#GroundReport : हंडाभर पाण्यासाठी डोंगरभर पायपीट, आदिवासी पाड्यांना टंचाईचे चटके

मुंबईची तहान भागवणाऱ्या आदिवासी भागातील गावपाड्यांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाहा आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;

Update: 2023-06-08 09:21 GMT

पालघर – देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. दरवर्षी गेल्या अनेक अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी मोठ्या मोठ्या आकड्याची तरदूत केली जाते. परंतु खऱ्या अर्थाने येथील आदिवासींचा विकास होताना दिसत नाहीये. अनेक योजना कागदावर राबवल्या जातात, यामुळे आदिवासींचा विकास हा फक्त प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या नजरेलाच दिसतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून 5 ते 6 किमी अंतरावर चास ग्रामपंचायतीमधील 266 लोकवस्तीच्या हटीपाडा वाशीयांना घोटभर पाण्यासाठी 3 किलोमीटरचा भला मोठा डोंगर पार करावा लागतो. डिसेंबर महिन्यात गावालगत असलेल्या विहिरीने तळ गाठल्याने येथील आदिवासींची घोटभर पाण्यासाठी सैरभैर भटकंती सुरू झाली आहे. रणरणत्या उन्हात तर कधी रात्री अपरात्री महिल, लहान मुलं आणि पुरुषांना देखील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीवरून पाणी भरावे लागत आहे.

"आम्ही महिनाभरापूर्वी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. परंतु अद्यापपर्यत आम्हाला टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. रात्री -अपरात्री पाणी भरताना एखाद्या महिलेचा मृत्यू ओढवल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल गुलाब नडगे या महिलेने मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना विचारला.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोसोमैल दुरवरून पाणी भरून जेरीस आलेल्या महिलांनी महिनाभरापूर्वीच टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी मोखाडा तहसीलदाराकडे केली आहे. परंतु महिनाभराचा कालावधी उलटूनही अद्यापही टँकर सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासानाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून कुणी टँकर देता का टँकर अशी म्हणण्याची वेळ हटीपाडा वाशीयांवर आली आहे.

आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलेल्या टाक्या गेल्या कुठे?

इथे ठक्करबापा योजनेतून लाखो रुपये खर्च करून नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून गावालगतच्या विहिरीत पाणी सोडले जाते. परंतु ही पाईपलाईन निकृष्ट असल्याने ह्याचा फायदा स्थानिकांना झालेला नाही. तसेच दोन ते तीन वर्षांपूर्वी येथील पाणी टंचाईची समस्या विचारात घेऊन शिवसेनेतर्फे येथे दोन टाक्या पाणी साठवण्यासाठी बसवण्यात आल्या. त्याचे उदघाटन सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले होते. परंतु उद्घाटनाच्या दिवशी या टाक्यांद्वारे पाणी सोडण्यात आले पण त्यानंतर टाक्या दखील गायब झाल्या आणि पाणी मिळालेच नसल्याचे या महिलांनी सांगितले

टँकर पुरवठ्याचे नियम धाब्यावर

पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईचे पहिले चटके डिसेंबर महिन्यातच, मोखाड्यातील दापटी 1 व 2 या गावांना बसू लागले. यांसह इतर 24 गावपाड्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यामधील 10 गावपाड्यांचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाने, मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर मंजुरीसाठी पडून आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर वणवण पायपीट करावी लागते आहे.

दोन महिने आधीच पाणीटंचाईचे चटके

दरवर्षी मोखाड्यात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईला सुरूवात होते. तर 100 हून अधिक गावपाडे पाणी टंचाईने होरपळतात. मात्र, यंदा दोन महिने अगोदरच तालुक्यातील दापटी - 1 व दापटी - 2 या दोन गावांमध्ये डिसेंबर 2020 मध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आणि पालघर जिल्ह्यात पहिली पाणीटंचाईची ठिणगी मोखाड्यात पडली. त्याचवेळी येथील आदिवासींनी टॅंकर द्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. सद्यस्धितीत मोखाड्यातील 24 गावपाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील गावपाड्यांनीही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयाकडे केली आहे.

टँकरचे अधिग्रहण करण्याचा अधिकार कुणाला?

शासनाच्या धोरणानुसार टंचाईग्रस्त गावपाड्यांनी, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करताच, त्याची 24 तासात तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून 48 तासात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांच्या टेबलावर पडून आहेत. यामुळे टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्या अशी मागणी जोर धरत आहे

तहसीलदारांचे म्हणणे काय?

तालुक्यात ऊन्हाची तीव्रता वाढू लागल्याने सद्यस्थितीत 24 गावपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यांनीही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीसाठी पाठवले असून दापटी 1-2 येथे 10 तारखेपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू केला असून उर्वरित प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याची माहिती तहसीलदार वैभव पवार यांनी दिली. तसेच तालुक्यातील दापटी - 1, दापटी - 2, धामणी, कुंडाचापाडा, स्वामीनगर, धनगरेवाडी, डोंगरवाडी, हेदवाडी (पाथर्डी), ठवळपाडा, पिंपळपाडा (खोच). अशा दहा गावपांड्याना टॅंकरेने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले असून दापटी 1- 2 येथे टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Full View

टँकरमुक्त मोखाडा ही घोषणा हवेतच

तालुक्यातील पाणीटंचाई ही वर्षानुवर्ष आदिवासींच्या पाचवीलाच पुजली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा टँकरमुक्तीचा नारा दिला. अनेक सत्तांतरं झालीत. वेळोवेळी सर्वच राजकीय पक्षांकडून टँकर मुक्तीचा नारा दिला गेला. परंतु प्रत्यक्षात "टँकरमुक्त मोखाडा ही संकल्पना" राबलीच नाही.

टँकरच्या नावाखाली खर्च

2015- 16 - 89 लाख 71 हजार 640

2016 -17 – 1 कोटी 21 लाख 258

2017-18 - 1 कोटी 61 लाख 11 हजार 74

2018 -19 - 12 लाख 92 हजार 156

गेल्या पाच वर्षात 3 कोटी 37 लाख 14 हजार 128 रुपये एवढा एकूण खर्च झाला आहे असून सन 2019- 20च्या खर्चाची आकडेवारी मोखाडा पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.

दरवर्षीच टँकरच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण येथील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे शहाणपण अद्यापही दाखवण्यात आलेले नाही. 157 पाडे व 59 महसूली गावे असलेल्या मोखाडा तालुक्यात निम्यापेक्षा अधिक गाव-पाड्यांना दरवर्षीच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधीं रुपये खर्चून केलेल्या जल स्वराज्य योजना, शिवकालीन टाक्यांची योजना, रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरी बांधणे अशा अनेक योजना राबविण्यात आल्या, परंतु हया योजना वांझोट्या ठरल्याने घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट कायम आहे.

मुबलक पाणी असूनही मोखाडा तालुका तहानलेला

अतिदुर्गम डोंगराळ भागात असलेल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. डिसेंबर महिन्यात पाणीटंचाईची समस्या तोंड वर काढते. तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा, अशी मोठी मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती आहे. प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे या धरणांचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही.

येथील परिस्थिती बघता दरवर्षीच डिसेंबर पासूनच पाणी टंचाईची समस्या तोंडवर काढून एप्रिल- मे मध्ये पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. टंचाईग्रस्त आदिवासीना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींपासुन टंचाईग्रस्त गावपाडे २० - २५ किलो मीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागते. डोळ्यात तेल घालून चातक पक्षाप्रमाणे आदिवासींना टँकरची दिवसभर वाट बघावी लागते.

दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील शून्य नियोजनामुळे पाणीटंचाई उग्र होत असते. यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० किमी अंतरावर मुबंईला शासनाने पाणी पोहोचवले आहे. परंतु धरणा लगतच्या ४ ते ५ किमी अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते.

Tags:    

Similar News