#Grapeउठाव नसल्यानं द्राक्ष उत्पादकांपुढे महासंकट

#कोरोनाच्या (covid) संकटात द्राक्ष निर्यात (grape expoert) रोडावल्यानं द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला होता. अवकाळी पाऊस आणि रोगराईमुळे यंदाही द्राक्षाचे नुकसान झाले. आता व्यापारीच खरेदीला येत नसल्यानं द्राक्ष उत्पादकांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...;

Update: 2022-06-03 07:01 GMT

सोलापूर जिल्ह्यात द्राक्षांचा हंगाम लांबला असून द्राक्षांच्या खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने द्राक्ष बागायतदारांवर संक्रात कोसळली आहे. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभर काबाडकष्ट करीत सभाळलेल्या द्राक्ष बागांना खरेदीसाठी व्यापारीच मिळेना गेले आहेत. व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी करावी यासाठी शेतकरी वणवण भटकत आहेत. पण खरेदीसाठी व्यापारी मिळेना गेले आहेत. या द्राक्षांचा बेदानाही करता येत नाही. बेदाणा तयार करण्यासाठी वेगळ्या प्रकारची द्राक्ष शेतकरी सांभाळतात. जी द्राक्ष मार्केटला विकली जाणारी असते,तिच्यावर अलग फवारण्या केल्या जातात. तिच्यात गोडवा निर्माण होते. द्राक्षांचा हंगाम लांबला असल्याने शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा तशाच शेतात उभ्या आहेत. गेल्या पंधरा दिवसाखाली अवकाळी पाऊस पडल्याने तोडणीला आलेल्या द्राक्ष बागा पाऊसामुळे खराब झाल्या असून काही शेतकऱ्यांच्या बागा आणखीन ही सुस्थितीत आहेत. द्राक्ष बागांकडे व्यापारीच फिरकत नसल्याने सध्या शेतकरी द्राक्ष तोडून जमिनीवर टाकत आहेत. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. परंतु शासन किती मनावर घेते यावर शेतकऱ्याची नुकसानभरपाई अवलंबून असणार आहे.

आधीच कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला असताना अवकाळीमुळे द्राक्ष बागायदारांवर संक्रांत

मागील दोन वर्षे कोरोनामुळे द्राक्षांचा हंगाम वाया गेला होता. द्राक्षांचा हंगाम मार्च ते जून महिन्यापर्यंत असतो. परंतु मार्च ते जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन लागू केल्याने मागील दोन वर्षे द्राक्षांचा हंगाम वाया गेला होता. त्यामुळे द्राक्ष बागांचा गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला काही फायदा झाला नाही. आमचा द्राक्ष बागांवर झालेला खर्च सुद्धा निघाला नाही. यावर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष बागांचे जवळ-जवळ 100 टक्के नुकसान झाले होते. आधीच कोरोनाने दोन वर्षे द्राक्षांचा हंगाम वाया गेला होता. आता अवकाळी पावसाने जात आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून नुकसान भरपाई द्यावी. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पंढरपूर, करमाळा, माळशिरस, माढा,बार्शी या भागातील द्राक्ष बागांवर अवकाळी पावसाचा परिणाम झाला असून त्यामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीला अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्षांवर भुरी,दावण्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे यावर्षी द्राक्षेचे उत्पादन वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात होती. अवकाळी पावसामुळे फ्लोरा अवस्थेतील फळ गळून पडले होते. तयार झालेल्या द्राक्ष घडांचे नुकसान झाले होते. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जगवल्या. पण शेवटी अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांना झटका दिलाच असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या बागांकडे व्यापारी देखील,यायला तयार नाहीत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.


बाग छाटणीसाठी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च येतो

द्राक्ष बागांना दोन छाटण्या कराव्या लागतात,त्यासाठी एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. हा खर्च नुसत्या फवारण्या आणि मजुरांचा आहे. द्राक्ष बागांचे वर्षाला कमीत-कमी एकरी 3 लाख रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले जाते. यातून 2 लाख रुपये बागेला खर्च होतात. तर 1 लाख रुपये नफा मिळतो. गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष बागायतदार अडचणीत आले आहेत. बागांच्या देखभालीसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. एवढा खर्च करूनही अवकाळी पाऊसामुळे द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत .त्यामुळे बँकांचे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना समोर उभा राहिला आहे.


अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे सुरुवातीच्या काळात केले होते नुकसान

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव द्राक्ष बागांचे माहेर घर असून येथे सुरुवातीच्या काळात द्राक्ष बाग फुलोरा अवस्थेत असताना या भागातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जगवल्या. सुरुवातीच्या काळात या गावामध्ये द्राक्षांच्या बागा फ्लोरा व फळ धारणेच्या स्थितीत 30 ते 40 प्लॉट होते. पण अवकाळी पावसामुळे त्या बागा 100 टक्के पूर्णपणे संपल्यात जमा होत्या. बागा पूर्णपणे गळी आणि कुज मध्ये गेल्या होत्या. त्या बागा साधारण वीस ते पंचवीस दिवसाच्या होत्या. अवकाळी पावसामुळे या द्राक्ष बागांवर दावण्या आणि करप्या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. द्राक्ष बागांवर महागडी औषधे आणून फवारली होती. अवकाळी पावसामुळे त्याचा रिझल्ट शेतकऱ्यांना मिळेना गेला होता. पावसामुळे द्राक्षांचा गळ आणि कूसमध्ये जवळ-जवळ 20 टक्के भाग गेला होता. कासेगाव परिसरातील 70 ते 80 टक्के द्राक्षांच्या बागा दावण्या व करप्या या रोगांमुळे खराब झाल्या होत्या. या बागांची पावसामुळे दैनिय अवस्था झाली होती. त्यामुळे कोणी कोणतेही फवारणीचे औषध सांगितले. तर शेतकरी द्राक्ष बागांवर फावरत होते. त्याचा रिझल्ट ही अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे येत नव्हता. औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या असतानाही शेतकऱ्यांनी फवारण्या करून द्राक्ष बागा जगवून त्याला चांगल्या प्रकारे द्राक्षांचे फळ ही आले होते. परंतु सध्या व्यापाऱ्यांमुळे आणि भाव कमी असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत कोसळली आहे.


शेतकऱ्याचे 50 लाख रुपयांच्या आसपास नुकसान

कासेगाव परिसरातील शेतकरी दादा शिंगारे यांनी बोलताना सांगितले,की अवकाळी पाऊस पडल्याने द्राक्ष खराब झाली. सर्वच द्राक्ष बागा खराब नसून चांगली द्राक्ष ही व्यापारी घेऊन जाण्यास तयार नाहीत. माझी 18 एकर द्राक्ष बाग असून त्यापैकी 2 एकर विकली गेली आहे. द्राक्षांचा हंगाम लांबल्याने व्यापारी बागेकडे येण्यास तयार नाहीत. त्यामुळे द्राक्ष जमिनीवर तोडून टाकावी लागत आहे. खराब द्राक्षांचे पंचनामे वगैरे करण्यासाठी कृषी अधिकारी इकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी.

Tags:    

Similar News