कोविड मृतांच्या लपवाछपवीचं गुजरात मॉडेल
कधी काळी गुजरातच्या विकासाच्या मॉडेलला फसलेल्या भारतीयांना आता गुजरातच्या कोविड मॉडेलचा अनुभव आला आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालात कोविड-१९चा प्रादुर्भाव होऊन मृत्यू झालेल्या शेकडो लोकांचा समावेश गुजरात राज्यातील मृतांच्या अधिकृत यादीत केला नसल्याचे उघड झाले आहे. गुजरातमधे कोविड मृत्युंची लपवाछपी कशासाठी करतेयं असा प्रश्न उपस्थित झाला आहे.;
जे कोरोना रुग्ण रुग्णालयात गेले नाहीत किंवा ज्यांना कोणतेही उपचार मिळालेले नाहीत, अशा मृतांवर कोविड-१९ आजाराने मृत्यू झालेल्यांवर केले जातात, त्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या मृतांपैकी केवळ ५ टक्क्यांचीच कोविड-१९ चाचणी झाली होती.
मार्च २०२०पासून ५०० मृतदेह रुग्णालयांमध्ये आणल्या गेले, यापैकी केवळ १० जणांची कोविड-१९साठी चाचणी करण्यात आली. चाचणी झालेल्यांपैकी तीन जण पॉझिटिव्ह आढळले. या तीन मृतांच्या मृत्यूचे कारण कोविड-१९ असे दाखवण्यात येऊनही त्यांची नावे कोविडमुळे मृत झालेल्यांच्या यादीत घालण्यात आली नाही.
डॉ. मोहनभाई बाबूभाई गामीत यांचा मृत्यू कोविडमुळे झाला असूनही सुरत महानगरपालिकेच्या कोविड मृतांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. डॉ. गामीत सुरत म्युन्सिपल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च हॉस्पिटलच्या कोविड-१९ वॉर्डात काम करत होते. म्हणून त्यांचा मृत्यू झाल्यानंतर एक दिवसाने ५ डिसेंबर रोजी त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव आली व मृत्यू प्रमाणपत्रावर त्यांच्या मृत्यूचे कारणही कोविड-१९ असे नमूद करण्यात आले.
कोविड-१९ची लक्षणे दाखवणाऱ्यांच्या सर्व २०० मृतदेहांच्या चाचण्या केल्या असत्या तर कदाचित किमान ६० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव आले असते. सर्व ५०० मृतदेहांच्या चाचण्या झाल्या असत्या, तर हे आकडे आणखी जास्त असते.
"मृतदेह रुग्णालयात आल्यानंतर, जर मृत व्यक्ती कोविड रुग्णाच्या संपर्कात आली असेल, परदेश प्रवास करून आली असेल, त्याच्या शरीरावर कोणतीही जखमेची खूण नसेल किंवा मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसेल, अशा परिस्थितींमध्येच त्याची कोविडसाठी चाचणी केली जाते," असे अहमदाबाद येथील जेएमईआरएस मेडिकल कॉलेज व नागरी रुग्णालयाच्या फोरेंजिक मेडिसिन विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉ. गौरांग पटेल यांनी सांगितले.
कोविड साथीच्या काळात गुजरातमधील स्मशानांमध्ये येणाऱ्या मृतदेहांमध्ये लक्षणीय वाढ होऊनही कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या बरीच कमी होती. त्यामुळे याबाबत संशय निर्माण झाला, असे दर्शन देसाई यांनी 'वायर'ला दिलेल्या बातमीत सांगितले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गुजरात शाखेचे अध्यक्ष चंद्रेश जरदोश यांनी सुरतमध्ये सांगितले की, "कोविडमुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या कमी दाखवली जात आहे याबाबत वादच नाही. एखाद्या रुग्णाला अन्य काही आजार असतील तर त्याचा मृत्यू कोविडमुळे झाला असे दाखवायचेच नाही असे अलिखित धोरण अमलात आणले जात आहे."
मूळ बातमी: द वायर: https://thewire.in/health/gujarat-covid-19-death-toll