जन्मानंतर पुढील दोन वर्ष आईचे दूध हे तिच्या बाळासाठी अमृत असते. बाळाच्या वाढीसाठी सर्वाधिक महत्वाचे. पण शीतल या चार महिन्यांच्या गरोदर आहेत. त्यामुळे पोटातील एक बाळ आणि एक वर्षाचे दुसरे बाळ अशा दोन्ही बाळांसाठी आवश्यक तेवढा पोषण आहार, आराम त्यांना मिळत नाही. यातून शीतल या स्वतः कुपोषित असून जन्मलेलं आणि जन्माला येणार अशी दोन्ही मुलं देखील कुपोषित राहणार आहेत.

रुपाली संतान राठोड, मु. पो. वेलखेडा, ता. कन्नड, जि, औरंगाबाद, वय २४ वर्ष तीन मुलं आहेत. मोठा मुलगा १० वर्षांचा. वयाच्या १३ व्या वर्षी लग्न. चौदाव्या वर्षी पहिले मुलं.

दिपाली मनका राठोड, वय २१ वर्ष तीन मुली एक मुलगा. वयाच्या १४ व्या वर्षी लग्न. दोन महिन्यांपुर्वी मुलं बद होण्याची शस्त्रक्रिया झाली आहे. या तिनही महिला आजच्या दिवशी ऊसतोडणीचे काम करत आहेत. ही प्रतिनिधिक उदाहरणे आहेत.

“कमी वयात लग्न, लवकर मुलं आणि त्यांचे संगोपण करण्याची शारिरिक आणि मानसिक तयारी नसल्याने त्याचे परिणाम मुलांवर होतात. आई स्वतःच कुपोषित असते. त्यामुळे मुलंही कुपोषणाचे बळी ठरतात. याचा परिणाम त्यांच्या शारिरिक आणि बौद्धिक वाढिवर होत असतो.” असे सायकोलॉजिस्ट (समुपदेशक) समिक्षा संध्या मिलिंद सांगतात. समीक्षा या मागील अनेक वर्षांपासून ऊसतोड मजूर महिलांना समुपदेशन करण्याचे काम करतात. ऊसतोड मजूर महिला जर एवढ्या प्रकारच्या शारिरीक त्रासातून जात असतील तर त्याचा पुढच्या पिढीवर परिणाम होणारच. शिक्षणामध्ये मागे पडल्याने मनात न्युनगंड निर्माण होते. मग स्पर्धेच्या युगात ही मुलं आपोआपच मागे पडतात. आधीच कुपोषीत, त्यात शिक्षणाची हमी नसते. यातूनच पुढे दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने ऊसतोडणी मजुरीच्या जाळ्यात आपोआप अडकत जातात. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच त्यांना सापडत नाही.

याची प्रमुख कारणे

हे सगळं कशामुळे घडते याचा कधीतरी विचार होणार आहे की नाही ? असा प्रश्न मला सातत्याने पडत असतो. माझ्या परीने याची काही कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

१. बहुसंख्य ऊसतोड मजूर भूमीहीन किंवा अल्पभूधारक शेतकरी आहे.

२. शेतीवर उदर्निवाह होऊ शकत नाही आणि निश्चित स्वरूपाच्या रोजगाराची हमी नाही.

३. नाईलाजाने स्थलांतर, यातून मुलांना विशेषता मुलींना सांभाळण्याविषयी असुरक्षिततेची भावना.

४. एकट्या मुलींना घरी सोडून जाण्यापेक्षा त्यांचे लग्न लावून जबाबदारीतून मुक्त होण्याकडे पालकांचा अधिक भर.

५. एकटी तरुण मुलगी स्वतःच्या घरी सुरक्षित राहू शकत नाहीत, हे समाजातील जळजळीत वास्तव.

६. यातूनच बालविवाहाचे प्रमाण वाढते, मुलींचे शिक्षण तुटून जाते.

७. घरात ठेवण्यापेक्षा लग्न लावून पतीसोबत ऊसतोडणीला गेल्यास कुटुंबाला आर्थिक हातभार.

या व्यतिरिक्तही अनेक कारणे असू शकतील. शोधल्यास सापडतील. पण केवळ प्रश्न शोधून चालणार नाही. आपल्या समाजातील हे प्रश्न आहेत हे प्रथम स्विकारून ते सोडविण्यासाठी योग्य धोरणे राबविण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आपल्या तोंडात गोड साखर टाकणाऱ्या या मजूरांचे आयुष्य अधिकाधिक कडू होत जाईल.

संदर्भ

१. दारिद्र्याची शोधयात्रा, लेखक हेरंब कुलकर्णी

२. ‘आर्थिक, सामाजिक विवंचनेत जगणाऱ्या ऊसतोड मजूर महिलांचे दाहक वास्तव!’ अहवाल, महिला किसान अधिकार मंच. पुणे

३. डॉ. निलम गोऱ्हे समिती अहवाल.

४. टाटा ट्रस्ट, अहवाल

५. EPW अंक २० जुलै २०१९

६. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम’ अहवाल २०१८

७. ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शिक्षण संशोधन अहवाल, २०१४, डॉ. डेबाशिश नंदी, गोखले राजकीय व अर्थशास्त्र संशोधन संस्था.

मार्गदर्शन आणि सहकार्य

१५ ऊसतोड मजूर महिला

डॉ. चंद्रकांत तोंडे, स्त्रीरोगतज्ञ बीड

मा. सीमा कुलकर्णी, महिला किसान अधिकार मंच, पुणे.

मा. भाऊसाहेब आहेर, साथी सामाजिक संस्था पुणे.

डॉ. विविक घोटाळे, सामाजिक विषयांचे अभ्यासक, लेखक,युनिक फौंडेशन पुणे.

डॉ. सोमीनाथ घोळवे, शेती विषयाचे अभ्यासक, स्तंभ लेखक, पुणे.

डॉ. अरुण गद्रे, स्त्रीरोगतज्ञ

मा. संतोष शेंडकर, पत्रकार सकाळ, बारामती

मा. परेश जयश्री मनोहर, टाटा ट्रस्ट सोमेश्वर, बारामती

मा. समीक्षा संध्या मिलिंद, टाटा ट्रस्ट सोमेश्वर, बारामती

मा. मोहन जाधव, ऊसतोड मजूर संघटना बीड 

Tags:    

Similar News