Ground Report : कोरोनाने पैलवानांना केले चितपट !
महाराष्ट्राच्या मातीत बहरलेला कुस्तीचा खेळ आज कोरोनामुळे संकटा अडकला आहे. सध्या राज्यातील पैलवानांची आणि या खेळाची काय अवस्था झाली हे दाखवणारा आमचे प्रतिनिधी सागर गोतपगार यांचा ग्राऊंड रिपोर्ट;
कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. निर्बंध शिथिले केले गेले असले तरी अनेक उपक्रमांना परवानगी देण्यात आली नाही. कोरोनाच्या संकटातदेखील IPLL सामने बायो बबलमध्ये खेळवले गेले. पण महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कुस्तीची परंपरा जपणारे पैलवान संकटात आहेत. पण त्यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. उठता बसता सांस्कृतिक अभिमान म्हणून कुस्तीचा उल्लेख करणाऱ्या राज्य सरकारला जाग येणार का
पेंटिंगचा व्यवसाय करणारे प्रदीप गायकवाड यांनी आपल्या गरीब परिस्थितीतही आपली मुलगी प्रेरणा हिला देशातील एक नामांकित मल्ल बनवण्याचे स्वप्न पाहिलं आहे यासाठी तिला सांगली जिल्ह्यातील जोंधळखिंडी या गावातील जय हनुमान या तालमीमध्ये त्यांनी सरावासाठी दाखल केले आहे. तिचा नियमित सराव सुरू होता. पण गेल्यावर्षी देशात कडक लॉकडाऊन झाला. या दरम्यान त्यांची सर्व कामे ठप्प झाली. उत्पन्न बंद झालं. या परिस्थितीत त्यांनी पाहिलेल्या स्वप्नावर कोरोनाने प्रश्नचिन्ह उभे केले. आपली व्यथा मॅक्स महाराष्ट्रकडे मांडताना ते सांगतात "माझी कामे बंद पडली आहेत. त्यामुळे मुलीच्या खुराकासाठी महिन्याला जवळपास ९ हजार रुपयांपर्यंत होणारा खर्च मला परवडू शकत नाही. त्यामुळे इतके दिवस घाम गाळून देखील माझ्या मुलीचे स्वप्न लॉकडाऊनमुळे धुळीस मिळत आहे. मैदाने सुरू नाहीत, त्यामुळे दुसऱ्या वर्षापर्यंत ती एकही कुस्ती खेळली नाही. आता कुस्ती सोडायची वेळ तिच्यावर आली आहे".
ही व्यथा केवळ एका प्रेरणाची नाही तर महाराष्ट्रातील असंख्य तालमींमधल्या लाल मातीत शेकडो पैलवान दररोज घाम गाळत आहेत, अशा सर्व पैलवानांची ही व्यथा आहे. व्यायाम केल्यानंतर शरीर भरून येण्यासाठी पैलवानांना त्याच ताकतीचा आहार घेणेही महत्त्वाचे आहे. अनेक पैलवान आहारावर होणारा हा खर्च वर्षभरात मैदानात होणाऱ्या कुस्त्यांमधून भरुन काढत असतात. यातील काही रक्कम घरी आई-वडिलांना देखील ते पाठवता असतात. पण कोरोनाने मैदाने बंद झाली आणि येणारा पैसा थांबला. या स्थितीत खुराक आणि नियमित व्यायाम हे चक्र पूर्ण कसे करायचे या चिंतेत पैलवान आहेत.
खुराकात दूध, तूप,बदाम, थंडाई यासह इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो. पण हे अन्न पदार्थ अतिशय महाग असतात. एका पैलवानाचा महिन्याचा खर्च किमान ९ ते १० हजार रुपयांपर्यंत जातो. यातील बहुतांश पैलवान हे सामान्य गरीब कुटुंबातून आलेले आहेत. कुस्तीची परंपरा टिकवणे आणि छंद जोपासणे या उद्देशाने आपल्या मुलांना ते तालमीत पाठवत असतात.
महाराष्ट्रात कुस्तीला मोठी परंपरा आहे. यात्रा, जत्रा उत्सवांमध्ये कुस्त्यांची मैदाने भरवली जातात. या कुस्ती मैदानात कुस्त्या जिंकून पैलवानांना पैसे मिळतात. त्यातून मिळालेल्या पैशातून ते खुराकाचा खर्च भागवतात. यातील काही रक्कम ते घरीही देत असतात. आज लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी कुस्तीची मैदाने ठप्प आहेत. त्यातून येणारे उत्पन्न शून्यावर आले आहे. मात्र खुराक आणि इतर खर्च सुरूच आहे.
बेणापुर येथील कै. बाळासाहेब शिंदे कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे वस्ताद राजेंद्र शिंदे सांगतात. "कोरोना काळात महाराष्ट्रातील अनेक मल्लांवर कुस्ती सोडून देण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येकवेळी पैलवान हा राजकीय नेत्यांच्या मदतीला धावत असतो. पण आज राज्य सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलेले आहे. हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि क्रीडा वैभव म्हणून ज्या कुस्तीला संबोधले जाते. ती कुस्ती संपुष्टात येईल. पैलवान संपले तर नवे पैलवान घडवणे हे काम पुन्हा कदापि शक्य नाही. याचा विचार करून सरकारने कुस्तीला मदत केली पाहिजे."
आज वस्ताद राजेंद्र शिंदे हे विनामूल्य कुस्तीचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक चांगले पैलवान घडवलेले आहेत. परंतु या कठीण प्रसंगात दानशूर व्यक्तींनी पैलवानांच्या खुराकाचा खर्च उचलावा असे आवाहन ते करतात.
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी देखील कुस्तीच्या सद्य स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. खर्च न परवडल्याने अनेक पैलवान कुस्ती क्षेत्र सोडून जात असल्याचे त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले आहे. ते सांगतात " कोरोनाचा इतर क्षेत्राप्रमाणे कुस्तीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. कुस्तीचा सराव करणे हे गरीब कुटुंबातून येणाऱ्या पैलवानांना परवडत नाही. महाराष्ट्र सरकारने येत्या काळात कुस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणखी मैदाने भरवावी व महाराष्ट्र केसरी तसेच इतर स्पर्धांमधील कुस्त्यांच्या बक्षिसांच्या रकमा वाढवल्या पाहिजेत."
या अगोदरही कुस्तीकडे सरकारचे दुर्लक्षच
महाराष्ट्रात अनेक कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील अनेक पैलवान या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेत असतात. यातील अनेक प्रशिक्षण केंद्रे हr विनामूल्य चालवली जातात. सांगली जिल्ह्यातील बेणापुर जोंधळखिंडी येथे अशाच प्रकारे विनामूल्य प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. अशा प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी सरकारने काही योजना राबवल्या पाहिजे. तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी नवीन यंत्रणा बनवावी, अशी मागणी कुस्ती प्रशिक्षक संजय अवघडे यांनी केली आहे.
शरद पवार हे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. कुस्ती संकटात असताना शरद पवार यांनी कुस्तीला या संकटातून बाहेर काढावे असे आवाहन ज्येष्ठ कुस्ती समालोचक शंकर अण्णा पुजारी यांनी मॅक्स महाराष्ट्र सोबत बोलताना केले आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीत कुस्तीची परंपरा अतिशय महत्त्वाची आहे. कुस्तीच्या परंपरेचा अभिमान राज्यात अनेक व्यासपीठावरून मिरवला जातो. पण आज कुस्ती संकटात आहे. पैलवान संकटात आहेत. या स्थितीत कुस्तीला राजाश्रय देण्यासाठी कुस्तीला मदत करण्यासाठी सरकार पुढे आलेले नाही. कुस्ती परिषदेचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी पुढाकार घेऊन कुस्तीला मदत करावी. पैलवानांना दिलासा द्यावा. कुस्तीला आज मदत झाली नाही तर अनेक मल्ल या क्षेत्रातून बाहेर जातील आणि भविष्यात कुस्ती इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही. आय पी एल चे सामने बायो बबलमध्ये खेळवण्याची परवानगी देणाऱ्या सरकारला पैलवानांची सुरू असलेली ही परवड माहीत नसेल का ? की कुस्तीतून आय पी एल इतके पैसे सरकारला मिळत नसतील ? कुस्तीचे थोरपण व्यासपीठांवर अभिमानाने मिरवणाऱ्या सरकारला आता तरी जाग येणार का ? असे संतप्त प्रश्न निर्माण होत आहेत.