अंधारलेल्या गावाची कहाणी, दोन मंत्री मतदारसंघाला पण वीज नाही गावाला !
मतदारसंघातले दोन लोकप्रतिनिधी मंत्री आहेत...एक राज्यात तर दुसरे केंद्रात...पण तरीही औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडच्या अनाड गावातील बरड वस्ती अनेक दशकांपासून अंधारात आहे. या वस्तीवरील लोकांचे जगणे दाखवणारा मॅक्स महाराष्ट्राचा हा ग्राउंड रिपोर्ट...
औरंगाबाद-जळगाव हायवेपासून तीन किलोमीटर आणि जगप्रसिद्ध अजॆठा लेणीपासून 2 किलोमीटरवर असलेली बरड वस्ती... सूर्य मावळला की ही वस्ती अंधारात गुडूप होते. 30-40 घरं आणि 200 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या वस्तीवरील लोकं गुरा-ढोरांसारखी जगत आहेत. रस्ते-पाणी तर सोडा व्यवस्थेचा सूर्य उगवण्याच्या आशेत या लोकांची 30 वर्षे अशीच अंधारात निघून गेलीय..
रात्रीच्या वेळी बरड वस्तीच्या लोकांना फक्त गोड तेलाच्या दिव्याचा आधार असतो. मात्र तो पण व्यवस्थेवरच्या विश्वासाप्रमाणे रात्री विझून जातो. त्यात तर आता तेलाचेही भाव वाढल्याने दिवाही ह्या लोकांची साथ सोडू लागला आहे.
तसं अनाड गावचं आणि बरड वस्तीचं अंतर फक्त 2 किलोमीटरचं आहे. मात्र वस्तीवरील लोक बाहेर गावातून येऊन आपल्या इथे स्थायिक झाले असल्याचं सांगत गावकरी आणि ग्रामपंचायत सोयी सुविधा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप, बरड वस्तीवरील नागरिक करत आहेत.
गेली 30 वर्षांपासून वस्तीवरील कुटुंब वीज मिळवण्यासाठी धरपड करत आहेत. एक पिढी संपली परंतु, वीज काही त्यांना आणता आली नाही आणि दुसऱ्या पिढीचा लढा अजूनही सुरूच आहे. वीज नसल्याने वस्तीवरील अनेकांनी आपला जीव गमावला आहे. रात्रीच्या अंधारात काहीच दिसत नसल्याने सर्पदंशाने काहींना आपला जीव गमवावा लागला. आजही यातील अनेकजण भीतीपोटी घराच्या छतावर झोपून रात्र काढतात.
मुलांनी अभ्यास कसा करावा?
वस्तीवरील तीस-चाळीस मुलं शेजारच्या गावात शिक्षणासाठी जातात. घरी आल्यावर दिवसाच तो काय अभ्यास करायचा. रात्री अभ्यास करायचा असेल तरी वडील करून देत नाहीत, कारण रॉकेल मिळत नसल्याने इथे तेलाचा दिवा लावावा लागतो.त पण, तेलही महाग झाल्याने दिवा लावून अभ्यास करणं परवडत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे.
शाळेत गावातील माझ्यासोबतचे इतर मुलं घरी दिलेला अभ्यास करून येतात, कारण त्यांच्या घरी लाईट असते. मात्र माझा अभ्यास होत नाही, कारण आमच्या घरात लाईटच नाही. त्यात थोडाफार दिवा लावला की, हवा येते आणि दिवा विझून जातोत. त्यामुळे माझा अभ्यास होत नसल्याचे, दिनेश पाचवणे हा मुलगा म्हणतो. त्यामुळे देशाचं भविष्य इथे अंधारात ज्ञानाच्या प्रकाशासाठी चाचपडतंय असचं म्हणावं लागेल.
गावकऱ्यांचे म्हणणे काय?
"आम्ही ढोरासारख जगतोय. इथं लाईट नाही, पाणी नाही. आमची लेकरं लहान आहेत, त्यांनी कसं शिक्षण घ्यावं. मी या वस्तीत चाळीस वर्षांपासून राहते. जसं लग्न झालं तसं आम्ही अंधारातच जीवन जगतोय. बाजूच्या गावात कोंबड्याला, ढोराला लाईट, मिरचीच्या रोपांना लाईट मिळते पण आम्हाला लाईट नाही," असं सुमन निकाळजे या गावकरी महिला म्हणतात.
"गेली तीस वर्षे आम्ही इथं राहत आहोत, आमच्या शेजारीच माझे आजी-आजोबा राहत होते. एक दिवस रात्री घरात झोपेत असताना आजीला साप चावला आणि त्यामुळे माझ्या आजीचा मृत्यू झाला. त्यानंतरही अजून विजेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. आमचे मुलं आजही कंदीलाच्या उजेडात अभ्यास करतात," असं, गणेश पाचे म्हणतात.
"अजिंठा लेणीपासून 2 किलोमीटर असलेल्या आमच्या गावात लाईट नाही. पावसाळ्यात आमचे खूप हाल होतात, साप-विंचू निघतात. पण अंधारात काहीच दिसत नसल्याने गावातील अनेकांचा जीव गेला आहे. आज माझं वय 26 वर्ष आहे, पण माझ्या जन्मापूर्वीपासूनच वस्तीत लाईट नाही," असं पांडुरंग मोरे सांगतो.
"गेल्या तीस वर्षांपासून बरड वस्ती अंधारात पडली आहे. त्यासाठी आम्ही तीस वर्षापासून पाठपुरावा करतोय. यासाठी महावितरण आणि इतर शासकीय कार्यलायत चकरा मारतोय, प्रस्तावही दाखल केलेला आहे, पण आम्हाला आश्वासनाच्या पलीकडे काहीच मिळत नाही," असं गजानन गदइ हतबल होऊन सांगतात.
"दोन मंत्र्यांच्या मतदारसंघात असूनही वस्ती अंधारात"
अनाड गावातील ही बरड वस्ती ठाकरे सरकारमध्ये असलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रात मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात येते. मात्र असं असूनही या वस्तीवर 30 वर्षांच्या संघर्षानंतर ही वीज पोहोचू शकली नाही. त्यामुळे मंत्र्यांच्या मतदारसंघात अशी परिस्थिती असेल तर इतर ठिकाणचं न विचारलेलं बरं...
मोदींची सौभाग्य योजना कागदावरच
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 15 ऑगस्ट 2017 ला लाल किल्ल्यावरून भाषण करताना, देशातील 18 हजार 500 गावात वीज पोहचली नसून, पुढील 1 हजार दिवसात सौभाग्य योजना अंतर्गत या गावात वीज पोहोचवली जाईल असे म्हंटलं होतं. तसेच फक्त या गावातच वीज पोहोचवली जाणार नसून, गावातील प्रत्येकाच्या घरात विजेचे कनेक्शन असेल असेही मोदी म्हणाले होते. मात्र घोषणा होऊन चार वर्षे उलटली पण अजूनही बरड वस्ती सारख्या अनेक ठिकाणी वीज पाहचली नाही.
पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही
बरड वस्तीवर कोणत्याच मूलभूत सुविधा आतापर्यंत पोहचू शकलेल्या नाहीत. वीजेबरोबर पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न आहे. वस्तीवर पिण्यासाठी पाणी नसल्याने महिलांना पायी जात लांबून पाणी आणावे लागते. एकदा आणलेलं पाणी तीन-चार दिवस पुरवण्यासाठी नियोजन करावे लागते. तर काहीजण जवळ असलेलं अशुद्ध पाणी गाळून पितात.
मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासन जागी
मॅक्स महाराष्ट्राने 'अंधारलेल्या गावाची कहाणी' असा ग्राउंड रिपोर्ट केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बरड वस्तीत वीज पोहचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, टेबलावर धूळ खात पडलेल्या फाईली पुढे सरकू लागल्या आहेत. तर गावात विजेचे खांब सुद्धा येऊन पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच बरड वस्तीचा विजेचा प्रश्न मार्गे लागणार हीच अपेक्षा.
प्रशासकीय अधिकारी काय म्हणतात?
गावात वीज नसल्याने तात्काळ काम सुरू केले असून, गावात एकूण 16 विजेचे खांब बसवण्यास सुरवात केली आहे. येत्या सोमवारपर्यंत गावात वीजपुरवठा सुरू करण्यात येईल,अशी माहिती महावितरणचे अधिकारी दीपक साखळे यांनी दिली आहे.