एक पाय नसतानाही सोमनाथने कळसूबाई शिखर केले सर

`इच्छा असेल तर मार्ग दिसेल`, त्याप्रमाणे जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही,असे म्हटले जाते. त्यात एखादया व्यक्तीने अशक्य ते शक्य करून दाखवल्यास त्याचे विशेष असे कौतुक होते. अशीच किमया सोलापुर जिल्ह्यातील सोमनाथ धुळे या अपंग विद्यार्थ्याने केली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट..

Update: 2022-08-19 15:24 GMT

अपंग व्यक्तीत काहीतरी अचीव्ह करण्याची जबरदस्त इच्छा असते. जगात अनेक अपंग व्यक्ती आहेत. ज्यांना व्यवस्थित उभंही राहता येत नाही. परंतु अशा अनेक व्यक्तीनी इच्छा शक्तीच्या जोरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. या जगात अशा अनेक घटना घडल्याची उदाहरणे आहेत. अशीच घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. सोमनाथ धुळे या विद्यार्थ्याचा लहानपणी शाळेत जात असताना ट्रॅक्टरच्या अपघातात त्याला कायमचा एक पाय गमवावा लागला. पण त्याने जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. अशाही परिस्थितीत सोमनाथ शिक्षण घेत राहिला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. सोमनाथ याने ओपन युनिव्हर्सिटी मधून बी.ए ची पदवी संपादन केली असून सध्या तो सोलापूर शहरातील वसुंधरा महाविद्यालयात बीसीएच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. एका पायाने अपंगत्व आल्याने त्याने जगण्याची उमेद सोडली नाही. लोकांच्या मदतीने स्वतः समोर आलेल्या अडचणी सोडवत राहिला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला ट्रेकिंगची माहिती मिळाली. त्याचवेळेस त्याने ठरवले,की अपंग असलो म्हणून हार मानायची नाही. जाहिरातीच्या माध्यमातून त्याने सरळ कॅम्प जॉईन केले. सुरुवातीच्या काळात कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने कळसूबाई शिखर सर केले. एक पाय नसतानाही त्याने अशक्य ते शक्य करून दाखवले. त्याचकारणाने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव ही झाला. सोमनाथला पुढे जावून याच क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण त्याला सध्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तो शिक्षण घेत असल्याने त्याच्या हाताला काम नाही. त्याची आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जावून त्याला पैसे पुरवत आहे. गावाकडे रहायला त्याला घर देखील नाही. अडचणींनी त्याला चार ही बाजूंनी घेरले असून त्यामुळेच सोमनाथ पुढील शिक्षण घेण्यासाठी लोकांना मदतीचे आवाहन करीत आहे.




 


घराची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही त्याला शिकायचे आहे

सोमनाथच्या घरची परस्थिती अत्यंत नाजूक आहे. लहानपणी त्याला मोठे झाल्यावर देशासाठी सैनिक व्हायचे होते. पण अपघाताने त्याला पाय गमावला लागला त्यामुळेच त्याचे सैनिक होण्याचे स्वप्न भंग पावले. अशाही परिस्थितीत त्याला देशासाठी काहीतरी करायचे आहे. यासाठी त्याची सातत्याने धडपड सुरू आहे. शिक्षण घेत आहे. त्याला चांगले मार्क ही मिळत आहेत. घरची आर्थिक परस्थिती बिकट असल्याने त्याला काम करून शिक्षण घेण्याची इच्छा आहे. पण त्याला काम मिळेना गेले आहे. रोजगाराचा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला आहे. जे धडधाकट व्यक्तींना जमले नाही. ते एका पायाने अपंग असलेल्या सोमनाथने करून दाखवले. त्याने कळसूबाई शिखरा बरोबरच अंकाइटंकाई सारखे शिखर सर करून दाखवले आहे. त्याच्या या कामगिरीची दाखल घेवून अनेकांनी त्याला मदत केली आहे. लोकांच्या मदतीने त्याला पुढील शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी त्याला आता आर्थिक मदतीची गरज असल्याचे तो सांगतो.

व्हील चिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे केले प्रतिनिधित्व

अपंगांसाठी व्हील चिअर क्रिकेट स्पर्धा असते. याची माहिती सोमनाथला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळली. त्यावेळेस त्याने लागलीच या स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आर्थिक गणिते जुळवायला सुरुवात करून त्यामध्ये तो यशस्वी झाला. पैसे जमा करून त्याने व्हील चिअर क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी मुंबई गाठली. योगायोगाने त्याची राज्य संघात निवड झाली. त्याने गुजरात,मध्य प्रदेश येथे झालेल्या अपंग व्हील चिअर स्पर्धेत सहभाग घेवून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. अपंगांसाठी असणारी व्हील चिअर स्पर्धा फक्त अपंगांसाठी असणाऱ्या व्हील चिअर वर बसून खेळली जाते. त्याच्या संघाने राष्ट्रीय पाथळीवर झालेल्या व्हील चिअर क्रिकेट स्पर्धेत उपविजेता पद मिळवले. या स्पर्धेत त्याने विशेष अशी कामगिरी बजावली असून त्याच्या या कामाची अनेक दखल घेवून त्याला मदत ही केली आहे.




 


राजश्री शाहू महाराज गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सोमनाथ सन्मानित

सोमनाथ बीसीए च्या तिसऱ्या वर्गात शिकत असून त्याला चांगले मार्क मिळाले असल्याने त्याला राजश्री शाहू महाराज गुणवंत पुरस्काराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्याचा सन्मान केला आहे. त्यामुळे अपंग असतानाही त्याने केलेल्या कामाचे जास्त कौतुक होत आहे. वसुंधरा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मीना गायकवाड यांनी सोमनाथ यांची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांनी आणि त्यांच्या सहकारी प्राध्यापकानी सोमनाथ त्याला आर्थिक मदत केली आहे. परंतु ही मदत तोकडी असल्याचे त्या सांगतात. त्यासाठीच समाजातील सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदत करावी,असे सोमनाथला वाटत आहे.

सोमनाथ राहतो अपंग मुलांच्या वसतिगृहात

सोमनाथ सोलापूर शहरातील मजरेवडीत असणाऱ्या अपंग मुलांच्या वस्तीगृहात सध्या राहत आहे. या ठिकाणी त्याच्या सोबत आणखीन चार ते पाच अपंग विद्यार्थी राहतात. यातील एका मुलाला नीट चालता ही येत नाही. त्याला रांगतच सर्व कामे करावी लागतात. अपंग असताना ही त्यांची जगण्यासाठी धडपड सुरू असून त्याची समाजासाठी आणि स्वतःसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा आहे. या सर्व अपंग विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर शिकून घेतले असून त्याचबरोबर त्यांनी मोबाईल रीपेरींगचा कोर्स देखील पूर्ण केला आहे. पण त्यांना सद्या रोजगार उपलब्ध नाही. शासन,प्रशासन अपंगांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची खंत ही त्यांनी बोलताना व्यक्त केली. सोमनाथकडे अपंगांसाठी असणारी सायकल आहे. तिच्या मदतीने दिवसभराची सर्व कामे तो पार पाडतो.





 


अपंग असतानाही सोमनाथने विविध स्पर्धात मिळवले यश

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सोमनाथ धुळे याने सांगितले,की सोलापूर शहरातील वसुंधरा महाविद्यालयाचा विद्यार्थी असून मला जन्मतःच अपंगत्व आलेले नाही. शाळेला जात असताना ट्रॅक्टरच्या अपघातामुळे अपंगत्व आले. माझे सैनिक होण्याचे स्वप्न होते. अपघाताने ते स्वप्न भंग पावले. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर अंधकार पसरला होता. परंतु स्ट्रगल करायचे सोडले नाही. सातत्याने प्रयत्न करत राहिलो. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कळसूबाई शिखराच्या मोहिमेबद्दल माहिती मिळाली. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अपंग असून दोनवेळा कळसूबाई शिखर सर केले आहे. व्हील चिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. येणाऱ्या काळातील स्पर्धा आणि शिक्षणासाठी शासन,सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी मदत करावी,असे आवाहन सोमनाथने नागरिकांना केले आहे.


Full View

Tags:    

Similar News