Ground Report : घरकुलापासून दिव्यांग वंचित

हक्काचे घर खचले.. शासनाच्या घरकुल योजनेतून पात्र ठरत असताना केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे अपंग कुटुंबाला समाजमंदिरात राहावे लागत असल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील गाजीपुर टाकळी गावात दिसून आला आहे.

Update: 2022-01-21 12:28 GMT

जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यामध्ये असलेल्या गाजीपुर टाकळी या गावातील दत्ता गोंड चोर हे दिव्यांग व्यक्ती त्यांच्या परिवारासह गेल्या दोन वर्षापासून गावामध्ये असलेल्या समाज मंदिरामध्ये वास्तव्य करीत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांना अद्यापही हक्काचे घरकुल न मिळाल्याने त्यांना गावातील विकृतींचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने व आई वडील वृद्ध असल्याने दत्ता यांच्या परिवाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. सात वर्षांपूर्वी दत्ता यांनी घरकुल योजनेकरिता अर्ज दाखल केला होता. घरकुल मिळेल या आशेने मातीच्या घरात ते वास्तव्य करीत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी संपूर्ण घर खचल्यामुळे शेजारी यांचा दबाव वाढत असल्याने घर पाडून टाकावे लागले. ग्रामपंचायतीने गावातील समाज मंदिरामध्ये यांना राहण्यासाठी सांगितले. आपल्याला लवकरच घरकुल दिले जाईल असे त्यावेळी आश्‍वस्त करण्यात आले होते. मात्र दोन वर्ष उलटून गेले असताना सुद्धा कुठलाही प्रकारचा लाभ या कुटुंबाला मिळाला नाही. शिवाय दत्ता यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्यासह त्यांचे भाऊ देखील दिव्यांग आहेत




 


आम्ही यासंदर्भात दत्ता गोंड चोर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे दृष्टी बाधित आहोत. मी गावाकडे रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने अमरावती येथे स्वतःचा व्यवसाय करतो. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सात वर्षांपूर्वी घरकुल योजनेसाठी अर्ज दाखल केला होता. आज ना उद्या घरकुल मिळेल.या आशेने मातीच्या घरात वास्तव्य करत असताना घर खचल्यामुळे काढून टाकावे लागले. दोन वर्षापासून गावामध्ये असलेल्या समाज मंदिरामध्ये वास्तव्य करत आहोत मी यासंदर्भात सरपंच, ग्रामसेवक, व्हिडिओ, जिल्हाधिकारी या सर्वांना भेटलो. मात्र कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही. शिवाय तुमचे घरकुल यादी मध्ये नाव नसल्यामुळे व तुमच्या प्रवर्गासाठी कुठलाही जागा नसल्याने मी काहीच करू शकत नाही, असे ग्रामसेवकानी सांगितले. माझा जन्म या गावात झाला आहे. तरीसुद्धा तुमची इथे नोंद नाही अशा पद्धतीची ग्रामपंचायत सांगते. तर दुसरीकडे दिव्यांग व्यक्तींसाठी असलेला निधी आजपर्यंत कधीच आम्हाला मिळाला नाही. त्यामुळे शासनाने आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी विनंती दत्ता यांनी केली आहे.




 


आता यासंदर्भात आम्ही थेट ग्रामसेवकांची संपर्क साधून त्यांना या संदर्भात विचारणा केली? ग्रामसेवक महेंद्र बुंदे सांगतात की, दिव्यांगांसाठी कुठलीही घरकुल योजना नसते. मात्र दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले जावे, अशा पद्धतीच्या शासन सूचना आहेत. त्यानुसार आम्ही प्रयत्नशील आहोत व संबंधित कुटुंबाला लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आम्ही काम करू, अशी प्रतिक्रिया ग्रामसेवक यांनी दिली आहे.

आता दिव्यांग व्यक्तींसाठी घरकुल योजना खरंच अस्तित्वात आहे का? जर असेल तर यासाठीचे निकष काय आहेत असे सवाल उपस्थित झाले. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही दिव्यांग व्यक्तींकरिता सामाजिक कार्य करणाऱ्या अनाम प्रेम या संस्थेचे संस्थापक अजित कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांना या संदर्भात विचारणा केली.

बेरोजगार, बहु विकलांग दिव्यांग यांच्या करिता अपंग घरकुल योजना गावपातळीवर अस्तित्वात आहे. याकरिता ग्रामसेवक व सरपंच यांच्या शिफारशी नुसार मागेल त्या दिव्यांग यास घरकुल मिळते.त्यासाठी निकष 40% पेक्षा जास्त अपंगत्व व आधार कार्ड व पक्के घर नसावे असे निकष आहेत. जागा ही स्वतः दिव्यांग याची आवश्यकता आहे. ही योजना अधिक उपयोगक्षम बनवली पाहिजे. जे गाव हे घरकुल नाकारेल त्याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Tags:    

Similar News